Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पारसिक बँक क्रीडा स्पर्धाना उत्तम प्रतिसाद

 

ठाणे/प्रतिनिधी : पारसिक जनता सहकारी बँक आयोजित कर्मचारी क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. बुद्धिबळ, कॅरम एकेरी व दुहेरी, क्रिकेट, बॅडमिंटन, रांगोळी, पुष्परचना, ग्रीन सॅलड, पाककला या विविध स्पर्धा प्रकारांत बँकेतील ३५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष रणजित पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संचालक रवींद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप साखळकर, शाखाधिकारी मनोज गडकरी, हनुमंत मराठे, यशवंत मते, पंच रोहिदास पाटील आदी उपस्थित होते.
बँकेचे संचालक मंडळ व व्यवस्थापक संघ यांच्यात क्रिकेटचा प्रदर्शनीय सामना झाला. यामध्ये संचालक संघाने विजय मिळविला. आंतरशाखा कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना भिवंडी शाखा व मुख्य कार्यालय संघ यांच्यात झाला. भिवंडी शाखा संघाने तीन धावांनी विजय मिळविला. अंतिम सामन्यात भिवंडी शाखा संघातील रोशन पाटील याने फलंदाजीत २८ धावा व गोलंदाजीत दोन बळी घेऊन अष्टपैलू कामगिरी करून विजयश्री मिळविण्यात सिंहाचा वाटा उचलला. गोपीनाथ पाटील स्मृतिचषक व अंतिम विजयी चषक रणजित पाटील यांच्या हस्ते भिवंडी शाखा संघाचे कर्णधार अनिल राणे, राजेंद्र रोडगे, रोशन पाटील आणि संघातील खेळाडूंनी स्वीकारला. रोशन पाटील यास मॅन ऑफ दी सिरीजचे व अंतिम सामन्यातील ‘मॅन ऑफ दी मॅच’चे बक्षीस मिळाले.
उत्कृष्ट फलंदाज म्हणून विजय मोकाशी (मुख्य कार्यालय), उत्कृष्ट गोलंदाज लिओनॉर्ड डिसोझा (कळवा शाखा) व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून किरण मढवी (खारकर आळी) यांना गौरविण्यात आले. अन्य स्पर्धामध्ये योगेश सोनवणे, मनोहर मढवी, भास्कर केणी, प्रतिभा देवाडिगा, संजय कडवे, माधुरी पवार आदींनी पुरस्कार मिळविले.