Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मुंबईत सहाजण पोलिसांच्या ताब्यात
व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या जोडगोळीचा शोध जारीच
कोल्हापूर, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

येथील सराफी व्यावसायिक, मोबाईल शॉपीचे दुकानदार व अन्य काही व्यापाऱ्यांना आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डाच्या आधारे लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या ‘बंटी आणि बबली’चा शोध जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडून सुरू असून, मुंबई येथील दर्शन शहा याच्यासह सहाजणांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. मात्र पोलिसांनी अद्यापही रीतसर अटक कोणालाही केलेली नाही.
सुमारे तीन आठवडय़ांपूर्वी कोल्हापूरच्या गुजरी सराफ कट्टय़ावरील गुरुप्रसाद ज्वेलर्स या दुकानात एक युवक एका युवतीसह दागिने खरेदी करण्यासाठी आला होता. त्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचे दागिने खरेदी केले. हे सोने खरेदी करताना त्यांनी आपल्याकडे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असल्याचे सांगितले होते. सराफी व्यावसायिकांनी बँकेशी संपर्क साधला असता क्रेडिट कार्डवर दागिने देण्यास हरकत नसल्याचे सांगितल्यानंतर सराफाने त्यांना सुमारे तीन लाख रुपये किमतीचे दागिने दिले. त्यानंतर या जोडीने कोल्हापुरातील मोबाईल शॉपीमध्ये जाऊन सुमारे ६० हजार रुपये किमतीचे हँडसेट अशाच पद्धतीने खरेदी केले. त्यानंतर दसरा चौकातील तनिष्क ज्वेलर्समध्ये जाऊन तब्बल १६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा प्रयत्न केला. पण दुकानातील व्यवस्थापकांच्या हुशारीमुळे तनिष्क ज्वेलर्सची १६ लाख रुपयांची फसवणूक टळली.
अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या या जोडीने कोल्हापुरात लाखो रुपयांचा गंडा घालून पलायन केल्यानंतर संबंधितांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मग जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर तनिष्क ज्वेलर्समधील छुप्या कॅमेऱ्यांनी टिपलेले या जोडीचे छायाचित्र पोलिसांना उपलब्ध झाले. त्यानंतर या बंटी आणि बबलीचा शोध सुरू झाला. सराफाला गंडा घालताना त्यांनी दाखवलेले क्रेडिट कार्ड दर्शन शहा नावाच्या व्यक्तीचे होते. जुना राजवाडा पोलिसांनी मुंबई येथील दर्शन शहाच्या पत्त्यावर जाऊन त्याला व अन्य पाचजणांना ताब्यात घेऊन आज कोल्हापुरात आणले. त्यांच्याकडे आज दिवसभर कसून चौकशी सुरू होती. दर्शन शहा याच्या नावाचे क्रेडिट कार्ड या बंटी आणि बबलीकडे कसे आले हाच तपासाचा केंद्रिबदू असून, दर्शन शहाला या गुन्ह्य़ात अटक होण्याची शक्यता आहे.