Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

कारंदवाडीच्या श्रमिक महिला बचत गटाला राजमाता जिजाऊ स्वावलंबन प्रथम पुरस्कार
शिरोळचा ताराराणी गट द्वितीय * शेटफळ (मोहोळ)चा विश्वतेज तृतीय
सातारा, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

महाराष्ट्र शासन पुणे विभागातील ‘राजमाता जिजाऊ स्वावलंबन प्रथम पुरस्कार’ सांगली जिल्ह्य़ातील कारंदवाडी (ता. वाळवा) च्या श्रमिक महिला बचत गटाने पटकावला आहे. द्वितीय क्रमांक कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिरोळच्या ताराराणी बचत गटाने व तृतीय क्रमांक सोलापूर जिल्ह्य़ातील शेटफळ (ता. मोहोळ) च्या विश्वतेजने मिळवला आहे. जि. प. अध्यक्ष भाग्यश्री भाग्यवंत यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली.
स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या दारिद्रय़ रेषेखालील आदर्श व सक्षम स्वयंसाहाय्यता गटांना प्रोत्साहित करण्यासाठी देण्यात येणाऱ्या या पुरस्कारकाचे वितरण केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते येत्या शनिवारी सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर होणाऱ्या पुणे विभागातील महिला बचत गटांच्या भव्य मेळाव्यात करण्यात येणार आहे. राज्याचे ग्राम विकासमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास सातारा जिल्ह्य़ातील वीस व पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्य़ातून दहा ते पंधरा हजार असे मिळून सुमारे पस्तीस हजार महिला उपस्थित राहणार आहेत. विभागीय स्तरावरील तीन, जिल्हास्तरावरील तीन (पाचही जिल्ह्य़ांचे) विजेत्यांना रोख रक्कम स्वरूपात पुरस्कार, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर १० हजार रुपयांचा प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्य़ातील ताराराणी महिला बचत गट (शिरोळ) पुणे जिल्ह्य़ातील न्हावरे (ता. शिरूर) चा शिवशक्ती, सांगलीतील-कारंदवाडी (ता. वाळवा) चा श्रमिक सोलापूर शेटफळ (ता. मोहळ)चा विश्वतेज, सातारा- गुरेधर (ता. महाबळेश्वर) चा विजयालक्ष्मी बचत गटाचा समावेश आहे.
कार्यक्रम प्रशासनाचा, फायदा राजकारणासाठी
राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र शासनाच्या वतीने होत आहे. त्याचा आम्ही राजकारणासाठी जरूर फायदा करून घेणार असल्याचे यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील यांनी सांगितले. पुणे विभागातील महिलांच्या भव्य मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह जलसंपदा मंत्री अजितदादा पवार, रामराजे नाईक निंबाळकर, सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह पुणे विभागातील राष्ट्रवादीचे खासदार, आमदार, पुणे विभागाचे आयुक्त, सचिव जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाधिकारी, मुख्याधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या मैदानावर १८० बाय ४०० चा मंडप तर ५० बाय ४० चे भव्य व्यासपीठ उभारण्यात येत आहे. व्यासपीठावर मंत्री व पुणे विभागातील जि.प.चे अध्यक्ष आदी मान्यवर चाळीस लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ३५ हजार महिलांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक महिलेस सभेच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पिशवी देण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी त्या परत जाईपर्यंत घेण्यात येणार आहे.
म. फुले पुतळा अनावरण
म. फुले यांचे मूळगाव खटाव तालुक्यातील कटगूण येथे उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुतळ्याचे अनावरण येत्या २२ फेब्रुवारीस उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार असल्याचे नितीन भरगुडे पाटील यांनी यावेळी सांगितले. या समारंभास विजयसिंह मोहिते पाटील, अजितदादा व गृहमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभापती, वसंतराव मानकुमरे, शशिकांत पिसाळ, सुशीला साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पाटील, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एच. पी. मुळूक यावेळी उपस्थित होते.