Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९

लोकमानस

शाळेची घंटा होते.. आणि अभ्यासाऐवजी गाणी सुरू होतात.. याची मराठी प्रेक्षकांना सवय होऊन गेली आहे. पण शाळेच्या घंटेनंतर होणाऱ्या या मनोरंजनाला कालमर्यादा आहे.. ‘आयडिया सारेगमप लिटल् चॅम्पस्’ या ‘झी मराठी’वरील स्पर्धात्मक कार्यक्रमाची महाअंतिम फेरी रविवारी होणार आहे. या कार्यक्रमाविषयीचे हे खास लोकमानस!

याही वीरांचे स्मरण करू..

 

२६ व २७ जानेवारी रोजी ‘झी मराठी’वरील ‘आयडिया सारेगमप..’मध्ये प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘शूरा मी वंदिले’ हा हृदयनाथ मंगेशकर यांनी सादर केलेला कार्यक्रम पाहिला. या कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या आणि शाहीर अमरशेख यांच्या गायकीने गाजलेल्या ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ या गीताने झाली. हे गीत ऐकताना अंगावर रोमांच उभे राहत. ही कविता डमडमच्या तुरुंगात प्राणांतिक उपोषण करणाऱ्या अहिंसक स्वातंत्र्यवीरांवर कुसुमाग्रजांनी केलेली आहे.
क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडु द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली तुज देती बळीच आव्हान
बलशाली मरणाहुन आहे अमुचा अभिमान
मृत्युंजय आम्ही, आम्हाला कसले कारागार?
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

या सत्याग्रहींनी उपोषणाच्या मार्गानी आत्मबल म्हणजे काय ते दाखविले. हा गांधीजींचा मार्ग होता. हातात काठी किंवा बंदूक नसतानासुद्धा क्रूरात्म्यांशी लढता येते हे गांधीजींनी आम्हाला दाखवले. धाराणसा येथे बेछूट लाठीमारामुळे डोकी फुटत असली तरी न भिता हे शूर अहिंसक योद्धे निर्भय मनाने मीठ उचलायला जातच होते. असले प्रसंग भारतात त्या काळी ठिकठिकाणी घडून आले. ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ असे म्हणत अहिंसेची टिंगल करणाऱ्या व्यक्ती कधी रणात उतरल्याच नाहीत!
प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात फक्त सावरकर आणि क्रांतिकारी मंडळी दाखविणे आणि इतर नेत्यांना अनुल्लेखाने गाळणे हे इतिहास कच्चा असल्याचे लक्षण आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, जतिन दास या क्रांतिकारकांनी आम्हाला ‘राजकीय कैदी’ म्हणून वागणूक द्या, यासाठी प्राणांतिक उपोषण आरंभले. साठ दिवस होऊन गेले तरी हे वीर मागे हटले नाहीत. त्यात जतीन दास मरण पावला. तेव्हा ब्रिटिश सरकारने त्यांच्या मागणीचा विचार करण्यासाठी एक समिती नेमली होती. अहिंसात्मक आणि हिंसात्मक मार्गानी भारतीय देशभक्त ब्रिटिशांबरोबर लढले, त्यात कोण उजवा आणि कोण डावा, असा फरक करता येणार नाही. मीठ उचलण्यासाठी जे नि:शस्त्र वीर सत्याग्रह करायला निघाले होते त्यांचे वर्णन एका पोवाडय़ात कवी वसंत बापट यांनी पुढीलप्रमाणे केले आहे-
ही छाती आहे उघडी, छातीत धडाडी निधडी
चल गोऱ्या बंदूक झाडी, रक्ताने अमुच्या भिजता।
ती पवित्र होईल माती।।
असो, लिटिल चॅम्प्सचे गुणगान करावे तेवढे थोडेच आहे.

