Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

पश्चिम आणि दक्षिण विभाग आमने-सामने
दुलीप करंडक
चेन्नई, ४ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

 

दुलीप करंडकाच्या उपान्त्य फेरीतील सामन्यांमध्ये पश्चिम विभाग आणि दक्षिण विभाग या दोन्ही संघांनी एकहाती विजय मिळविल्याने उद्यापासून होणारा अंतिम सामना चांगलाच रंगण्याची शक्यता क्रिकेट रसिकांना आहे. येथील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी अनुकूल असल्याने पहिल्या डावात आघाडीच्या जोरावर सामना जिंकण्यासाठी दोन्हीही संघ प्रयत्नशील असतील.
उपान्त्य फेरीतील सामन्यात दक्षिण विभाग जलदगतीने धावांचा डोंगर उभारण्यात यशस्वी ठरला होता. संघातील सलामीवीर रॉबीन उत्थप्पा, कर्णधार एस. बद्रिनाथ आणि राहुल द्रविड हे तिघेही चांगल्याच फॉर्मात आहेत. व्हि. व्हि. एस. लक्ष्मण संघात नसला तरी मुरली विजयच्या संघात येण्याने त्यांची उणीव भरून निघालेली आहे. पण गोलंदाजीमध्ये मात्र लक्ष्मीपती बालाजी संघात नसल्याने गोलंदाजीची जबाबदारी एस. श्रीसंथच्या खांद्यावर असेल.
पश्चिम विभागाचा संघ हा दक्षिण विभागापेक्षा चांगलाच समतोल वाटतो. कर्णधार वसीम जाफर, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजुरा, केदार जाधव आणि भाविक ठक्कर यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. तर धवल कुलकर्णी, सिद्धार्थ त्रिवेदी, रमेश पोवार आणि राजेश पवारवर संघाच्या गोलंदाजीची मदार असेल. त्याचबरोबर अभिषेक नायर हे एक चांगले ट्रम्प कार्ड संघामध्ये आहे.
दक्षिण विभाग-: अभिनव मुकुंद, मुरली विजय, रॉबीन उत्थप्पा, राहुल द्रविड, एस. बद्रिनाथ (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर.अश्विन, एम.सुरेश, शाबाद जकाती, एस.श्रीसंथ आणि विनय कुमार
पश्चिम विभाग-: वसीम जाफर (कर्णधार), भाविक ठक्कर, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक), अभिषेक नायर, केदार जाधव, रमेश पवार, धवल कुलकर्णी, राजेश पवार आणि सिद्धाथर्
त्रिवेदी