Leading International Marathi News Daily                                शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

अग्रलेख

लोकमानस

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांतनिवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनामी ंयांची नेमणूक म्हणजे मनमानी
आबांवर हायकोर्टाचे ताशेरे * चार आठवडय़ात नव्या नेमणुकीचे आदेश
मुंबई, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी
राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे एकमेव व गैरलागू कारण देऊन माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकपदी अनामी रॉय यांची केलेली नेमणूक मुंबई उच्च न्यायालयाने आज ‘मनमानी, बेकायदा व अपारदर्शी’ ठरवून रद्द केली. त्याचबरोबर न्यायालयाने व्यक्तिश: आर. आर. आबांसह एकूणच सरकारी निर्णय प्रक्रियेवर कडक ताशेरे ओढले व सरकारने नव्या महासंचालकांची नेमणूक येत्या चार आठवडय़ांत करावी, असा आदेश दिला. मुख्य न्यायाधीश न्या. स्वतंत्र कुमार व न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठाने आज सकाळी हा निकाल जाहीर केल्यावर सरकारी वकिलाने त्यास स्थगिती देण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने फक्त रॉय यांची नेमणूक रद्द केल्याचा आदेश दोन आठवडय़ांसाठी तहकूब केला.

विजयाची नऊलाई
कोलंबो, ५ फेब्रुवारी / वृत्तसंस्था

श्रीलंकेवरील सलग चौथ्या आणि सलग नवव्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील विजयाने टीम इंडियाने लंकेत क्रिकेटचा नवा अध्याय लिहिला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग नवव्या विजयाची नोंद करून नवा भारतीय उच्चांकही प्रस्थापित केला. याआधीचा भारतीय उच्चांक सलग ८ विजयांचा होता. गंभीरच्या झंझावाती दीड शतकामुळे भारताने गाठलेला ३३२ धावांच्या कळसापर्यंत श्रीलंकेला पोहोचता आले नाही. त्यांचे प्रयत्न २६५ धावसंख्येनंतर संपुष्टात आले. सामनावीर गौतम गंभीर ठरला, तर पुरस्काराचा स्वीकार करताना धोनीने ५-० अशा विजयाचे संकेत दिले.
सविस्तर वृत्त

मुरली ऑन टॉप
कोलंबो, ५ फेब्रुवारी/क्री.प्र.

फिरकी गोलंदाजीचा अनभिषिक्त सम्राट अशी बिरुदावली मिरविणाऱ्या श्रीलंकेच्या ३६ वर्षीय मुथय्या मुरलीधरनने आज एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक बळींचे शिखर पादाक्रांत केले. भारताविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात त्याने पाकिस्तानच्या वसीम अक्रमचा सर्वाधिक बळींचा विक्रम मोडीत काढला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अक्रमच्या ५०२ बळींची बरोबरी केल्यानंतर आज दीडशतक झळकावणाऱ्या सलामीवीर गौतम गंभीरला यष्टीरक्षक कुमार संगक्काराकरवी झेलबाद करीत मुरलीने हा विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा पराक्रम केल्यामुळे अवघ्या क्रिकेट विश्वावर आता ऑफ स्पिनर मुरलीचे निर्विवाद वर्चस्व आहे. १२५ कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक ७६९ बळी त्याच्या नावावर आहेत. १२ ऑगस्ट १९९३ साली मुरलीने अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते आणि त्यावेळी १० षटकांमध्ये ३८ धावा देत सध्या मुंबईचे प्रशिक्षक असलेल्या प्रवीण अमरे यांचा एकमेव बळी मिळविला होता. भारतीय फलंदाजांनी या दौऱ्यात त्याच्या गोलंदाजीवर केलेल्या आक्रमणामुळे त्याला हा विक्रम मोडीत काढण्यासाठी ३२८ व्या एकदिवसीय सामन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अक्रमला ५०२ बळी घेण्यासाठी ३५६ एकदिवसीय सामने खेळावे लागले होते.