लीलाधर हेगडे,
साने गुरुजी आरोग्यमंदिर, सांताक्रूझ, मुंबई

अनाठायी चर्चा नको, बंधुभाव वाढवू
‘२६-११’ च्या पाश्र्वभूमीवर २६ जानेवारी रोजी सादर झालेल्या ‘शूरा मी वंदिले’ या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून शहीदांच्या परिवारांतून आम्ही काही जण कार्यक्रमास उपस्थित होतो. प्रसारणानंतर, ‘कार्यक्रम छान झाला. तुमच्या प्रतिक्रिया समजल्या’ अशा आशयाचे असंख्य फोन आले. आम्ही उपस्थित असल्याचं समाधान वाटले. मात्र काही प्रतिक्रिया वाचून मन विषण्ण झाले. वाटले आता देश कोणत्या परिस्थितीतून जात आहे? अशा वेळी ही चर्चा अनाठायी नाही का? अशा चर्चेतून नव्या पिढीसमोर आम्ही कोणता आदर्श ठेवत आहोत?
स्वातंत्र्यानंतर चार युद्धे व असंख्य ऑपरेशन्समध्ये किती सैनिक वा सैनिक अधिकारी कामी आले! या साऱ्यांची जात, पात, धर्म कोणता होता? ते होते केवळ ‘भारतीय’, स्वत:च्या जिवाची बाजी लावून शत्रूला भिडणारे. गेली २० वर्षे तर छुप्या युद्धाशी वा दहशतवादाशी त्यांना रोजच लढावे लागत आहे.
देशाच्या समोरच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी तेच उत्तर आहे- लढाऊ वृत्तीने त्यांना भिडणे. ‘लोकमानस’मधील पत्रातून ज्या नावाचा उल्लेख झाला ती सारी नावेच वंदनीय. या व अशा असंख्य जणांवर वारंवार कार्यक्रम व्हायला हवेत. आपली प्रत्येक उक्ती व कृती देशहिताची आहे याची काळजी घेतली जावी. उदा. अंडरवर्ल्डच्या पाटर्य़ाना उपस्थित राहणाऱ्या कलाकारांवर बहिष्कार.
हृदयनाथ मंगेशकर, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते या साऱ्यांविषयी आम्हाला आदर आहेच. मात्र या निमित्ताने मनात दाटलेली एक बोच व्यक्त झाली. स्वातंत्र्य रक्षणासाठीदेखील अनेक पराक्रम केले गेले. बलिदाने झाली. शौर्यगाथा लिहिल्या गेल्या. मात्र मराठी कलाकार वा साहित्यिक यांनी यासंबंधात काय केले? उत्तर निराशाजनक आहे. मुंबईत दहशतवाद्यांशी सामना करताना वयाच्या ऐन पंचविशीत प्राणांची बाजी लावणारे आहेत एकूण वीस जण. मात्र स्व. श्री. ना. पेंडसे यांच्यासारखा अपवाद वगळता, कोणत्याही शहीदाच्या परिवाराला एखादा साहित्यिक, कलाकार वा क्रिकेटवीर यांनी भेट दिली नाही वा सहसंवेदना व्यक्त केल्या नाहीत. मग चित्रपट, मालिका, नाटके यांची बातच सोडा.
मुद्दा एवढाच, की यापुढे किमान शिळ्या कढीला ऊत आणणे, एखाद्याला नावे ठेवणे थांबवूया. तलवारीला धारदार शब्दांची वा नव्या प्रभावी माध्यमांची साथ देऊया. राष्ट्रीय चारित्र्याचे नागरिक घडावे म्हणून आपापसातील मतभेदांना पूर्णविराम देऊया. शौर्य, पराक्रम व त्यागाचा नवा इतिहास आपण आणि आपली पुढची पिढी घडवेल हे पाहूया.
आणखी एक, लिटिल चॅम्प्स्चे पाय जमिनीवर राहतील, असे पाहूया.
अनुराधा गोरे, ग्रेस आचार्य, श्री वैद्य
(उपस्थित शहीद परिवार)

केवढा हा कुत्सितपणा!
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संकल्पनेतून सादर झालेल्या कार्यक्रमाविषयी काही जणांना बराच राग आलेला दिसतो. एका पत्रलेखकाने त्यांना ‘तथाकथित पंडित’ असे म्हटले आहे. ते चुकीचे आहे. हृदयनाथ यांच्याएवढी अपूर्व सांगीतिकता आज हयात असणाऱ्या संगीतकारांकडे क्वचितच आढळते. त्यांची हिंदी-मराठी गाणी अवघड चालींची असतात.
संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या रचना तसेच संत मीराबाई यांचे ‘चला वाही देस’ अशा कितीतरी रचना हृदयनाथांनी अजरामर केलेल्या आहेत. ज्यांना ते ‘पंडित’ नाहीत, असे वाटते, त्यांनी फार तर त्यांना तसे म्हणू नये; पण सरकारने त्याच दिवशी त्यांचा ‘पद्मश्री’ देऊन गौरव केला, याचा तरी विसर पडू देऊ नये.
शेखर भिडे, पुणे

