Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

दादागिरी पुन्हा पाहायला मिळणार
कोलकाता, ४ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितीजावरून हरपलेला आणि ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ अशी बिरूदावली मिळविणारा सौरव गांगुलीला आता पुन्हा एकदा मैदानाावर पाहण्याची संधी सर्व क्रिकेट रसिकांना मिळणार आहे. १५ फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या रणजी एकदिवसीय स्पर्धेच्या सामन्यांमध्ये बंगालकडून खेळणाऱ्या सौरवची ‘दादागिरी’ पाहायला मिळेल.
सौरवने बंगालसाठी रणजी एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याच्या प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावाला त्याने मान्यता दिलेली आहे. तो सर्व सामन्यांसाठी उपलब्ध असेल किंवा नाही हे जरी आम्हाला त्याने कळविलेले नसले तरी स्पर्धेच्या साखळी सामन्यांमध्ये खेळून संघाला बाद फेरीत पोहोचवण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. साखळी फेरी ही प्रत्येक संघासाठी फार महत्वाची असते आणि त्याच्यासाठी गांगुलीचे संघासाठी मोलाचे योगदान ठरेल यात शंकाच नाही, अशी माहिती बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी दिली.
बंगालचा पहिला रणजी एकदिवसीय सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर झारखंडबरोबर होणार आहे. इंडियन प्रीमिआर लीगपूर्वी चांगला सराव मिळावा म्हणून सौरव रणजीच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्यास उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यानंतर सौरवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सौरव स्थानिक क्रिकेटला रामराम ठोकणार असे वाटत होते. पण या सामन्याच्या माध्यमातून त्याने स्थानिक क्रिकेट सोडलेले नाही, हेही त्याला दाखवून द्यायचे असल्याचे क्रिकेट वर्तुळात बोलले जात आहे.