Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

प्रशिक्षकाने निवडप्रक्रियेत लुडबुड करू नये
असलम शेरखान यांनी हरेंद्रसिंग यांना सुनावले
नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी / पीटीआय

 

प्रशिक्षकाने केवळ त्याचे काम करावे, उगाच निवड समितीच्या कामात लुडबुड करू नये, असे भारतीय हॉकी निवड समितीचे हंगामी सदस्य असलम शेरखान यांनी संघाचे प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांना सुनावले.
सध्या सुरू असलेल्या पंजाब गोल्ड चषक हॉकी स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय संघातील काही जेष्ठ खेळाडूंच्या कामगिरीवर शेरखान यांनी टीका केली होती. यावर अशी टीका केल्याने खेळाडूंचे मनोधैर्य खचते, अशी प्रतिक्रिया हरेंद्रसिंग यांनी दिली होती. खान यांनी प्रशिक्षकाला अशा रीतीने राग व्यक्त करणे शोभत नाही असे म्हटले आहे.
ते म्हणाले,‘‘अशी टीका माझ्यावर होण्यासारखे एकही वक्तव्य मी केले नाही. नवी दिल्लीत २०१० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा, पुढील वर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा तसेच आशियाई स्पर्धेसाठी भारताचा हॉकी संघ सर्वोत्तम असला पाहिजे. त्या दृष्टीनेच भारतीय संघ असेल. संघातील वरिष्ठ खेळाडूंनी सध्या सुरू असलेल्या गोल्ड चषक स्पर्धेत स्वत:च्या क्षमता सिद्ध कराव्यात.’’
वरिष्ठ खेळाडूंची कामगिरी समाधानकारक नसल्यास त्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला जाईल असा इशारा देत ते म्हणाले ‘‘ हेच निवड समितीचे काम आहे. आमच्या कामात प्रशिक्षकाने हस्तक्षेप करू नये.’’
प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. स्पर्धा ऐन बहरात असताना अशी वक्तव्ये खेळाडूंचे मनोधैर्य कमी करतात. वरिष्ठ खेळाडूंच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत सिंग म्हणाले, ‘‘प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचा आढावा घेणारा अहवाल तयार करून या स्पर्धेनंतर निवड समितीला तो सादर करण्यात येणार आहे.’’ अहवाल समाधानकारक नसल्यास निवड समितीने मला प्रशिक्षक पदावरून हटवावे, असे आव्हानही त्यांनी या वेळी दिले.