Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९

‘बा बहू और बेबी’ या मालिकेत फक्त एका एपिसोडपुरता त्याचा रोल होता. परंतु तेवढय़ा छोटय़ा रोलमध्ये त्याने आपली छाप पाडली आणि दिग्दर्शकाने त्याचा रोल आणखी वाढवला. मालिका लोकप्रिय होत असताना त्याचा ‘राज्जा’ या घरातील नोकराचा रोलही लक्षात राहत होता. मात्र एकदा लोकलमधून शुटिंगसाठी जाताना ‘मराठी माणूस हिंदीत नोकराचेच काम करणार’ असा टोमणा काहीजणांनी मारला आणि त्याचक्षणी त्याने ती मालिका सोडली. यापुढे चांगला रोल असेल तरच हिंदीत काम करण्याचा त्याने निश्चय केला आणि तसा निश्चय करण्यामुळे त्याचे काहीच बिघडत नव्हते. कारण सध्या तो मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट या तीनही क्षेत्राचा हुकमी एक्का बनला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तो ‘टीआरपी’ मिळवून देणारे चलनी नाणे झाला आहे. त्याचा उत्स्फूर्त अभिनय, जबरदस्त टायमिंग, थोडासा चिरका आवाज, त्याची देहबोली आणि त्याचा सर्वसाधारण चेहरा याच्या जोरावर त्याने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. लोकांना तो आपल्यापैकीच एक वाटतो आणि म्हणूनच बकुळा नामदेव घोटाळे, जत्रा, जबरस्त आणि दे धक्का या त्याच्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांनी उचलून धरले. सिद्धार्थ जाधव.. उर्फ सिद्धू हा कम्प्लिट एंटरटेनर आहे. अगदी फिल्मस्टार गोविंदाप्रमाणे. समोर कुठल्याही ताकदीचा अभिनेता असो गोविंदा प्रत्येक सीनमध्ये आपली छाप पाडून जाणारच. तसेच काहीसे सिद्धूचे आहे. अगदी ‘गोलमाल’चेच उदाहरण घ्या. अजय देवगण, अर्शद वार्सी, शर्मन जोशी आणि तुषार कपूर आदी दिग्गज मंडळी चित्रपटात असतानाही सिद्धूचा गुंडाचा छोटासा रोलही लोकांच्या लक्षात राहिला. आज सिद्धूकडे प्रचंड काम आहे. शुटिंगच्या तारखा अ‍ॅडजस्ट करताना त्याची कसरत होतेय. हे सगळे करत असताना थिएटरला तो विसरलेला नाही. ‘जागो मोहन प्यारे’ या यशस्वी नाटकाचे हजार प्रयोग करण्याचा त्याने विडा उचललाय. ‘हिरो’ म्हणून त्याचे आणखी काही चित्रपट येताहेत. एका चित्रपटात तर त्याने गाणेदेखील गायले आहे. मुंबईत सध्या हक्काच्या घरात राहत असला तरी शिवडीतील पूर्वीच्या लहान झोपडय़ात त्याच्या असंख्य आठवणी दडल्या आहेत. सध्या तो महिंद्रच्या ‘लोगन’ गाडीतून फिरतोय. मात्र खच्चून भरलेल्या लोकलमधून केलेला प्रवास त्याच्या अजूनही लक्षात आहे. चित्रपटसृष्टीत अनेक मोठय़ा व्यक्तींमध्ये त्याची उठबस आहे. मात्र आपल्या जुन्या सवंगडय़ांची साथ त्याने अद्याप सोडलेली नाही. किंबहुना त्यांना बरोबर घेऊन तो नाटक करतोय. जसा पडद्यावर तसाच पडद्यामागेही. स्वभावात, वागण्यात, बोलण्यात काहीच फरक नाही.. आणि म्हणूनच तो सगळ्यांचा लाडका आहे. लाडका सिद्धू.. आपला सिद्धू..!

