Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘सोलापूरच्या पर्यटन विकासासाठी सकारात्मक प्रयत्न गरजेचे’
सोलापूर, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

सोलापूर जिल्ह्य़ात तीर्थक्षेत्रासह शिक्षण, वैद्यकीय व कृषी पर्यटनाला मोठा वाव असून त्या अनुषंगाने चालना देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न होणे गरजेचे आहे, असा सूर सोलापूर महोत्सवांतर्गत गुरुवारी येथे झालेल्या एका परिसंवादात काढण्यात आला.
जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सोलापूर महोत्सवानिमित्त हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये सोलापूरच्या पर्यटन व्यवसायावर परिसंवाद झाला. जाई-जुई विचार मंचच्या संस्थापिका कु. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील हे होते.
उद्घाटनपर भाषणात कु. शिंदे यांनी पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती केंद्र बनू पाहत असून यात सर्वाचा सहभाग महत्त्वाचा आहे. विशेषत तरुण व महिलांनी या क्षेत्रात आपला विकास साधण्यासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्य़ात अन्य भागातून पर्यटक यायला उत्सुक आहेत. त्याचबरोबर उच्च शिक्षण व वैद्यकीय पर्यटनाच्याही संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रात घेतलेल्या आघाडीमुळे सोलापूरचे भवितव्य चांगले आहे. परंतु त्यासाठी नागरिकांनी सकारात्मक मानसिकता बाळगायला हवी, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘कृषी पर्यटन’ या विषयावर झालेल्या परिसंवादात जळगावच्या आर्यन फाउंडेशन अ‍ॅग्री टुरिझमच्या संचालिका डॉ. रेखा महाजन म्हणाल्या की, शेती ही आपली मूळ संस्कृती असली, तरी अलीकडे या क्षेत्रातील तरुणांचा सहभाग घटत चालला आहे. कृषी पर्यटन राबविले गेले तर शेतक ऱ्यांचे आर्थिक गणित बदलू शकते. संपन्न वारसा लाभलेल्या शेतक ऱ्यांच्या घरातून उद्यमशीलता वाढायला पाहिजे, असे मत त्यांनी नोंदविले. सकाळ अ‍ॅग्रोवनचे संपादक निशिकांत भालेराव यांनी सोलापूरची शेंगा चटणी, ज्वारी, बोर, डाळिंब शेती हा कळीचा मुद्दा असल्याचे सांगितले. तर नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापराचे योग्य नियोजन केले जात नसल्याबद्दल पांडुरंग तावरे (पुणे) यांनी खंत व्यक्त केली. शेती हा प्राथमिक उद्योग असून त्यास पर्यटनाची जोड देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. कृषी पर्यटनासाठी छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमधून पर्यटकांना आकर्षित करता येते. शेतीमध्ये विविधता असेल, तर रम्य वातावरण तयार होते. पुढच्या पिढीसाठी कृषी पर्यटन म्हणून शेतीचा विकास केल्यास गावातच चांगला व्यवसाय करता येईल, असे ते म्हणाले.
वैद्यकीय पर्यटनावर बोलताना डॉ. माधवी रायते यांनी कमी खर्चात दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळत गेल्यास आणि अद्ययावत औषधोपचारासाठी पंचतारांकित रुग्णालये उभारली गेल्यास वैद्यकीय पर्यटन वाढीला वाव मिळेल, असे मत व्यक्त केले. ‘तीर्थक्षेत्र पर्यटन’ या विषयावर मुंबईच्या राजा-राणी टूर अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक विश्वजित पाटील, राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विजय चव्हाण, सोलापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी भाग घेऊन चर्चा केली. ‘उच्च शिक्षणाची गरज’ तसेच ‘तंत्रशिक्षणाचा विस्तार : गरज आणि अपेक्षा’ आणि ‘व्यवसाय शिक्षणाची भावी दिशा’ आदी विषयांवरही परिसंवाद होऊन त्यात तज्ज्ञ मंडळींनी सहभाग घेऊन चर्चा केली. पत्रकार अरविंद जोशी यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले तर शेवटी जिल्हा माहिती अधिकारी संभाजी गायकवाड यांनी आभार मानले.