Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९

विविध

पाकिस्तानच्या कारवायांना सडेतोड उत्तर-सोनिया
सिल्वासा, दादरा नगर हवेली, ४ फेब्रुवारी/पीटीआय

पाकिस्तानने आमचा देश दहशतवादी कारवाया करून कमकुवत करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल, असा खणखणीत इशारा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येथे दिला.
श्रीमती गांधी आज येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना म्हणाल्या की, पाकिस्तानने भारताच्या एकता व अखंडतेला बाधा आणण्याचा प्रयत्न करू नये. सर्व धर्माचे लोक आमच्या देशात गुण्यागोविंदाने नांदत आहेत, ही सहजीवनाची शिकवण फार महत्त्वाची आहे.

तुळस करणार ‘ताजमहाल’चा प्रदूषणापासून बचाव
लखनौ, ४ फेब्रुवारी/पीटीआय

तुळशीचे औषधी गुणधर्म सर्वानाचा माहीत आहेत, त्यामुळे आयुर्वेदातील अनेक औषधांमध्ये तिचा वापर केला जातो, पण आता या विस्मयकारी वनस्पतीचा आणखी एक गुण पुढे आला असून, आग्रा येथील ताजमहालला पर्यावरणाच्या प्रदूषणापासून वाचवण्यासाठी तुळशीच्या रोपांची लागवड केली जाणार आहे. पांढराशुभ्र असलेला ताजमहाल आजूबाजूच्या परिसरातील कारखान्यांच्या प्रदूषणामुळे गेल्या काही वर्षांत काळवंडत चालला आहे. मुघल सम्राट शहाजहान याने त्याची प्रिय पत्नी मुमताज महल हिच्या स्मृती जतन करण्यासाठी ताजमहालची निर्मिती केली. मुघल स्थापत्यशास्त्राचा तो अनोखा आविष्कार असून, युनेस्कोनेही या वास्तूला हेरिटेज साइटचा दर्जा दिला आहे. चांदण्या रात्री ताजमहालचे लावण्य खूपच खुलून दिसते त्यामुळे पर्यटकांसाठी ते खास आकर्षण आहे.

वाजपेयी न्यूमोनियाने आजारी; प्रकृती स्थिर
नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी/पीटीआय

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्वसननलिकेच्या संसर्गामुळे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले असून, त्यांना बराच तापही चढला होता. त्यांना न्यूमोनिया झाला असला तरी आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले, की आणखी तीन ते चार दिवस त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येईल. एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डी. के. शर्मा यांनी सांगितले, की त्यांची सर्वसाधारण वैद्यकीय स्थिती स्थिर आहे. कालची रात्र त्यांना पूर्ण विश्रांती मिळाली. त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्या छातीतील कफ कमी झाला आहे, तरीही तीन-चार दिवस त्यांना निरीक्षणाखाली ठेवले जाईल. भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले वाजपेयी ८४ वर्षांचे आहेत. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेले नसून शेजारच्या खोलीत दाखल करण्यात आले आहे. त्यांचा श्वासोच्छ्वास सुरळीत चालू आहे. डॉ. संपतकुमार, डॉ. व्ही. के. बहेल, डॉ. एन. बी. पद्मा व छातीरोगतज्ज्ञ डॉ. रणदीप गुलेरिया आदी डॉक्टरांचे पथक वाजपेयींची काळजी घेत आहे.वाजपेयी यांच्या सर्वसाधारण वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यात काहीही आढळून आले नाही. काल रात्री त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशिवाय कुणालाही त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

करचुकवेगिरीचा आरोप असलेल्या डॅशल, किलफर यांची ओबामा मंत्रिमंडळात वर्णी नाही
वॉशिंग्टन, ४ फेब्रुवारी/पीटीआय

