Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९

राज्यस्तरीय अ‍ॅबॅकस गणितीय स्पर्धेत सोलापूरच्या १२९ विद्यार्थ्यांना बक्षिसे
सोलापूर, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

चेन्नईच्या आयडियल प्ले अबॅकस इंडिया प्रा. लि. या संस्थेतर्फे पुणे येथे आयोजिलेल्या राज्यस्तरीय अबॅकस गणितीय स्पर्धेत सोलापूरच्या निशा अबॅकस अ‍ॅकॅडमीतील १२९ विद्यार्थ्यांनी विविध बक्षिसे पटकावली. या स्पर्धेत दोघाजणांना अजिंक्यपद मिळाले. तर २४ जण प्रथम, २५ जण द्वितीय, ३० जण तृतीय, २१ जण चौथ्या, १८ जण पाचव्या आणि ९ जण उत्तेजनार्थ बक्षिसांचे मानकरी ठरले.
संस्थेच्या संस्थापिका निशा सतीश दरक यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सर्व मुला-मुलींची येत्या १८ जुलै रोजी चेन्नईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या यशाबाबत सर्वत्र अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

काळम्मावाडी उजव्या कालव्याच्या गळती दुरुस्तीचे दोन कोटी पाण्यात
राधानगरी, ५ फेब्रुवारी / वार्ताहर

राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी उजव्या कालव्याची गळती रोखण्यासाठी केलेली जिओसिंथेटीक अस्तरीकरणाची उपाययोजना निकामी ठरली आहे. त्यावर खर्चलेले दोन कोटी रुपये पाण्यात गेले असतानाही पुढील अस्तरीकरणाचे काम चालूच आहे. त्यामुळे काळम्मावाडी प्रकल्पाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड आजही कायम आहे.काळम्मावाडी आंतरराज्य प्रकल्प हा बेसुमार भ्रष्टाचारामुळे गेली तीसपस्तीस वर्षे टीकेचा केंद्रिबदू बनला आहे. या प्रकल्पाच्या पायाभरणीपासून प्रत्येक घटकांनी वाहत्या आर्थिक गंगेत हात धुवून घेतले आहेत. या भ्रष्टाचारामुळे धरणाच्या मुख्य भितीसह कालव्यांना गळती लागून आसपासचे शेतकरी देशोधडीला लागले आहेत.

सोलापूर जिल्हा नियोजन समिती
महापौर वाकसे यांचा धक्कादायक पराभव
सोलापूर, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महापौर अरुणा वाकसे यांना मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. सोलापूर महापालिकेच्या (मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र) गटातून काँग्रेस आघाडीमध्ये दगाफटका होऊन त्याचा फटका खुद्द महापौरांनाच बसला असताना दुसरीकडे या दगाबाजीचा पुरेपूर लाभ घेत संख्याबळ नसतानाही भाजपचे सुरेश पाटील हे मोठय़ा मतफरकाने विजयी झाले. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत ४० पैकी ३३ उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले असून उर्वरित ७ जागांसाठी गेल्या मंगळवारी मतदान झाले होते.

कारंदवाडीच्या श्रमिक महिला बचत गटाला राजमाता जिजाऊ स्वावलंबन प्रथम पुरस्कार
शिरोळचा ताराराणी गट द्वितीय * शेटफळ (मोहोळ)चा विश्वतेज तृतीय
सातारा, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन पुणे विभागातील ‘राजमाता जिजाऊ स्वावलंबन प्रथम पुरस्कार’ सांगली जिल्ह्य़ातील कारंदवाडी (ता. वाळवा) च्या श्रमिक महिला बचत गटाने पटकावला आहे. द्वितीय क्रमांक कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिरोळच्या ताराराणी बचत गटाने व तृतीय क्रमांक सोलापूर जिल्ह्य़ातील शेटफळ (ता. मोहोळ) च्या विश्वतेजने मिळवला आहे. जि. प. अध्यक्ष भाग्यश्री भाग्यवंत यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली.

मुंबईत सहाजण पोलिसांच्या ताब्यात
व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या जोडगोळीचा शोध जारीच
कोल्हापूर, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी
येथील सराफी व्यावसायिक, मोबाईल शॉपीचे दुकानदार व अन्य काही व्यापाऱ्यांना आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डाच्या आधारे लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या ‘बंटी आणि बबली’चा शोध जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडून सुरू असून, मुंबई येथील दर्शन शहा याच्यासह सहाजणांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. मात्र पोलिसांनी अद्यापही रीतसर अटक कोणालाही केलेली नाही.

सांगलीत भाजप, सेनेचे धरणे
सांगली, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सांगली महापालिकेच्या स्टेशन चौकातील बीओटीचे बांधकाम तातडीने थांबवावे, बीओटीमधील नगरसेवक अधिकाऱ्यांकडून नुकसानभरपाईची वसुली करावी, अशी मागणी करीत भारतीय जनता पक्ष, शिवसेनेच्यावतीने गुरुवारी महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.सांगली महापालिका क्षेत्रातील मोक्याची जागा मातीमोल किंमतीने बिल्डरच्या घशात घातल्या असून बीओटीच्या नावाखाली या जागा विकल्या गेल्या आहेत. ही जागा विकण्यात जे नगरसेवक व अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करावी, स्टेशन चौकातील बीओटीचे बांधकाम त्वरित स्थगित करावी, तसेच स्टेशन चौकातील पदपथावरील बेकायदेशीर बांधकामाला पाठिंबा देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आले. या मागणीचे निवेदन आयुक्त दत्तात्रय मेतके यांना देण्यात आले.या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बजरंग पाटील, भाजपचे माजी नगरसेवक अनिल पाटील- सावर्डेकर, संदीप सुतार, अनिल शेटे, परशुराम गोयकर, प्रशांत चिपळूणकर, शंभोराज काटकर, प्रसाद रिसवडे, संजय काकडे, दीपक वाघमारे, रवी मोटे आदि सहभागी झाले.