द्वेषमूलक टीका
गेल्या काही दिवसात ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होणारी पत्रे वाचली. ‘सारेगमपचे पंचप्राण’ हा अतिशय बहारदार आणि सर्वागसुंदर अग्रलेख काही दिवसांपूर्वी आपणच लिहिला होता. अशा या वृत्तपत्रात २६ जानेवारी निमित्ताने ‘झी मराठी’वर झालेल्या सलग दोन कार्यक्रमांचे निमित्त करून त्यावर एवढी वाद-चर्चा व्हावी, हे मनाला खटकणारे आहे. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये सादर केली गेलेली गाणी स्वत: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी बसवून घेतली होती. ती सर्व त्यांनी आणि मंगेशकर भगिनींनी यापूर्वी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली होती. हृदयनाथ हे स्वत:ची गाणी बसवून घेतात यात खटकण्याजोगे काय आहे, ते कळत नाही.
सुधीर फडके वा श्रीनिवास खळे यांची गाणी हृदयनाथ यांनी बसवून घ्यायला काय हरकत होती, असा मुद्दा उपस्थित झाला, तर ते चुकीचे नाही, पण कलाकाराला गाणी निवडायचे स्वातंत्र्य असायला हरकत नसावी. त्यातून ही गाणी कणसूर, भिकार आणि देशविघातक वळणाची असती, तर या टीकेला काही अर्थ होता. तसे नव्हते, त्यामुळे ही टीका व्यर्थच आणि द्वेषमूलक आहे, यात शंका नाही.
अविनाश पाटील, पुणे

संगीतप्रेमी व भाषाप्रेमींसाठी ‘तो’ एक सुखद अनुभव
२६ व २७ जानेवारी रोजी झी टी. व्ही.वरील ‘सारेगमप लिटल् चॅम्प्स्’च्या ‘बालविक्रमवीरांनी’ प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने सादर केलेला कार्यक्रम हा प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाने पाहिलाच पाहिजे, असा होता, यात शंकाच नाही. मूळ संकल्पना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची होती. मराठीत संतवाङ्मय हा जसा एक स्वतंत्र व समृद्ध प्रांत आहे त्याचप्रमाणे मराठी भाषेतील देशभक्तिपर वाङ्मय हादेखील साहित्य-काव्य-संगीत यांनी समृद्ध झालेला एक स्वतंत्र प्रांत ठरावा.
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स्’मध्ये हृदयनाथ मंगेशकर यांनी निवडलेले प्रत्येक गाणे काव्य, संगीत व स्वाभिमानादी भावनांच्या दृष्टीने श्रेष्ठ असेच होते. समर्थ रामदास स्वामी व कवी भूषण यांच्यासारख्या सतराव्या शतकातील कवींपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज आणि शांताबाई शेळके इ. गेल्या शतकभरातील कवींच्या विविध कल्पना, विविध परिस्थितीतील विविध भावना साकार करणाऱ्या पण सर्वामध्ये निखळ देशभक्ती हाच गाभा असणाऱ्या कविता आणि त्यांचे संगीतही आनंदघन (लताबाई मंगेशकर) व हृदयनाथ यांच्यासारख्या उत्तुंग प्रतिभा लाभलेल्या संगीतकारांनी दिलेले. मग आणखी काय बोलावे? याशिवाय या कार्यक्रमाचे दुसरे एक मोठे वैशिष्टय़ मला जाणवले ते म्हणजे हृदयनाथांचे प्रत्येक गाण्यानंतरचे निवेदन. त्यांनी केवळ गाण्याच्या संगीताबद्दलच भाष्य केले नाही, तर प्रत्येक गीताचे रसग्रहण, त्या गीतामागची पाश्र्वभूमी आणि इतिहास याबद्दलही सविस्तर कथन केले. ते ऐकून कवितेला चाल देण्याआधी ते त्या कवितेचा ते किती विविध अंगांनी अभ्यास करीत असावेत याची कल्पना येते.
हृदयनाथांच्या निवेदनातील उत्कृष्ट माहितीबरोबरच आणखी एक अगदी प्रकर्षांने जाणवलेली गोष्ट म्हणजे शुद्ध पण त्याबरोबरच नेमका विचार व भाव व्यक्त करणारी त्यांची भाषा व शैली. एकूणच हा कार्यक्रम रसिकांच्या दृष्टीने एक सुखद अनुभव होता.
सलील कुळकर्णी, कोथरूड, पुणे