करचुकवेगिरीचे आरोप असूनसुद्धा अमेरिकेच्या आरोग्यमंत्रीपदी तसेच ओबामा सरकारच्या चीफ परफॉर्मन्स ऑफिसरपदी टॉम डॅशल व नॅन्सी किफलर यांची नियुक्ती होऊ घातल्याने निर्माण झालेल्या वादळानंतर अध्यक्ष बराक ओबामा यांनी मोठय़ा पदांसाठी निवड करताना आपली चुक झाल्याचे मान्य केले. दरम्यान टॉम डॅशल व नॅन्सी किफलर या दोघांनीही आता आपापल्या पदांची सूत्रे स्वीकारणार नसल्याचे ओबामांना कळविले आहे.
या घटनेने ओबामा यांना राजकीय धक्का बसला आहे. अमेरिकेच्या आरोग्यपदाची सुत्रे आपण स्वीकारणार नसल्याचे टॉम डॅशल यांनी बराक ओबामा यांना कळविले. डॅशल यांचा हा निर्णय आपण जड अंत:करणाने मान्य केला असल्याचे बराक ओबामा यांनी यासंदर्भात प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. डॅशल यांनी आजवर सार्वजनिक क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आपल्याकडून झालेली चुक कबुल करण्याचे धैर्य टॉम डॅशल यांनी दाखविले. पण या एका चुकीमुळे डॅशल यांनी आजवर केलेली अन्य चांगली कामे नजरेआड करता येणार नाहीत अशी स्तुतीसुमनेही त्यांच्यावर ओबामा यांनी उधळली आहेत.ओबामा सरकारच्या चीफ परफॉर्मन्स ऑफिसरपदी नियुक्ती होणार असलेल्या नॅन्सी किलफर यांच्यावरही करचुकवेगिरीचे आरोप करण्यात आले होते. किफलर यांनीही या पदाची सूत्रे आपण स्वीकारणार नसल्याचे ओबामा सरकारला कळवून माघार घेतली. त्यानंतर काही तासांतच टॉम डॅशल यांनीदेखील अशा प्रकारचा निर्णय जाहीर केला.

गुजरातची फरार मंत्री कॅबिनेट बैठकीलाही अनुपस्थित
अहमदाबाद, ४ फेब्रुवारी / पी. टी. आय.

गोध्रा हत्याकांडानंतर झालेल्या क्रूर हल्ल्यासंदर्भातील ताज्या चौकशीत हव्या असलेल्या गुजरातच्या मंत्री माया कोदनानी आजच्या कॅबिनेटच्या बैठकीलाही अनुपस्थित होत्या. मात्र या जातीय दंगलीतील सहभागाबद्दल दोघा पोलीस अधिकाऱ्यांची आज चौकशी करण्यात आली. गुजरातच्या या प्रकरणाची फाईल नव्याने उघडण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालयाने विशेष चौकशी पथक नेमले आहे. या प्रकरणात गुजरातच्या उच्चशिक्षण खात्याच्या राज्यमंत्री माया कोदनानी यांची महत्त्वपूर्ण भूमिका असून, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फरारी घोषित केले आहे. आज मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीला त्या गैरहजर होत्या. त्यांच्या सचिवाने त्या दौऱ्यावर असल्याचे सांगितले.

भारतीय पाणबुडीला चिनी युद्धनौकांनी रोखून धरले
भारतीय नौदलाचा मात्र इन्कार
नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

चाचेगिरीला पायबंद घालण्यासाठी एडनच्या आखातामध्ये गस्त घालीत असलेल्या भारतीय नौदलाच्या पाणबुडीला चीनच्या युद्धनौकांनी रोखून धरल्याची घटना गेल्या १५ जानेवारी रोजी घडली आहे. चीनी प्रसारमाध्यमांनी तशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. मात्र भारताने असे काही घडले नसल्याचे स्पष्ट केले आहे. चीनी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानूसार दोन्ही देशांच्या नौदलातील हा पाठशिवणीचा खेळ तब्बल एक तास सुरू होता. या वृत्तात पुढे म्हटले आहे की, भारतीय पाणबुडीचा चीनी युद्धनौकांनी माग काढला. त्यानंतर भारतीय पाणबुडीला रोखून पाण्याच्या पृष्ठभागावर येण्यास भाग पाडले. सुमारे एक तासभर या पाणबुडीला रोखून धरण्यात आले, भारतीय पाणबुडीला चीनी युद्धनौकांनी रोखून धरल्याच्या बातमीचा भारतीय नौदलाने इन्कार केला आहे. भारतीय पाणबुडी मलाक्का येथून सोमालियाकडे रवाना होत होती. त्यावेळी या पाणबुडीचा चीनी युद्धनौका माग काढत होत्या. यात वेगळे असे काहीच नाही. असे निरीक्षण सर्वत्र नेहमीच केले जाते. भारताच्या सागरी हद्दीजवळून जाणाऱ्या सर्व जहाजांवर भारतीय नौदलही बारीक नजर ठेवून असते असेही भारतीय नौदलाने म्हटले आहे.
चीनने पहिल्यांदाच आपल्या दोन युद्धनौका सोमालिया परिसरातील सागरी हद्दीत गस्त घालण्यासाठी पाठविल्या होत्या. भारताची एक युद्धनौका गेल्या तीन महिन्यांपासून गस्त घालत आहे.

