Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

काळम्मावाडी उजव्या कालव्याच्या गळती दुरुस्तीचे दोन कोटी पाण्यात
राधानगरी, ५ फेब्रुवारी / वार्ताहर

 

राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी उजव्या कालव्याची गळती रोखण्यासाठी केलेली जिओसिंथेटीक अस्तरीकरणाची उपाययोजना निकामी ठरली आहे. त्यावर खर्चलेले दोन कोटी रुपये पाण्यात गेले असतानाही पुढील अस्तरीकरणाचे काम चालूच आहे. त्यामुळे काळम्मावाडी प्रकल्पाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड आजही कायम आहे.काळम्मावाडी आंतरराज्य प्रकल्प हा बेसुमार भ्रष्टाचारामुळे गेली तीसपस्तीस वर्षे टीकेचा केंद्रिबदू बनला आहे. या प्रकल्पाच्या पायाभरणीपासून प्रत्येक घटकांनी वाहत्या आर्थिक गंगेत हात धुवून घेतले आहेत. या भ्रष्टाचारामुळे धरणाच्या मुख्य भितीसह कालव्यांना गळती लागून आसपासचे शेतकरी देशोधडीला लागले आहेत. विधिमंडळात या विषयावर कित्येकवेळा लक्षवेधी होऊनही भ्रष्टाचार आजही राजरोस सुरू आहेच. धरणाची मुख्य भिंत व कालव्यांच्या दुरुस्तीवर कोटय़वधी रुपये खर्च होऊनही गळती कायम आहे.
उजव्या कालव्याची किलोमीटर १ ते २४ मधील गळती थांबवण्यासाठी तज्ज्ञ समितीने जिओसिंथेटिक पद्धती सुचविली होती. त्यानुसार पाच ते सात किलोमीटर दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर जिओसिंथेटिक अस्तरीकरणाची पद्धत अवलंबली आहे. या कामासाठी तत्कालीन पाटबंधारेमंत्री ना.रामराजे नाईक निंबाळकर यांनी सहा कोटींचा निधी मंजूर केला होता. त्या दरम्यान चारशे मीटरचे काम झाले होते. मात्र अतिवृष्टीच्या कालावधीत हे अस्तरीकरण पूर्णपणे उखडले गेले.
त्याठिकाणी मुख्य अभियंत्यांनी भेट घेऊन नवीन थर आंथरून त्यावर अस्तरीकरण करणे, टेक्स्टाईल काँक्रीटने सिलिंग करणे आदी कामे करण्यात आली.
या टेक्स्टाईलला पावसाचे अथवा बाहेरचे पाणी लागणार नाही. तसेच कालवा तळात चार मीटर अंतरावर छिद्रे व पट ठेवून पाणी येण्यास वाट ठेवली होती. परंतु या सर्व उपाययोजनांवर पाणी फिरले आहे. २००८-०९ मध्ये एक किलोमीटरचे काम पूर्ण झाले. गरवारे कंपनीला एक मीटरला वीस हजार रुपये निधी मिळतो. आत्तापर्यंतच्या दोन कोटी रुपयांवर पाणी फेरले गेले आहे. खासदार निवेदिता मानेंसह स्थानिक आमदार के.पी.पाटील यांनीही निधी मिळविण्यासाठी कधीही टोकाचे प्रयत्न केले नाहीत. झालेल्या भ्रष्टाचारावर वेळोवेळी ओरड होऊनही एकाही लोकप्रतिनिधीने ब्र शब्द उच्चारलेला नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे काळम्मावाडी प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू असलेली लूट कायम आहे. या प्रकल्पाला जमिनी देऊन प्रकल्पग्रस्त बनललेल्या शेतक ऱ्यांना आता डोक्याला हात लावून बसण्याशिवाय पर्याय नाही.