लिट्ल चॅम्प्सनी लळा लावला असा असा की..
संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्या लिट्ल चॅम्प्सनी प्रचंड लळा लावला आहे. आपल्या गोड निरागस आवाजाने मंत्रमुग्ध केले आहे. किती कौतुक करावे. खरंच कळत नाही! त्यांना मार्गदर्शन करणारे अवधूतदादा आणि वैशालीताई, त्यांची शूटिंगपूर्व तयारी करून घेणारे, त्यांच्यावर मेहनत घेणारे, सर्वानाच श्रेय दिले पाहिजे. त्यांच्या जोडीला त्यांचा वैयक्तिक विकास सर्वागीण दृष्टीने व्हावा म्हणून केले जाणारे प्रयत्न तर केवळ उत्कृष्टच!
२६ जानेवारीचा त्यांचा ‘शूरा मी वंदिले’ हा कार्यक्रम ‘झी मराठी’वर पाहिला आणि कौतुकाने मन भरून आले. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची या कार्यक्रमाची संकल्पना अभिमान वाटावा अशीच आहे. देशभक्तिपर कविता, सावरकरांच्या कविता, गाणी आपण नेहमीच ऐकत आलो आहोत, पण त्यापाठीमागचा अभ्यास, शब्दांचे अर्थ, चपखलपणे नेमका हाच शब्द कवितेत का आला हे आपल्याला, लहान मुलांना माहीत असतेच असे नाही. आपल्या लिट्ल चॅम्प्सनीही समजून उमजून गाणी गायली. कौतुकाने डोळ्यात पाणी आले.
विनीता कुलकर्णी, पुणे

खेळतील तुजभवती आमुचे हे आशीर्वाद
‘सारेगमप’चे पंचप्राण’ हा अग्रलेख (१४ जानेवारी) सर्व रसिक व जाणत्या महाराष्ट्राचे एकमुखी मत मांडणारा आहे. धन्यवाद.
अग्रलेख वाचताना कविवर्य राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांच्या ओळी सहजच आठवल्या. ते पत्ररूप काव्य गडकऱ्यांनी चिंतामणराव देशमुखांसाठी लिहिले १९ डिसेंबर १९१२ रोजी, म्हणजे जवळपास शंभर वर्षांपूर्वी. मात्र त्यातल्या भावना या ‘सारेगमप’ पंचप्राणांना तंतोतंत लागू पडतात. त्यातील काही ओळी अशा :
जे जे मंगल, दिव्य तसे जे, पुण्यही जे जगती
वृष्टी तयाची होवो, बाळा, सदैव तुजवरती ।।
विजयी भव, महदायुष्मान भव, चढवी यशोनाद,
खेळतील तुजभवती आमुचे हे आशीर्वाद ।।

या ‘पंचप्राणां’च्या निमित्ताने संपादकीयात मांडलेल्या प्रत्येक शब्दाला, भावनेला व अपेक्षेला संपूर्ण पाठिंबा देताना या अपेक्षा-मागणे यात भर घालत आहे. माझी खात्री आहे, की महाराष्ट्र याही मागण्यांशी सहमत होईल.
१) ‘सप्तसूर झंकारित बोले गिरिजेची वीणा’ अशी नांदी आहे. ‘सारेगमप’ पंचक खरे तर ‘निसा’ असे पूर्ण सप्तक होते. ज्या दोन मुलींना ‘निरोप’ दिला गेला त्या दोघीही या पंचकाहून कुठल्याही अर्थाने उण्या नव्हत्या. आता नियम शिथिल केलाच आहे, तर त्या दोघींना परत सन्मानाने बोलावून ‘सप्तक’ पूर्ण करावे.
२) वरील कविता गडकऱ्यांनी लिहिली त्या काळात मुलीने व/वा स्त्रीने जाहीर मंचावरून गाणे ‘भद्र’ समाजात आक्षेपार्ह मानले जाई. ही कोंडी फोडून स्त्रियांच्या गाण्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यात बदलत्या काळाचा वाटा आहेच; सोबत हिराबाई बडोदेकरांना तितकेच श्रेय जाते. ‘गाणारी’ म्हणजे तमाशातली अथवा कोठेवाली ही प्रतिमा पुसून घरंदाज, शालीन व ताकदीचे गाणे रंगमंचावर गावोगावी सादर करून गाणाऱ्या मुलीला समाजात कौतुकाचे व आदराचे स्थान मिळवून देण्यात हिराबाई यशस्वी झाल्या. या ‘सारेगमप’ सात हिऱ्यात पाच मुली आहेत. हिराबाई भावगीते गात असत. ते सादर करणे/ न करणे हे कलाकाराच्या इच्छेवर ठेवत. ‘मागणे’ असे, की त्यांचे कृतज्ञ स्मरण जाहीररीत्या व्हावे. दूरचित्रवाणीच्या अशा ‘रिअ‍ॅलिटी’ शो वर सहसा संपादकीय लिहिले जात नाही. म्हणून ‘लोकसत्ता’चे पुन: अभिनंदन!
विश्वास दांडेकर, सातारा

