Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

फुटबॉल ‘नर्सरी’त रंगणार साडेपाच दशकानंतर अखिल भारतीय स्पर्धा
नागपूर, ४ फेब्रुवारी / क्रीडा प्रतिनिधी

 

विदर्भाच्या फुटबॉलची ‘नर्सरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर जवळील कामठी येथे तब्बल ५५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्याचा योग कामठी युनायटेड क्लबने जुळवून आणला. देशाला १० ते १५ आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू देणाऱ्या कामठीतील फुटबॉल प्रेमी जनतेला या अनुषंगाने दर्जेदार फुटबॉलपटूंचा कलात्मक खेळ बघण्याची पर्वणी लाभणार आहे.
कामठी युनायटेड क्लबने आयोजित केलेली माजीद अहमद स्मृती अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा कामठीच्या मिलिटरी मैदानावर २० फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत रंगणार असल्याची माहिती क्लबचे सचिव महेमूद अख्तर यांनी आज कामठीच्या रब्बानी शाळेत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. साडेपाच दशकानंतर कामठीत अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा रंगत असल्यामुळे तिचे स्वरूप भव्य असावे, हा उद्देश ठेवून देशातील नामवंत संघांसह शहारातील ‘अ’ गट स्पर्धेत खेळणाऱ्या जवळजवळ सर्वच संघांना स्पर्धेत प्रवेश देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. याआधी १९५४ साली झालेल्या पहिल्या अखिल भारतीय स्पर्धेत मुंबईचा रशिदी क्लब अजिंक्य ठरला होता तर न्यू क्लब हैदराबादने उपविजेतेपद पटकावले होते.
अखिल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठले आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू येणार, असे विचारले असता अख्तर म्हणाले की, जे अ‍ॅन्ड के बँक काश्मीर संघाने स्पर्धेतील सहभाग निश्चित केला आहे. कुठली समस्या निर्माण न होता तो संघ स्पर्धेत दाखल झाला तर त्या संघातील तीन विदेशी फुटबॉलपटूंचा खेळ बघण्याची संधी सर्वाना मिळेल. दरम्यान, विजेत्या संघाला ३५ हजार रुपये रोख व चषक तर उपविजेत्या संघाला २५ हजार रोख व चषक प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती २६, २७ फेब्रुवारीला रंगणार असून उपांत्य लढत २८ ला तर अंतिम सामना १ मार्चला खेळल्या जाणार आहे. विद्युत मंडळ कोलकाता, रायतुरा क्लब गोवा, मध्य रेल्वे मुंबई व वायुसेना दिल्ली या संघांना थेट उपांत्यपूर्व तर आरसीएफ मुंबई, युनियन क्लब यमुनानगर हरयाणा, के.पी. क्लब पुणे आणि जे अ‍ॅन्ड के बँक काश्मीर या संघांना थेट उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला असल्याचेही अख्तर यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही स्थानिक स्तरांच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. मात्र, यंदा अखिल भारतीय स्पर्धा तब्बल साडेपाच दशकानंतर आयोजित करत असल्याचेही ते म्हणाले.
गार्ड्स रेजिमेंट कामठीचे ब्रिगेडियर देवेंद्र कपूर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून माजी खासदार दत्ता मेघे आणि राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनीस अहमद प्रमुख पाहुणे राहणार आहेत. नागपूर ब्ल्यूज, रेंज पोलीस, दक्षिण पूर्व रेल्वे, डीसीए मध्य रेल्वे, यंग मुस्लिम, राहुल क्लब, बिग-बेन, नागपूर अकादमी, रब्बानी कामठी, न्यू ग्लोब क्लब कामठी, जीआरसी कामठी, यंग इक्बाल क्लब कामठी, अन्सार क्लब कामठी, इलेव्हन स्टार कामठी या स्थानिक संघांसह आरसीएफ मुंबई, मध्य रेल्वे मुंबई, केपी क्लब पुणे, रायतुरा क्लब गोवा, सिटी क्लब गोंदिया, विद्युत मंडळ कोलकाता, वायुसेना दिल्ली, जे अ‍ॅन्ड के बँक काश्मीर, युनियन क्लब यमुनानगर हरयाणा या संघांनी आतापर्यंत प्रवेश निश्चित केला असल्याचेही अख्तर यांनी सांगितले. आज झालेल्या पत्रकार परिषदेला कामठी युनायटेड क्लबचे अध्यक्ष जमील अहमद, उपाध्यक्ष मोहम्मद अनीस, सहसचिव मोहम्मद उमर, कोषाध्यक्ष मोहम्मद असीफ यांच्यासह क्लबचे अनेक सदस्य उपस्थितीत होते.