Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९

रिक्षाभाडय़ात कपात न झाल्याने प्रवासी संतप्त
ठाणे/प्रतिनिधी

पेट्रोल-डिझेलची भाववाढ कमी झाल्याच्या निर्णयाला आठवडा उलटून गेला, तरी डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी भाडय़ात कपात केली नसल्याने प्रवाशांत संतापाची लाट उसळली आहे. पेट्रोल-डिझेलची भाववाढ जाहीर झाली की, शासनाच्या आदेशाची वाट न पाहणाऱ्या रिक्षा संघटनांनी अनेक वेळा निर्णय जाहीर झाल्याच्या रात्रीपासूनच अंमलबजावणी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यावेळी प्रवाशांनी मुकाटय़ाने ती सहन केली, मात्र आता भाडेकपात घोषित होऊनही एकही रुपया कमी न करणाऱ्या रिक्षाचालकांबद्दल प्रवाशांत असंतोष पसरला आहे.

घोडबंदर परिसरात चोरांचा धुमाकूळ
ठाणे/प्रतिनिधी

घोडबंदर रोडवरील गृहसंकुलांमधील सुरक्षा रक्षकांना पोलीस तपासणीविना नोकरीवर ठेवण्याच्या प्रकारात वाढ झाली असून त्यामध्ये नेपाळी गार्डची वाढलेली संख्या लक्षणीय आहे. अपुरे पोलीस बळ आणि वाढत्या लोकसंख्येमुळे या परिसरात वाढलेल्या घरफोडय़ांमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोडे आणि घरफोडय़ांमुळे कासारवडवली पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आलेली होती.

पारसिक बँक क्रीडा स्पर्धाना उत्तम प्रतिसाद
ठाणे/प्रतिनिधी : पारसिक जनता सहकारी बँक आयोजित कर्मचारी क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. बुद्धिबळ, कॅरम एकेरी व दुहेरी, क्रिकेट, बॅडमिंटन, रांगोळी, पुष्परचना, ग्रीन सॅलड, पाककला या विविध स्पर्धा प्रकारांत बँकेतील ३५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष रणजित पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संचालक रवींद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप साखळकर, शाखाधिकारी मनोज गडकरी, हनुमंत मराठे, यशवंत मते, पंच रोहिदास पाटील आदी उपस्थित होते.

अखिल भारतीय महापौर चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया अजिंक्य
ठाणे/प्रतिनिधी : ठाणे महानगरपालिका आणि जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय स्तरावरील महापौर चषक कबड्डी स्पर्धेच्या पुरुष गटात मुंबईच्या एअर इंडिया संघाने, तर महिला गटात पुणे जिल्ह्याच्या संघाने अजिंक्यपद पटकाविले. उपविजेतेपदाचा मान अनुक्रमे जोधपूरच्या बी.एस.एफ. आणि ठाणे जिल्हा या संघांना मिळाला.

अंबरनाथमध्ये समीर अभ्यंकर, अपर्णा पणशीकर यांची मैफल
बदलापूर/वार्ताहर : तरुण उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांची कला त्यांना सादर करता यावी, या उद्देशाने अंबरनाथ संगीत सभेच्या विद्यमाने अलीकडेच डोंबिवलीचे समीर अभ्यंकर आणि पुण्याच्या अपर्णा पणशीकर या दोन तरुण कलाकारांची शास्त्रीय गायनाची मैफल आयोजित करण्यात आली होती. प्रथम समीर अभ्यंकर यांनी ‘पूरिया’ राग विलंबित व द्रुत तालात पेश केला. त्यापुढे ‘कामोद’ मध्यलयीत अत्यंत कुशलतेने मांडला. आपला गायनाचा समारोप त्यांनी पं. डी. व्ही. पलुस्करांच्या भजनाने केला.मध्यंतरानंतर पुण्याच्या अपर्णा पणशीकरांनी आपल्या गायनाची सुरुवात ‘शुद्ध -नट’ या मिश्र रागाने केली. त्यानंतर झपतालात बागेश्री राग गायला. त्याचा आलापी, स्वर लगावान पंडिता किशोरी आमोणकरांच्या गायकीची श्रोत्यांना झलक उमजली. पुढे संत कबीराचे निर्गुणी भजन गाऊन त्यांनी मैफिलीचा समारोप केला.दोन्ही कलाकारांना संवादिनी साथ जयंत फडके तर तबला साथ अनुक्रमे उदय परुळकर व शंतनू पणशीकर यांनी केली.

