Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

सोलापूर जिल्हा नियोजन समिती
महापौर वाकसे यांचा धक्कादायक पराभव
सोलापूर, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महापौर अरुणा वाकसे यांना मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. सोलापूर महापालिकेच्या (मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र) गटातून काँग्रेस आघाडीमध्ये दगाफटका होऊन त्याचा फटका खुद्द महापौरांनाच बसला असताना दुसरीकडे या दगाबाजीचा पुरेपूर लाभ घेत संख्याबळ नसतानाही भाजपचे सुरेश पाटील हे मोठय़ा मतफरकाने विजयी झाले.
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत ४० पैकी ३३ उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले असून उर्वरित ७ जागांसाठी गेल्या मंगळवारी मतदान झाले होते. यात सोलापूर महापालिकेच्या तीन जागांच्या सर्वसाधारण गटातून महापौर सौ. वाकसे यांच्यासह सभागृहनेते महेश कोठे, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रा. डॉ. पुरणचंद्र पुंजाल, चेतन नरोटे व भाजपचे सुरेश पाटील हे पाचजण निवडणूक रिंगणात होते. तर ओबीसीच्या दोन जागांसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अ‍ॅड. यू.एन. बेरिया, सुनील खटके व जनसुराज्य शक्तीचे महादेव बिद्री यांच्यात लढत झाली. ९८ पैकी ९३ नगरसेवक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एक मत शंभर मूल्यांचे होते. पहिल्या पसंतीच्या २४ मतांचा कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी होणार, अशी रचना करण्यात आली होती. मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीत भाजपचे सुरेश पाटील यांनी ३१ मते पडली, तर चेतन नरोटे यांनीही २४ मतांचा कोटा पूर्ण केला. पहिल्या फेरीत महापौर वाकसे व प्रा. पुंजाल यांना प्रत्येकी फक्त १९ मते मिळाली. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली असता त्यात २४ मतांचा कोटा कोणीही पूर्ण शकले नाहीत. तेव्हा नियमानुसार भाजपचे पाटील यांच्या पारडय़ातील अतिरिक्त मते मोजण्यात आली असता काही मते प्रा. पुंजाल यांना पडल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी एम.जी. मांडुरके यांनी विजयी घोषित केले.
पालिका सभागृह नेते महेश कोठे हे निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी महापौर वाकसे यांच्यासाठी त्यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली होती. परंतु त्याचा फायदा त्यांना होऊ शकला नाही. श्री. कोठे यांना एक मत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे महापौरांना मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. महापालिकेच्या ओबीसीच्या दोन जागांवर काँग्रेसचे अ‍ॅड. यू.एन. बेरिया व सुनील खटके हे निवडून आले. या दोन्ही जागांसाठी ८२ मतांचा कोटा देण्यात आला होता. यात अ‍ॅड. बेरिया यांना ३७ तर खटके यांना ३४ मते पडली. जनसुराज्य शक्तीचे महादेव बिद्री यांना ७ मते पडली.
नगरपालिका गटातून सर्वसाधारण जागेवर राष्ट्रवादीचे संजय गोरे (कुर्डूवाडी) तर सर्वसाधारण महिला गटातून मंगल शेळवणे हे प्रत्येकी १४६ व १३१ मते मिळवून विजयी झाले.