श्रीलंकेमध्ये बॉम्बहल्ल्यात ५२ नागरिक ठार
कोलंबो, ४ फेब्रुवारी/पीटीआय

एलटीटीईच्या व श्रीलंका लष्कर यांच्या दरम्यान सुरू असलेल्या चकमकीदरम्यान उत्तर वन्नी भागातील एका रुग्णालयावर आज सलग चौथ्या दिवशीही हल्ले चढविण्यात आले. आज या रुग्णालयावर क्लस्टर बॉम्बने हल्ला चढविण्यात आला. रुग्णांना लष्करी जवान सुरक्षित स्थळी हलवित आहेत. दरम्यान वन्नी भागातील सुरंथपुरम भागामध्ये मंगळवारी संध्याकाळी झालेल्या बॉम्बहल्ल्यात ५२ नागरिक मरण पावल्याचे सांगण्यात आले. पुथूक्कूडियीरापू भागामध्ये असलेल्या एका रुग्णालयाच्या इमारतीवरही गेल्या रविवारपासून अनेकदा बॉम्बवर्षांव झाला.

यक्षगान कलाकार शंभू हेगडे कालवश
कारवार, ४ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

आपले सर्व आयुष्य यक्षगान या नाटक परंपरेसाठी वाहून घेणारे व संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार विजेते ज्येष्ठ कलाकार केरेमाने शंभू हेगडे यांचे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जेव्हा यक्षगानचा प्रयोग चालू होता त्याचवेळी त्यांच्यावर हृदयविकाराचा हा दुर्दैवी हल्ला झाला. ७० वर्षीय हेगडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व कन्या असा परिवार आहे. येथील इडागुंजी देवळामध्ये लव-कुश या यक्षगान नाटकामध्ये हेगडे हे त्यांची प्रभू रामचंद्राची आवडती भूमिका साकारत होते. त्याचवेळी रंगभूमीवर त्यांचे देहावसान झाले. त्यांचे वडील शिवराम हेगडे हे स्वत: यक्षगान नाटय़कलेचे मोठे उपासक होते. इडागुंजी महागणपती यक्षगान मंडळी या संस्थेची स्थापना करून त्यांनी दक्षिणेची ही नाटय़कला एकूण ३२ देशांमध्ये पोहोचविली होती. परंपरेचे पालन करतानाच या कलेमध्ये हेगडे यांनी काही खास प्रयोगही साकारून दाखविले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी शंभू हेगडे यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

किरण बेदींवरील माहितीपटाला दोन पुरस्कार
सिलिकॉन व्हॅली, ४ फेब्रुवारी/पी.टी. आय.

मुंबईतील धारावी झोपडपट्टीचे वास्तव चित्रण करणाऱ्या ‘ स्लमडॉग मिलेमिअर’ या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविला असतानाच ‘यस मॅडम सर’ या भारतीय माहितीपटाने सांता बार्बरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दोन मानाचे पुरस्कार पटकाविले आहेत. हा माहितीपट भारतातील पहिला महिला ‘आयपीएस’ अधिकारी किरण बेदी यांच्या जीवनावर आधारित आहे. ‘सिलिकॉन व्हॅली’ मध्ये सुरू असलेल्या ‘सांता बार्बरा’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देशविदेशातील अनेक चित्रपटांचा समावेश करण्यात आला असून ‘यस मॅडम सर’ हा माहितीपट सर्वाच्या आकर्षणाचा विषय ठरला होता. या माहितीपटात किरण बेदी यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. किरण बेदी यांनी पोलिस अधिकारी म्हणून केलेले काम तसेच त्याकाळात केलेला संघर्ष या माहितीपटात उलगडण्यात आला आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी तसेच पत्नी आणि एक आई अशी किरण बेदी यांची विविध रुपे यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत विशेष म्हणजे या माहितीपटाचे दिग्दर्शन मेगान डोनमन या ऑस्टेलियन नागरिकाने केले आहे. त्यासाठी त्यांनी तब्बल सहा वर्षे सातत्याने भारताचा दौरा केला होता. या माहितीपटाने सांता बार्बरा ‘सोशल जस्टीस पुरस्काराबरोबरच एक लाख अमेरिकन डॉलर्सही पटकाविले आहेत.