कलासाधनेतून मिळतो जीवनाचा मंत्र - सुचेता भिडे
ठाणे/प्रतिनिधी : ‘कला’ हा एक उत्तम संस्कार आहे. आजच्या शिक्षणपद्धतीत कलेचे वेगळे संस्कार केले जात नाहीत. त्यासाठी वेगळा क्लास लावून या मुलींनी नृत्यकलेचं शिक्षण घेतले हे कौतुकास्पद आहे. आजचे पालक जागरूक आहेत. मुलींना सर्वगुणसंपन्न करण्यासाठी ते धडपडत आहेत. एवढय़ा मोठय़ा संख्येने येऊन प्रेक्षकांनी या मुलींच्या कलेला दाद दिली. कलेच्या शिक्षणातून निव्वळ तंत्र न शिकता जीवनाचा मंत्र गवसतो, असे प्रतिपादन गेली ४० हून अधिक वर्षे भरतनाटय़मच शास्त्रोक्त शिक्षण देणाऱ्या सुप्रसिद्ध नर्तिका सुचेता भिडे चापेकर यांनी येथील एका कार्यक्रमात केले. ‘नृत्यसंवेद’ या संस्थेने वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात आयोजित अरंगेत्रम कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या उपस्थित होत्या.धनश्री गोसावी, प्रियांका फुलसुंदर, श्रुती वैद्य आणि सुमेधा राणे या चार नृत्यांगनांचा अरंगेत्रम कार्यक्रम संपन्न झाला. शास्त्रीय नृत्यप्रकारातले स्तुती, अलारिपु, जतीस्वरम्, गजानन स्तुती, वर्णम ते तिल्लानरयत अत्यंत आकर्षक नृत्य सादर करून या चौघींनी तुडुंब भरलेल्या प्रेक्षागारातील प्रेक्षकांची मनं जिंकली. या चारही नृत्यांगनांनी अलका लाजमी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नृत्याचं शिक्षण घेतले आहे. वाशी इथल्या गांधर्व महाविद्यालयात त्या शिकतात. डॉ. सुचेता भिडे चापेकर आणि स्मिता महाजन यांच्या त्या शिष्या! आपल्या चारही शिष्यांचे अलका लाजमी यांनी कौतुक केले. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मात्या स्मिता तळवलकरही यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता बहारदार तिल्लाना नृत्य आणि त्यानंतर सदाबहार पसायदानावरील नृत्यरचनेने झाली.

भाविसेना कार्यकर्त्यांची गांधीगिरी!
बदलापूर/वार्ताहर : शिक्षणाचे धडे देणाऱ्या आदर्श विद्यालयाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतानाच भाविसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क शाळेच्या आवारात बुधवारी स्वच्छता मोहीम राबवली.
येथील आदर्श विद्यालयात वेळच्या वेळी स्वच्छता ठेवली जात नाही. ही बाब भारतीय विद्यार्थी सेनेच्या लक्षात येताच तुकाराम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सूरदास पाटील, अजय गीते, भारत पाटील, नरेश मेहर, आयविट लोगो आदींनी बुधवारी सकाळी शाळेचा परिसर स्वच्छ केला. शाळेला वेळोवेळी स्वच्छता करता येत नसल्यास प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात शाळेत येऊन स्वच्छता करण्यास भाविसेना तयार असल्याचेही लेखी निवेदन शाळेला देण्यात आले आहे.या शाळेत सुमारे ३० वर्गखोल्या असून सध्या केवळ चार शिपाई शाळेच्या अन्य कामांबरोबर साफसफाईचे काम करतात. गेल्या काही वर्षांपासून शिपायांची रिक्त पदे भरली गेली नाहीत, असे शाळेच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले.

स्नेहांकित मित्रमंडळातर्फे शहीद जवानांना आदरांजली
डोंबिवली/प्रतिनिधी - नांदिवली रोड येथील स्नेहांकित मित्रमंडळातर्फे २६ जानेवारी रोजी भारतमातेला वंदन, दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम प्रभागात आयोजित केला होता. स्नेहांकित मित्रमंडळाचे अध्यक्ष डॉ. दिनेश अनंत म्हात्रे, उपाध्यक्ष व नगरसेवक पप्पू म्हात्रे यांच्या उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमाला प्रभागातील नागरिक, बालगोपाळ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले की, देशातील प्रत्येक माणूस गटागटाने संघटित झाला, तर समाज संघटित होणार आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांत एकोपा साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही एकात्मता राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जगाला देणार आहे. डॉ. म्हात्रे यांनी सांगितले की, देव, धर्म भक्तीला आपण जसे मानतो त्याचप्रमाणे राष्ट्रभक्ती देशातील प्रत्येक माणसाने प्रज्वलीत करणे आवश्यक आहे. हीच शक्ती प्रज्वलीत झाली तर दहशतवाद्यांना नामोहरम करणे अशक्य नाही.

धरमसी मोरारजी सुरू करण्याचे आदेश
बदलापूर/वार्ताहर : अंबरनाथ येथील धरमसी मोरारजी कंपनीमध्ये अन्यायकारक लागू करण्यात आलेली टाळेबंदी उठविण्याचे आदेश कामगारमंत्री नवाब मलिक यांनी कंपनी व्यवस्थापनास दिले आहेत. या कंपनीमध्ये २४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून अचानक कंपनी व्यवस्थापनाने टाळेबंदी जाहीर केल्याने ३२५ कामगारांवर उपासमारीचे संकट ओढवले होते. ९ फेब्रुवारीपासून टाळेबंदी लागू करण्याचे व्यवस्थापनाने जाहीर केले होते, मात्र अचानक टाळेबंदी लागू केल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट पसरली होती. टाळेबंदीप्रकरणी तोडगा काढावा यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी कामगारमंत्री मलिक यांच्याशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार मंगळवारी कामगार मंत्री मलिक यांच्या दालनात कंपनी व्यवस्थापन, कामगार संघटनेचे राजन राजे, तसेच कामगार उपायुक्त आर.आर. हेंद्रे, सहआयुक्त एस.के. पेडगावकर, कंपनी व्यवस्थापनातर्फे दिलीप गोकुळदास, जी.टी. गोखले आणि सतीश रानडे यांनी चर्चेत भाग घेतला. कंपनी त्वरित सुरू करावी, तसेच भविष्यात कामगारांची सर्व प्रकारची देणी दिल्याशिवाय कंपनीने जागा विकू नये, असा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.