Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

प्राथामिक चौकशी होण्यापूर्वीच लाचखोर पालिका अभियंता सेवेत दाखल
कोल्हापूर ५ फेब्रुवारी / विशेष प्रतिनिधी

 

बांधकाम परवान्यासाठी पैसे घेताना रंगेहाथ सापडलेले महापालिकेचे कनिष्ठ अभियंते बाबुराव दबडे यांच्यावरील प्राथमिक चौकशीचे काम सुरू होण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने त्यांना मागच्या दाराने सेवेत दाखल करून घेतले आहे. या संदर्भातील आदेश दोन दिवसांपूर्वी आयुक्तांच्या मान्यतेने काढण्यात आला. चौकशीपूर्वीच त्यांना हजर करून घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावताना प्रशासन कोणाच्या पाठीशी असा प्रश्न विशेष चर्चेत आला आहे.
शहरातील एका बांधकाम परवान्याच्या कामासाठी महापालिकेपासून पन्नास पावलाच्या अंतरावर मराठा बँकेजवळ कनिष्ठ अभियंता बाबुराव दबडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या एका पथकाने रंगेहाथ पकडले होते. यावेळी दबडे यांना सेवेतून निलंबित केले जाऊ नये यासाठी मोठे प्रयत्न झाले. तथापि आयुक्तांनी तात्काळ निलंबनाचे आदेश दिल्यामुळे गेले काही महिने या हालचाली थंड होत्या. मात्र डिसेंबर महिन्याच्या २० तारखेला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दबडे यांना सेवेत पुन्हा हजर करून घेण्याचा ठराव करण्यात आला. या ठरावाच्या आधारे त्यांना पुनस्र्थापित करण्यात येत असल्याचे याविषयी प्रसिध्द केलेल्या आदेशात म्हटले आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंत्यांची अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे सध्या कार्यरत असलेल्या अभियंत्यांवर कामाचा मोठा ताण पडत असल्याचे कारण दबडे यांच्या फेरनियुक्तीसाठी देण्यात आले आहे. मात्र अशी नियुक्ती करताना पोलीस चौकशीच्या अधिन राहून ही नियुक्ती असेल असे स्पष्ट नमूद करण्यात आले असून त्यांना विभागीय कार्यालय क्रमांक १ मध्ये नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले आहे.