इंडियन आयडॉलच्या सेटवर सोनू आणि कैलाशची धमाल
कैलाश खेर या आपल्या आवडत्या गायकाबरोबर गाण्याची इच्छा असल्याचे सोनू निगमने ‘इंडियन आयडॉल’च्या सेटवर गेल्या आठवडय़ात सांगितले होते. त्याप्रमाणे सोनूने यावेळी ‘इंडियन आयडॉल’ला पुन्हा भेट दिली आणि या दिग्गजांनी ‘या रब्बा’ हे गाणे उपस्थितांना ऐकविले. सोनू निगम सेटवर असताना धमाल उडवणार हे सांगायला नकोच. पण यादरम्यान, हिंदी चित्रपट सृष्टीवर ज्यांच्या आवाजाची जादू आजही कायम आहे अशा मोहम्मद रफी, किशोर कुमार, तलत मेहमूद, हेमंत कुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर या गायकांच्या आठवणींना उजाळा देताना त्याने, सध्या एवढय़ा मोठय़ा संख्येने उत्कृष्ट गायक नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. सोनू निगमसारखे कौशल्य फारच कमी जणांकडे आहे. शिवाय आपली कला इतरांबरोबर वाटणारेही विरळाच आहेत. सोनू निगम याने व्यक्त केलेल्या भावनांनी सगळे स्पर्धक भारावून गेले होते. गेल्या वेळी सोनूने दिलेल्या टिप्समुळे स्पर्धकांच्या गाण्यात सुधारणा झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळेच यावेळी सर्व स्पर्धकांनी सोनूचीच गाणी गाऊन ‘इंडियन आयडॉल’चा हा भाग सोनू निगमला अर्पण केला. म्हणूनच सोनू निगम वेगळा ठरतो. सोनू निगम आणि कैलाश खेर यांना शुक्रवारी रात्री ९ वाजता एकाच व्यासपीठावर पाहण्याची संधी सोनी एन्टरटेन्मेंट टेलीव्हीजनवर मिळणार आहे.
प्रतिनिधी

‘डॉग मूव्ही’
कुत्र्यांवर आधारलेले, लहान मुलांना आकर्षित करणारे चित्रपट हॉलीवूडसाठी नवे नाहीत. ‘मार्ली अ‍ॅन्ड मी’चे वेगळेपण हे की, केवळ लहान मुलांसाठी हा चित्रपट बनविलेला नाही, तर कुटुंबातील सर्व वयातील व्यक्तींना आवडेल अशी त्याची रचना आहे. ख्रिसमसमध्ये संपूर्ण अमेरिकेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जोडीला लागलेल्या (आणि पुढे ऑस्करसाठी १३ नामांकने मिळविणाऱ्या ) ‘क्यूरिअस केस ऑफ बेंजामिन बटन’लाही बॉक्स ऑफिसवर मागे टाकले. त्याचबरोबर ख्रिसमसच्या दिवशी १४.७५ दशलक्ष डॉलरच्या तिकीटविक्रीचा नवा विक्रमही नोंदविला. (यापूर्वी २००१ साली विल स्मिथच्या ‘अली’ या अ‍ॅक्शनपटाची ख्रिसमसच्या दिवशी सर्वाधिक तिकीटविक्री झाली होती.) जॉन ग्रॉगन यांच्या ‘मार्ली अ‍ॅन्ड मी’ या नावाच्या आत्मचरित्रावरून चित्रपट बेतला आहे. विनोदासाठी गेली काही वर्षे ओळखल्या जाणाऱ्या ओवेन विल्सन आणि जेनिफर जेनिफर अ‍ॅनिस्टन यांची चित्रपटात मुख्य भूमिका आहे. डेव्हिड फ्रँकेल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातखोडसर कुत्रा आपल्या कृतींमधून घरातील सर्वांना चांगले आयुष्य जगण्याचे धडे देतो, यावर चित्रपटाचे कथानक आहे. संपूर्णपणे कौटुंबिक विनोदीपट म्हणून या चित्रपटाकडे पाहता येईल.