Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

इचलकरंजी जनता बँकेचा महिला स्वयंरोजगाराचा उपक्रम
इचलकरंजी ५ फेब्रुवारी / दयानंद लिपारे

 

पश्चिम महाराष्ट्रातील सहकारातील अग्रेसर बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी या शेडय़ुल्ड बँकेच्या वतीने १० हजार महिलांना स्वयंरोजगार देणारा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. महिला सबलीकरणाचा एक भाग म्हणून मायक्रो फायनान्स अंतर्गत ही योजना शून्य टक्के व्याजदराने कार्यरत ठेवण्याचे प्रयोजन आहे. नाबार्ड, माविम हे शासनाचे अंगीकृत उपक्रमांचे सहकार्य आणि शासन व रिझव्‍‌र्ह बँकेचे धोरण यांचा समन्वय ठेऊन योजनेला आकार दिला जात आहे.
आवाडे जनता सहकारी बँकेने शेडय़ुल्ड दर्जा मिळाल्यापासून गेल्या ४ ते ५ वर्षांत बँकेचे कामकाज नवनव्या सेवा, योजनांद्वारे गतिमान व समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न चालवला आहे. राज्यातील प्रमुख शहरात शाखा उघडल्यानंतर या बँकेने यावर्षी गुजरात, राजस्थान, कर्नाटक असे सीमोलंघ्घन करण्याचे निश्चित केले असून त्यासाठी अंतर्बाह्य़ बदल झपाटय़ाने होत आहे. वस्त्रनगरीतील प्रधान कार्यालयाचा केलेला मेकओव्हर शहरवासियांच्या नजरेत प्रकर्षांने भरत आहे. शहराच्या मुख्य चौकातील या आकर्षक इमारतीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. बँकेच्या बाह्य़ कामकाज पध्दतीतील मुख्य बदल म्हणून उपरोक्त योजनेकडे पाहावे लागेल.
या उपक्रमाकरिता बँकेचे अध्यक्ष अशोक सौंदत्तीकर, सरव्यवस्थापक पी.टी.कुंभार यांनी परिपूर्ण आराखडा बनवला आहे. महिला बचत गटांना रस असणाऱ्या उद्योगात काम करण्याची संधी आहे. उद्योगातील तज्ज्ञ, क्रांती व नवक्रांती या महिला संघटनांचे मार्गदर्शन, टफ योजनेचा लाभ अशी अनेक वैशिष्टय़े या योजनेमध्ये आहेत. नववर्षदिनी बँकेचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी योजनेचा प्रारंभ केल्यावर बँकेच्या स्वतंत्र विभागात बचत खाती उघडण्यास महिला बचत गटांकडून लक्षणीय प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम अधिक भक्कम व्हावा यासाठी नाबार्ड, माविम (महिला आर्थिक विकास महामंडळ) या केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना एकत्रित राबविण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी बँकेच्या पुढाकाराने स्वयंसाहाय्यता उद्यम विकास कार्यक्रम, महिला बचत गट विकास कार्यक्रम (एम.ई.डी.पी) तसेच मॅच्युअर्ड ग्रुपला प्रशिक्षण देऊन स्ट्राँग मार्केटिंगसाठी ग्रामीण बाजार समृध्दीकरण योजना राबविण्याचा मानस आहे.