Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : पुरुष व महिला गटात मुंबईचे अंकुर व शिवशक्ती संघ अजिंक्य
मिरज, ४ फेब्रुवारी / वार्ताहर

 

येथील श्री अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरिय कबड्डी स्पर्धेतील पुरुष व महिला गटात मुंबईच्या अनुक्रमे अंकुर व शिवशक्ती या संघाने अजिंक्यपद पटकाविले. महिला गटात अत्यंत अटीतटीने झालेल्या अंतिम निकालासाठी पाच चढायांच्या वाढीव संधीत शिवशक्ती संघाने डॉ. शिरोडकर स्पोर्टस मुंबईचा पराभव करीत प्रथम क्रमांकासह चषकावर नाव कोरले.
श्री अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेच्या लोकमान्य टिळक क्रीडांगणावर झालेल्या या स्पर्धेत राज्यातील २९ नामांकित संघांनी सहभाग नोंदविला होता. संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहण्यासाठी हजारो क्रीडारसिकांनी हजेरी लावली होती. स्वागताध्यक्ष तासगावकर व पोलीस उपअधिक्षक दीपक देवराज यांच्याहस्ते विजेत्यांना रोख रकमेसह पारितोषिके देण्यात आली.
पुरूष गटातील उपांत्या सामन्यात शाहू क्रीडा मंडळ सडोलीने मावळी मंडळ ठाणेचा २१ विरुध्द ११ गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर अंकुर स्पोर्टसने नवभारत शिरोलीचा सहा गुणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना अंकुर स्पोर्टस व शाहू क्रीडा मंडळ यांच्यात झाला. अत्यंत अटीतटीच्या या लढतीत अंकुरने शाहू क्रीडा मंडळावर अवघ्या एका गुणाने मात करून विजेतेपद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत नवभारत शिरोलीने मावळी मंडळ ठाणेचा २९ विरुध्द १४ गुणांनी पराभव केला. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान मिलिंद कोलते (अंकुर स्पोर्टस), उत्कृष्ट चढाई महेश मगदूम (शाहू क्रीडा मंडळ) व अष्टपैलू खेळाडू म्हणून अरुण पाटील (शाहू क्रीडा मंडळ) यांना गौरविण्यात आले.
महिला गटातील उपांत्य फेरी डॉ. शिरोडकर स्पोर्टस व अंकुर स्पोर्टस आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ व चेंबूर क्रीडा मंडळ यांच्यात झाली. डॉ. शिरोडकर स्पोर्टस व शिवशक्ती क्रीडा मंडळाने आपापल्या विरोधी संघांचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. डॉ. शिरोडकर स्पोर्टस व शिवशक्ती क्रीडा मंडळ यांच्यातील अंतिम सामना अत्यंत रोमहर्षक झाला. मध्यंतरापर्यंत शिरोडकर स्पोर्टसने दोन गुणांची आघाडी घेतली होती. परंतु अंतिम क्षणी शिवशक्ती क्रीडा मंडळाने बरोबरी गाठली. या दोन्ही संघांना पाच चढायांसाठी संधी देण्यात आली. या संधीचे सोने करीत शिवशक्ती क्रीडा संघाने चार गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला, तर चेंबूर क्रीडा मंडळाने अंकुर स्पोर्टसचा पराभव करून तिसरा क्रमांक मिळविला. महिला गटात उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान श्रध्दा काळे (शिवशक्ती क्रीडा मंडळ), उत्कृष्ट चढाई कविता कदम (अंकुर स्पोर्टस) व अष्टपैलू खेळाडूचा मान तृप्ती शिवधरकर (डॉ. शिरोडकर स्पोर्टस) यांना मिळाला.
या स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे रोख बारा, आठ व पाच हजार रुपये व चषक देण्यात आला. याशिवाय वैयक्तिक कामगिरीबद्दल खेळाडूंनाही रोख पुरस्कार देण्यात आले. या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रकांत पाटील, नगरसेवक महंमद मणेर, सचिव सुबोध गोरे, सुमंत कुलकर्णी, संजय परमणे व प्राचार्य एम. एन. भैरट आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कबड्डी असोसिएशनचे पंचप्रमुख मोहन पाडावे व निरीक्षक म्हणून डी. जे. चिप्रीकर आदी उपस्थित होते.

आज कुस्त्यांचे मैदान
श्री अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेच्यावतीने अंबाबाई केसरी कुस्त्यांच्या भव्य स्पर्धा गुरुवार दि. ५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत.
प्रथम क्रमांकासाठी चांदीची गदा व अंबाबाई केसरी हा किताब याप्रसंगी विजेत्या कुस्ती पटूला देण्यात येणार आहे. या मैदानात सुमारे ५० कुस्त्या निश्चित करण्यात आल्या असून अंबाबाई केसरीपदासाठी कुलदीप यादव व कांतिलाल जाधव यांच्यात लढत होणार आहे.