Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पंढरीत आज माघी यात्रा; दोन लाख भाविक दाखल
पंढरपूर, ५ फेब्रुवारी/वार्ताहर

 

यंदाचे वर्ष हे जगद्गुरू संत तुकाराममहाराज यांच्या जन्मचतु:शताब्दीचे आहे. माघी वारी आल्यामुळे या एकादशी सोहळय़ास फार महत्त्व असून असा योग सुमारे २५ ते ३० वर्षांनी आल्याने पंढरीनगरीत सुमारे २ लाख वारकरी आले असून सारी नगरी हरिनामाने दुमदुमून गेली आहे.
शुक्रवारी माघी एकादशीचा सोहळा होणार असून या भक्ती सोहळय़ासाठी वारकऱ्यांचा ओघ चालू आहे. प्रत्येक मठ, धर्मशाळा, वाडे यांमधून वारकरी मुक्कामी असून सर्वत्र भजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम चालू आहेत. तसेच चंद्रभागा वाळवंटाचा पूर्ण परिसर वारकरी भाविकभक्तांनी गजबजून गेला आहे. तेथे उभारलेल्या राहुरी तंबूमधून भारूड, भजन, प्रवचनाची रेलचेल चालू आहे. प्रत्यक्ष पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपुरापर्यंत गेली होती, तर मुखदर्शन रांगही दीड कि.मी.पर्यंत लागलेली होती.
माघी यात्रेसाठी प्रामुख्याने सोलापूर, तळ कोकणातील परिसर, बेळगाव, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश यासह सर्व भागांतून वारकरी यात्रेसाठी आले असून या यात्रेत तीन लाख भाविक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरातील सर्व रस्ते वारकऱ्यांनी फुलून गेले असून सर्वच ठिकाणी लहानमोठी प्रासादिक दुकाने भरली आहेत. याच दरम्यान कर्नाटकमधील मायाक्का, चिंचणी येथील मोठी यात्रा असते. त्यामुळे माघीनंतर प्रासादिक व्यापाऱ्यांना त्या यात्रेत दुकाने लावण्याची ओढ असल्याने येथील व्यापारी त्रयोदशीपासून त्या यात्रेकडे मार्गस्थ होतात. ही माघी यात्रा प्रामुख्याने तीन ते चार दिवसच भरते.
मिरज, पंढरपूर या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम चालू असल्याने हा मार्ग रेल्वेने बंद केला. त्यामुळे प्रवासी एसटीने कोल्हापूर, सांगली, मिरज या परिसरातून येत असून एसटी महामंडळाने जादा एसटी बसेसची सोय केली आहे, तर पंढरपूर ते कुर्डूवाडी तसेच लातूपर्यंतचा मार्ग ब्रॉडगेज असल्याने या परिसरातून जादा रेल्वे सोडण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केली आहे.