पंचामृत!
आपल्या संस्कृतीत पांच या आकडय़ाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंचामृत, पंचरस, पंचनद्या (ग्राम) पंचायत, पंचतत्त्वे, पंचारती, पंचपक्वात्रे , पांडव, अगदी सारेगमप पाच अक्षरे इत्यादी सध्या झी मराठी या वाहिनीवर सादर होत असलेला सारेगमप लिट्ल चॅम्प हा कार्यक्रम म्हणजे जगातले फार मोठे आश्चर्य आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. ८ ते १४ या वयोगटातील मुले, मुली भल्या भल्या गायकांनासुद्धा तोंडात बोट घालावयाला लावत आहेत. ही सर्व मुले सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांचे नातेवाईक, वा त्यांचे आई-वडील हेच त्यांचे गुरू. त्यांना मिळालेले शिक्षण हे कुण्या मोठय़ा पंडिताकडून हजारो रुपये खर्च करून मिळालेले नाही.
कोणत्याही देवाला जो अभिषेक केला जातो, त्यात पंचामृताचे स्थान मोठे असते. दूध, दही, तूप, मध, साखर या पंचरसाने देवाला स्नान घातले जाते. या पंचरसापैकी एकाचीही कमरता असेल, तर या पंचामृताला योग्य ती गोडी येणार नाही. माझ्या मते प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैशंपायन हे सर्व पंचामृताचे मानकरी आहेत.
अमेरिकेत टीव्हीला इडियट बॉक्स म्हटले जाते. आपल्या येथल्या वाहिनीवरील मालिका किंवा इतर कार्यक्रम पाहताना, अमेरिकेचे मत योग्य असल्याचे जाणवते. सारेगमप लिट्ल चॅम्प हा एकमेव कार्यक्रम आहे, की ज्याने महाराष्ट्रातील काय, साऱ्या जगातील मराठी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अशी लोकप्रियता हमलोग, रामायण, महाभारत यांना लाभली होती. लोक स्वत:वरच बंधन घालत, या वेळेत घरी परतायचे व साऱ्या कुटुंबासोबत हे कार्यक्रम पाहायचे. मुलांच्या या कार्यक्रमाबाबतसुद्धा, सोमवार व मंगळवार रात्री ९.३० ते ११.०० ही वेळ राखून ठेवलेली असते.
आतापर्यंत या पाच जणांचे (खरे तर या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्वाचे) जेवढे कार्यक्रम झाले, त्याला संगीत क्षेत्रातील, बडय़ा बडय़ा दिग्गजांनी हजेरी लावली आणि भाग घेणाऱ्या सर्वाची मनापासून स्तुती केली. नुसती स्तुती केली नाही तर हात जोडले. सुरेश वाडकर यांनी त्यांना ही मुले म्हणजे गतजन्मीचे शापित गंधर्व असल्याचे सांगितले. ही मुले प्रत्यक्ष परमेश्वराचे वरदान घेऊन आलेले आहेत. त्यांच्या गाण्यावर मत व्यक्त करणे म्हणजे परमेश्वराचा अपमान केल्यासारखे होईल, असे शंकर महादेवन म्हणाले. आमच्या बाबांची गीते गायचे धारिष्टय़ आम्हालासुद्धा होत नाही, पण तुम्ही ती उत्तम प्रकारे गाता, तीही अगदी सहजपणे असे उषा मंगेशकर म्हणाल्या. ही सारी मते म्हणजे मुलांना मिळालेला फार मोठा पुरस्कार आहे.
खरे तर महाअंतिम फेरीत सर्वानाच समान क्रमांक द्यावा. पण अगदी स्पर्धा म्हणून क्रमांक काढायचेच असतील तर एकाला प्रथम क्रमांक व बाकी चौघांनाही द्वितीय क्रमांक द्यावा.
गंगाधर मेढेकर, औंध, पुणे