Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

अपंगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप
लातूर, ४ फेब्रुवारी/वार्ताहर

 

जीवन विकास प्रतिष्ठान व सामाजिक न्याय विभाग यांनी आयोजित केलेल्या अपंगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचा समारोप नुकताच करण्यात आला.मतिमंद प्रवर्गाचे जिल्हास्तरीय अजिंक्यपद लातूरच्या मतिमंद विद्यालयाने मिळविले. मूकबधीर प्रवर्गाचे अजिंक्यपद सुशीलादेवी देशमुख निवासी मुलींचे मूकबधीर विद्यालय व मूकबधीर विद्यालय, लातूर या दोन शाळांना संयुक्तरीत्या मिळाले. बहुविकलांग प्रवर्गाचे अजिंक्यपद संवेदना सेरेब्रल, पालसी विकसन केंद्रास मिळाले, तर अंध प्रवर्गाचे अजिंक्यपद एम.ए.बी. अंध विद्यालयास मिळाले. क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमास क्रीडा उपसंचालक जनक टेकाळे, टी. एन. कांबळे, महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक भरतकुमार, समाजकल्याण कार्यालय अधीक्षक बनसोडे, जीवन विकास प्रतिष्ठानचे सचिव रामानुज रांदड, मुख्याध्यापिका एम. ए. खरोसेकर, उपमुख्याध्यापक जवळे आदींची उपस्थिती होती. या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अंध, मूकबधीर, मतिमंद, बहुविकलांगव अस्थिव्यंग प्रवर्गातील २५ प्रातनिधिक खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेत लातूर जिल्ह्य़ातील ४१६ अपंग खेळाडू, १७२ क्रीडाशिक्षक व २० पंच सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कुलकर्णी यांनी केले. मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांनी आभार मानले.