पुण्यातील जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालय पाडणार
धनंजय जाधव
पुणे, ५ फेब्रुवारी

ब्रिटिश काळात बांधण्यात आलेले ऐतिहासिक जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालयातील विधान मंडळाची पुरातन वास्तू वगळता अन्य इमारती पाडण्यात येणार असून, त्या जागी ‘कॉर्पोरेट’ संस्कृतीतील चकचकीत बहुमजली इमारती बांधण्याचा प्रस्ताव आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी आज या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला. पुण्यातील ऐतिहासिक मामलेदार कचेरी व बुधवार पेठेतील कोतवाल चावडीपाठोपाठ आता जिल्हाधिकारी कार्यालयातील ब्रिटिशकालीन इमारत इतिहासजमा होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची सध्याची जागा अपुरी असल्याने तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाचा विस्तार करण्यासाठी हा प्रस्ताव पुढे आला आहे.

पर्सेटाईल, नवव्या मंडळाचा संभ्रम
बारावी परीक्षेच्या तोंडावर कायमच!
पुणे, ५ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी
बारावीची तोंडी परीक्षा उद्यापासून सुरू होत असताना पर्सेटाईल सूत्र आणि कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेबाबतचा संभ्रम कायमच आहे. पर्सेटाईलबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, शपथपत्रे वगैरे दस्तावेजांची जमवाजमव सुरू असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बारावी-दहावीची परीक्षा हेच आमचे प्राधान्य असून, नवव्या विभागीय मंडळाच्या कार्यवाहीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे मंडळाच्या अध्यक्षा विजयशीला सरदेसाई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. पर्सेटाईलच्या मुद्दय़ावरून गेल्या वर्षीच्या अकरावी प्रवेशप्रक्रियेत अभूतपूर्व गोंधळ झाला होता. अखेर कोर्टबाजी झाल्यानंतर त्याबाबत तात्पुरता तोडगा काढण्यात आला होता.

अडवाणींची चुकलेली पंतप्रधानपदाची गाडी आता मोदी पकडतील!
संदीप प्रधान
मुंबई, ५ फेब्रुवारी

‘अब की बारी अटलबिहारी’ या एकेकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणेतील जोश पंतप्रधानपदाकरिता लालकृष्ण अडवाणी यांची उमेदवारी जाहीर होऊनही दिसत नाही. राम रथयात्रेवर स्वार होऊन अडवाणी यांनी जेव्हा हिंदुत्वाचा झंझावात निर्माण केला तेव्हा १४ वर्षांपूर्वी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव पंतप्रधानपदाकरिता जाहीर करून आपली उंची वाढविण्याचा प्रयत्न केला. परंतु अडवाणी यांची पंतप्रधानपदाची गाडी चुकली असल्याची भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच आता योग्य वेळी पंतप्रधानपदाची गाडी पकडतील आणि भाजपला सत्तेवर आणतील, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

नव्या शाळांसाठी मंत्रालयात अर्जाचा ढीग
‘कायम’ उत्पन्नासाठी सत्ताधारी पुढाऱ्यांची धडपड
संतोष प्रधान
मुंबई, ५ फेब्रुवारी

