Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पत्नीच्या नसबंदीचा बोगस दाखला दिल्याने काँग्रेस नगरसेवकाची चौकशी
सांगली, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

पत्नीच्या नसबंदीचा बोगस दाखल देऊन फसवणूक केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक साजीदअली पठाण यांना आज विश्रामबाग पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.
साजीद पठाण यांनी मिरजेच्या प्रभाग क्रमांक ७३ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व विकास महाआघाडीचे ज्येष्ठ नेते इद्रीस नायकवडी यांचा पराभव केला होता. पण त्यांना तीन अपत्ये असून त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी याचिका नायकवडी यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केली आहे. दरम्यान श्री. पठाण यांनी शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्याला हाताशी धरुन बोगस नसबंदीचा दाखल मिळवून तो न्यायालयात सादर केला होता. हा दाखला बोगस असल्याचे निदर्शनास येताच नायकवडी यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविताच हा प्रकार शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही लक्षात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर २००८ मध्ये प्रसुतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भास्कर कृष्णमूर्ती यांनी याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत कृष्णमूर्ती यांनी साजीद पठाण यांची पत्नी सबीना यांना नसबंदी संदर्भात दिलेला दाखला चुकीचा असल्याचे म्हटले असून रुग्णालयातील रजिस्टरमध्ये खाडाखोड करुन दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे हा दाखला आपला असल्याचे भासविण्यात आले आहे. कर्मचाऱ्याने या प्रकरणी पठाण यांना मदत केली असून त्याने शासकीय रुग्णालयाचीही फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार काल पोलिसांनी मोहन घाडगे या कर्मचाऱ्याला अटक केली होती. आज नगरसेवक साजीद पठाण यांना फसवणूकप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी तब्बल दोन तास त्यांची चौकशी करुन नंतर सोडून दिले. पण त्यांना लवकरच या फसवणूकप्रकरणी अटकेची शक्यताही वर्तविली जात आहे. या प्रकारामुळे महापालिकेतील काँग्रेसच्या गोटय़ात एकच खळबळ उडाली. काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे धाव घेतली होती.