Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

रिक्षाभाडय़ात कपात न झाल्याने प्रवासी संतप्त
ठाणे/प्रतिनिधी

 

पेट्रोल-डिझेलची भाववाढ कमी झाल्याच्या निर्णयाला आठवडा उलटून गेला, तरी डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी भाडय़ात कपात केली नसल्याने प्रवाशांत संतापाची लाट उसळली आहे. पेट्रोल-डिझेलची भाववाढ जाहीर झाली की, शासनाच्या आदेशाची वाट न पाहणाऱ्या रिक्षा संघटनांनी अनेक वेळा निर्णय जाहीर झाल्याच्या रात्रीपासूनच अंमलबजावणी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यावेळी प्रवाशांनी मुकाटय़ाने ती सहन केली, मात्र आता भाडेकपात घोषित होऊनही एकही रुपया कमी न करणाऱ्या रिक्षाचालकांबद्दल प्रवाशांत असंतोष पसरला आहे.
याचाच उद्रेक होऊन जुनी डोंबिवली प्रभाग क्रमांक ७२ चे सेना नगरसेवक रामदास पाटील, विभागप्रमुख किशोर मानकामे, शाखाप्रमुख आत्माराम राणे, भाजप कार्यकर्ते निळकंठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी रिक्षाचालकांना याचा जाब विचारण्यात आला. सरकारचा निर्णय काहीही होवो, सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्याने रिक्षाचालकांनी माणुसकीचा धर्म पाळून किमान एक रुपया तरी कमी करावा, अशी या नेत्यांची मागणी होती. मात्र या रिक्षाचालकांनी आपल्या अकलेचे तारे तोडत युनियनचे नेते, आरटीओ आणि प्रशासन यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत आपले अंग काढून घेतले. रिक्षा संघटना कायद्यावर बोट ठेवून वागत असतील, तर किती रिक्षाचालक कायदे पाळतात, त्यांचे किती रिक्षा स्टँड अधिकृत आहेत, रिक्षातून कशी अवैध वाहतूक केली जाते याचाही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.
रिक्षा युनियनचे नेते व सेनेचे शहरप्रमुख शरद गंभीरराव यांनी वर्तमानपत्रात रिक्षा भाडेकपातीच्या बातम्या स्वत:च्या नावाने प्रसिद्ध केल्या. वृत्तवाहिन्यांनी ठळक मथळे दिले, मात्र आरटीओ, प्रशासन यांचे नियम वेळोवेळी सोईस्कररीत्या धाब्यावर बसविणारे रिक्षाचालक भाडेकपातीसाठी शासनाच्या निर्णयाची वाट पाहात आहेत. प्रसिध्दीसाठी सतत पत्रके काढणारे गंभीरराव रिक्षावाल्यांना धडा शिकविणार की नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत.
लाल बावटा चालक-मालक युनियनने, सरकारचा निर्णय जाहीर होईपर्यंत सर्व रिक्षाचालकांनी एक रुपयाने भाडे कमी करून प्रवाशांना सहकार्य करावे, असा फलक लावला आहे, तर माजी महापौर पुंडलिक म्हात्रे अध्यक्ष असलेल्या रिक्षा चालक-मालक युनियनने परस्परविरोधी फलक लावला आहे. आरटीओच्या भाडेकपातीबाबत कोणताही निर्णय होईपर्यंत भाडेकपात रद्द करण्यात आली आहे, तरी कृपया रिक्षाचालकांनी पूर्वीप्रमाणेच भाडे घ्यावे.
या परस्परविरोधी निर्णयामुळे डोंबिवलीकर मात्र पुरते गोंधळून गेले आहेत. रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यात बऱ्याच ठिकाणी शाब्दिक चकमकीही झडत आहेत.