पालिका आयुक्तांच्या निवासस्थानावर साडेतीन लाख अनाठायी खर्च?
कोल्हापूर, ५ फेब्रुवारी / विशेष प्रतिनिधी

सार्वजनिक उद्यानाची दुरुस्ती आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासनाने आयुक्तांच्या निवासस्थानावर ३ लाख ४९ हजार ४८० रुपयांचा बेकायदेशीर खर्च करण्यात आला आहे. हा खर्च संबंधितांकडून तातडीने वसूल करण्यात यावा अन्यथा याविरुद्ध जनजागृतीचे आंदोलन उभारले जाईल असा इशारा अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद मिराशी व दिलीप देसाई यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिला.कोल्हापूर शहरात ताराबाई पार्क येथे महानगरपालिकेच्या ताराबाई गार्डन या सार्वजनिक उद्यानालगत महापालिका आयुक्तांचे निवासस्थान आहे. या उद्यानाची संरक्षक िभत दुरुस्त करणे आणि विहीर बंदिस्त करणे यासाठी महापालिकेने ८ जुलै २००८ रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. प्रत्यक्षात या कामाचा निधी निविदेत नमूद केलेल्या कामासाठी न वापरता तो आयुक्तांच्या निवासस्थानासाठी खर्च करण्यात आला अशी माहिती उभयतांनी दिली. या कामासाठी तत्कालीन उद्यान अधीक्षकांनी संबंधित निधी हा आयुक्तांच्या निवासस्थानावर खर्च करण्यास हरकत नाही असा अभिप्राय दिला आणि तत्कालीन कनिष्ठ अभियंते बाबुराव दबडे यांनी हे काम पूर्ण करून घेतले. यामुळे दबडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असताना चौकशीपूर्वी त्यांना हजर करून घेणे हे या कामाचे बक्षीस होते की काय ? असा सवाल उपस्थित करताना उभयतांनी संबंधित पैशाची वसुली करण्याची मागणी केली आहे.

कराडला तोंडाच्या कर्करोगाचे मोफत तपासणी अभियान
कराड, ५ फेब्रुवारी/वार्ताहर

येथील पी. डी. पाटील प्रतिष्ठान, कराड नगरपरिषद, अंकलिशा स्माइल केअर क्लिनिक व सत्यसह्य़ाद्री श्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ फेब्रुवारीपासून तोंडाच्या कर्करोगाची मोफत तपासणी अभियान आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेस आमदार बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, कराड नगर पालिका शिक्षण मंडळाचे सभापती सुभाष पाटील, उपसभापती अमृत देशपांडे, उपनगराध्यक्ष सुभाष डुबल यांची उपस्थिती होती.अभियानांतर्गत प्राथमिक मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. वेदनाविरहित व अत्याधुनिक मशिनद्वारे तपासणी केली जाणार आहे. तसेच गंभीर आजारांबाबत मुंबईच्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये माफक दरात उपचार केले जाणार आहेत. आमदार बाळासाहेब पाटील यांनी लोकांमध्ये कर्करोगाबाबत जागरूकता राहावी, या हेतूने सुरू केलेले हे अभियान आरोग्यदृष्टय़ा चांगले काम साधेल असा विश्वास व्यक्त केला.

न्यूक्लिअर मेडिसिन अपडेट कार्यशाळा
सोलापूर, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

अश्विनी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र, सोसायटी ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन ऑफ इंडिया आणि डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात प्रथमच आयोजित ‘न्यूक्लिअर मेडिसिन अपडेट’ या विषयावरील कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद मिळाला. डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन अश्विनी रुग्णालयाचे उपाध्यक्ष डॉ. उमाकांत वरेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. सोसायटी ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन ऑफ इंडियाचे संचालक तथा मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमधील न्यूक्लिअर मेडिसिन विभागप्रमुख डॉ. बी.ए. कृष्णा, मुंबईच्या कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील न्यूक्लिअर मेडिसिन विभागप्रमुख डॉ. सौ. सरिता कोठाडिया, शरीरशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी.आर. कुलकर्णी आदींनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. डॉ. कृष्णा यांनी न्यूक्लिअर मेडिसिनची ओळख, न्यूक्लिअर अ‍ॅन्डोक्रायनॉलॉजी आणि आयसोटॉप्स व इन्फेक्शन याबाबत माहिती दिली, तर डॉ. सौमेन रे यांनी न्यूक्लिअर नेफ्रॉस-युरॉलॉजी, न्यूक्लिअर कार्डिऑलॉजी आणि न्यूक्लिअर ऑनकोलॉजी याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत अश्विनी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर्स, पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी, डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टर्स, वैद्यकीय प्राध्यापक, पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. डॉ. राजेंद्र घुली यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले.