Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

घोडबंदर परिसरात चोरांचा धुमाकूळ
ठाणे/प्रतिनिधी

 

घोडबंदर रोडवरील गृहसंकुलांमधील सुरक्षा रक्षकांना पोलीस तपासणीविना नोकरीवर ठेवण्याच्या प्रकारात वाढ झाली असून त्यामध्ये नेपाळी गार्डची वाढलेली संख्या लक्षणीय आहे. अपुरे पोलीस बळ आणि वाढत्या लोकसंख्येमुळे या परिसरात वाढलेल्या घरफोडय़ांमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरोडे आणि घरफोडय़ांमुळे कासारवडवली पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आलेली होती. मात्र पोलीस ठाण्याचा वचक निर्माण न झाल्याने घरफोडय़ा आणि चोरीचे प्रकार वाढू लागले आहेत. आरोपींना पकडण्यास पोलिसांना पुरेसे यश येत नसल्याने महिनाभरात सुमारे १५ ठिकाणी घरफोडय़ा आणि चोऱ्या झाल्या आहेत. दिवसाआड चोऱ्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. फ्लॅट बंद ठेवून बाहेरगावी जाण्याची नागरिकांना धास्ती वाटते. विशेष म्हणजे त्यांच्याकडे खासगी सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत. कारण खासगी सुरक्षा असताना घरे आणि दुकाने फोडली जात आहेत. पोलीस ठाण्यापासून काही मिनिटांच्या अंतरावरील कासारवडवली नाक्यावर शनिवारी सहा दुकाने व फ्लॅट फोडण्याचे प्रयत्न झाले. त्यात दोन मेडिकल स्टोअरचे समावेश आहे. काल विजयनगरी अ‍ॅनेक्समधील अविनाश पनीकर हे हॉस्पिटलला गेल्याचे पाहून त्यांचे घर फोडण्यात आले. त्यावेळी प्रवेशद्वारावर खासगी सुरक्षा रक्षक तैनात होते.
चोरांनी ब्रह्मांडपासून ओवळ्यापर्यंत धुमाकूळ घालून पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. त्यात भंगारवाले आणि गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या व्यक्तींचा पोलीस ठाण्यात वाढलेल्या वावरामुळे अनेक पोलीसही नाराज आहेत. जे आरोपी त्यांना बघताच क्षणी घाबरत होते, त्याच व्यक्तींना आता त्या पोलीस शिपायांना चहा आणून द्यावा लागत आहे. याचा फटका पोलिसिंगवर होऊ लागला आहे. याबाबत वरिष्ठांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढत्या घरफोडय़ांबाबत कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर साळुंके यांना विचारणा केली असता, ते म्हणाले सुरक्षा रक्षकांमध्ये नेपाळींची वाढलेली संख्या चिंताजनक आहे. विजय अ‍ॅनेक्समधील पनीकर यांच्या घरफोडीप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून ते नेपाळी आहेत. त्यापैकी एक त्याच इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. घोडबंदर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले असून त्याच्या माध्यमातून इतर घरफोडय़ाही उघड होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.