Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९

व्यक्तिवेध

दिल्ली विमानतळावर क्रीडारसिक एकच जल्लोष करीत होते. क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळामधील यशोवीराला सलाम ठोकण्यासाठीच ते सारे जमले होते. त्यामुळेच की काय, त्या षोडशवर्षीय विक्रमवीरालाही प्रथम विश्वास बसेना, की हे सारे आपल्यासाठी चालले आहे! अखेर माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्नांच्या ‘सव्‍‌र्हिस’ केल्यानंतर ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील युवक गटाचा विजेता युकी भांब्री भानावर आला! ‘रॅकेट हाती धरल्यानंतर सहा वर्षांमध्ये केलेल्या खडतर मेहनतीचे हे सुखद फळ आहे,’ असे सांगताना युकीला आनंदाश्रू आवरले नाहीत. हे यश संपूर्ण भांब्री कुटुंबीयांचे आहे. वडील डॉ. चंदर आणि आई इंदू हे तीनही भावंडांच्या यशासाठी खंबीरपणे उभे राहिले. युकीच्या दोन्ही बहिणी, अंकिता आणि साना यांनी भारतीय टेनिस संघाकडून खेळण्याचा मान यापूर्वीच मिळविला आहे. त्या दोघी सानियाबरोबरच्या, परंतु ‘ग्लॅमर’ची मानकरी होण्यात सानियाने आघाडी घेतली नि

 

माध्यमांचा प्रकाशझोत तिच्यावरच राहिला. तरी भांब्री कुटुंबीयांचा निर्धार ढळला नाही. भांब्री बहिणी अमेरिकीतील स्पर्धामध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत राहिल्या, तर पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेतील रौप्यपदकासह ज्युनिअर सर्किटमध्ये युकी चमकला. ‘ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये युकी चमत्कार घडविणार, अशी आम्हाला खात्री होती. परंतु, त्याच्यावर अनावश्यक दडपण येऊ नये, याची आम्ही काळजी घेतली. मुलांच्या टेनिससाठी आम्ही सारे आयुष्य पणाला लावले आहे. आता यशाची चव चाखण्याचे आनंदाचे दिवस आले आहेत,’ अशा भावना भांब्री दाम्पत्य व्यक्त करते. युकीची चुलत बहीण एकता ही टेबल टेनिसची राष्ट्रीय खेळाडू व क्रीडामानसशास्त्राची तज्ज्ञ. तिच्या टिप्समुळेच युकी खेळात सातत्य राखू शकला. अर्थात, युकीच्या यशाचे खरे श्रेय दिल्लीतील सिरी फोर्ट टेनिस केंद्रातील प्रशिक्षक जयदीप भाटिया आणि आदित्य सचदेव यांच्याकडे जाते. सहा-सात वर्षांपूर्वी भांब्री भगिनी कोर्टवर सराव करीत होत्या. त्यांच्यामध्ये चिमुकल्या युकीची लुडबुड सुरू असे. एकदा त्याच्या हाती रॅकेट देण्यात आली. त्या दहा मिनिटांमध्येच प्रशिक्षकांनी युकीच्या प्रतिभेला हेरले! बहिणींसमवेत फ्लोरिडा येथील टेनिस अकादमीमध्ये सराव करण्याचाही युकीला फायदा झाला. नैसर्गिक ‘सव्‍‌र्ह अ‍ॅण्ड व्हॉली’च्या खेळाबरोबरच युकीला बेसलाईनवरील जोरदार फटक्यांचा कसून सराव करावा लागणार आहे. तरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत त्याचा टिकाव लागू शकेल. त्यासाठी पूर्णवेळ प्रशिक्षकांबरोबरच स्नायूंना बळकटी देण्याचा व्यायाम, समतोल आहार आणि तंदुरुस्ती राखण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेचा करंडक उंचाविल्यानंतर तरी आता अर्थपुरवठा करण्यासाठी युकीला पुरस्कर्ते लाभतील. ग्रॅण्ड स्लॅममधील यशानंतर आता युकीला भारतीय डेव्हिस करंडक संघात स्थान मिळविण्याचे वेध लागले आहेत. ज्युनिअर मानांकनामध्ये तो आता दुसऱ्या स्थानी आहे. येत्या काही वर्षांमध्ये खुल्या गटामध्ये आव्हान उभे करण्याच्या खडतर कोर्टवर त्याला कौशल्य पणाला लावायचे आहे. अर्थात, युकीचे यश हे अत्यंत मोक्याच्या वेळेस आले आहे. लिएंडर-महेशची कारकीर्द भैरवी आळवते आहे. मिश्र दुहेरीचे ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद मिळविले असले, तरी एकेरीत आंतरराष्ट्रीय स्तरावर सानियाच्या मर्यादा सिद्ध झाल्या आहेत. अशा वेळी चेन्नई ओपन विजेतेपदाचा चमत्कार करणाऱ्या सोमदेव देववर्मनसह युकीच्या माध्यमातून भारतीय टेनिसविश्वाला नवे स्टार मिळाले आहेत. यापूर्वी, रामनाथन कृष्णन (१९५४, विम्बल्डन), रमेश कृष्णन (१९७९, फ्रेंच ओपन) आणि लिएंडर पेस (१९९०, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन) यांनी ग्रॅण्ड स्लॅमचे युवक गटाचे विजेतेपद पटकाविले आहे. युकीवरही आता अपेक्षांचे ओझे लादून फुकटचे सल्ले देण्यासाठी चढाओढ सुरू होईल. त्याचा संयमाने सामना करून ‘सव्‍‌र्ह अ‍ॅण्ड व्हॉली’ खेळातील एकाग्रता ढळू न देण्याचे कोर्टबाहेरील आव्हान पेलणे, हेच युकीच्या यशोगाथेसाठी निर्णायक ठरेल.