Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

असलम शेर खान यांची टीका आयोग्य - गिल
नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी/पीटीआय

 

भारतीय हॉकी संघातील ज्येष्ठ हॉकी खेळाडूंवर निवड समितीचे सदस्य असलम शेर खान यांनी मारलेला शेरा योग्य नसल्याचे सांगत निवड समितीने त्यांचेच काम करावे असा ‘सल्ला ’ क्रीडामंत्री एमएस गिल यांनी खान यांना दिला आहे.
चार देशांच्या सहभाग असलेल्या पंजाब गोल्ड चषक स्पर्धेत जर्मनीवर २-० असा विजय मिळवल्याबद्दल भारतीय हॉकी संघाचे गिल यांनी अभिनंदन केले आहे. हॉकी संघाबद्दल कुठलीही समस्या असल्यास सदस्यांनी हंगामी समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्याशी आधी चर्चा करावी, असेही गिल यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘आजही भारतीय हॉकी संघावर अनावश्यक टीका करण्यात आली आहे. निवड समितीचे काम खेळाडूंची निवड करणे हेच आहे. तेच त्यांनी पूर्ण क्षमतेने करावे ज्यामुळे देशाला चांगला संघ मिळेल. ’’ चांगल्या खेळाडूंचे नामनिर्देशन कलमाडी यांच्याकडे करावे, असे सांगत नियमानुसारच काम झाले पाहिजे असे गिल यांनी सुचविले. वरिष्ठ खेळाडूंचे भवितव्य एक व्यक्ती नव्हे तर निवड समिती ठरवेल असेही गिल यांनी स्पष्ट केले आहे.
हॉकी स्पर्धा ऐन बहरात असताना खेळाडूंवर अशी टीका केल्याने त्यांचे मनोधैर्य खचते असे मत त्यांनी व्यक्त केले. निवड सदस्यांना जे काही सांगायचे आहे ते त्यांनी व्यक्तिगतरीत्या न सांगता अध्यक्षांमार्फतच सांगावे.
पंजाब गोल्ड चषक स्पर्धेतील भारताच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करीत गिल यांनी संघास शुभेच्छा दिल्या. प्रदीर्घ काळानंतर भारतीय संघ चांगले प्रदर्शन करीत आहे. त्यांच्या कठोर परिश्रमांना परमेश्वर निश्चितच यश देईल, अशी भावनाही गिल यांनी व्यक्त केली.