शिक्षणसंस्था म्हणजे राजकारण्यांचे उत्पन्नाचे साधन झाले असतानाच शासनाच्या नव्या धोरणांमुळे सत्ताधारी आघाडीतील गावोगावच्या नेत्यांची नव्या शाळांना मान्यता मिळावी म्हणून एकच धडपड सुरू झाली आहे. कायम विनाअनुदानित शाळांमधील ‘कायम’ हा शब्द वगळण्याचा निर्णय झाल्याने आधीच सरकारी तिजोरीवर सुमारे ६०० कोटींचा बोजा पडणार आहे. त्यातच शाळांना अनुदान मिळणार असल्यानेच नव्या शाळांच्या परवानगीकरिता मंत्रालयात आता अर्जांचे ढीग जमा होऊ लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर कायम हा शब्द वगळण्याचा निर्णय शासनासाठी ‘कायमची डोकेदुखी’ होऊ लागला आहे. याबाबतचा प्रस्ताव विभागाने तयार केला असला तरी वित्त विभागाची त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. शासनाची आर्थिक स्थिती चांगली नसताना नव्या शाळा कायमस्वरूपी विनाअनुदानित स्वरूपात चालविण्याचे धोरण काही वर्षांंपूर्वी निश्चित करण्यात आले होते. मात्र शिक्षणसंस्थांन अनुदान मिळाले पाहिजे या मागणीसाठी काही संस्थाचालक न्यायालयात गेले. बहुतेक कायमस्वरूपी विनाअनुदानित शाऴा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी संबंधित असल्याने राजा उदार झाला. आर्थिक परिस्थिती काहीशी सुधारल्याने अनुदान देण्याबाबत सरकारने उच्च न्यायालयात अनुकूल अशी भूमिका घेतली. त्यातच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कायम हा शब्द वगळून शिक्षणसंस्थांना अनुदान देण्याची घोषणाही सरकारकडून झाली.
उत्पन्नाचे साधन म्हणूनच गावोगावच्या पुढाऱ्यांनी गेल्या पाच-सात वर्षांंमध्ये मोठय़ा प्रमाणावर शाळा सुरू केल्या. आता कामयस्वरूपी विनाअनुदानित शाळांमधील कायम हा शब्द वगळण्याचे धोरण जाहीर होताच नव्या शैक्षणिक वर्षांंमध्ये शाळा सुरू करण्यासाठी मान्यता मिळावी म्हणून अर्जावर अर्ज येऊ लागले आहेत. या अर्जांसोबत मंत्री, खासदार व आमदारांनी शिफारस पत्रे जोडली आहेत. अनुदान मिळणार असल्याने नव्या शाळांच्या मान्यतेसाठी गावोगावच्या पुढाऱ्यांचा मंत्रालयातील राबता तर वाढला आहेच पण आपल्याच शाळेला मान्यता मिळावी म्हणून येनकेनप्रकारेन दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. निवडणूक वर्ष असल्याने पुढारी व कार्यकर्त्यांना नाराज करणेही मंत्री व आमदारांना शक्य होणार नाही. अनुदान सुरू झाले तरी शिक्षणसंस्थाचालक किंवा शिक्षणसम्राट शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्याचे थांबविण्याची शक्यता फारच कमी आहे. कायम हा शब्द वगळण्यात आला असला तरी शालेय शिक्षण विभागाने गावोगावच्या पुढाऱ्यांना चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात राज्यकर्ते तो मान्य करतील का, ही बाब वेगळी. शाळेला आता परवानगी मिळाली तरी अनुदान पुढील पाच वर्षांंत सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

तोरणा किल्ल्यावरून पडून दोघांचा मृत्यू
पुणे, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

वेल्हा तालुक्यातील तोरणा किल्ल्यावर फिरायला गेलेल्या पुण्यातील दोन तरूणांचे मृतदेह अखेर चार दिवसांच्या शोधमोहिमेअखेरीस सापडले. किल्ल्याच्या झुंजार माचीखाली हे मृतदेह पोलिसांना आढळून आले. दोघांपैकी एकजण घसरून पडल्याने तर दुसरा त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात माचीवरून पडल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शौर्य वर्धन गर्ग (वय २६, रा. एंजल्स सोसायटी, पिंपळे सौदागर) आणि सागर मुंजाल संघवी (वय २५, रा. सेनापती बापट रस्ता) या दोघा तरूणांचे मृतदेह आज दुपारी तोरणा किल्ल्यावर सापडले. शोधमोहिमेमध्ये हेलिकॉप्टरसह वेल्हा पोलीस, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे जवान तसेच काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी चार दिवस अविरत कष्ट घेतले. पुण्यातील ‘एमएनएस सिस्टिम्स’ कंपनीमध्ये काम करणाऱ्या गर्ग व संघवी हे दोघे रविवारी घरातून बाहेर पडले मात्र घरी परतलेच नाहीत. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू केली होती.

आंध्रमधील आणखी एका तरुणाची अमेरिकेत हत्या
हैदराबाद, ५ फेब्रुवारी / वृत्तसंस्था

आंध्र प्रदेशातील आणखी एका तरुण अभियंत्याची अमेरिकेत हत्या झाल्याचे उजेडात आले आहे. रुद्र राजू सुधीरकुमार (३१ वर्षे) हा टोयोटा कंपनीत मेकॅनिकल इंजिनीअर म्हणून काम करीत होता. अटलांटामधील स्वत:च्या घरात तो बुधवारी मृतावस्थेत आढळला. गेल्या दोन वर्षांच्या काळात आंध्र प्रदेशातील आठ जणांची अमेरिकेत हत्या झाली आहे. रुद्र राजूला अज्ञात इसमांनी ठार केल्याचे बोलले जात असले तरी त्याची हत्या करण्यामागील उद्देश कळलेला नाही, तसेच हत्या करणारे कोण याबाबतही अद्याप काही कळलेले नाही, असे त्याचे पिता आर. रामा राजू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८