Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पर्सेटाईल, नवव्या मंडळाचा संभ्रम
बारावी परीक्षेच्या तोंडावर कायमच!
पुणे, ५ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

बारावीची तोंडी परीक्षा उद्यापासून सुरू होत असताना पर्सेटाईल सूत्र आणि कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेबाबतचा संभ्रम कायमच आहे.
पर्सेटाईलबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, शपथपत्रे वगैरे दस्तावेजांची जमवाजमव सुरू असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बारावी-दहावीची परीक्षा हेच आमचे प्राधान्य असून, नवव्या विभागीय मंडळाच्या कार्यवाहीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे मंडळाच्या अध्यक्षा विजयशीला सरदेसाई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
पर्सेटाईलच्या मुद्दय़ावरून गेल्या वर्षीच्या अकरावी प्रवेशप्रक्रियेत अभूतपूर्व गोंधळ झाला होता. अखेर कोर्टबाजी झाल्यानंतर त्याबाबत तात्पुरता तोडगा काढण्यात आला होता. पुढील वर्षी पर्सेटाईलसह कोणत्याही बाबतीत संभ्रमावस्था ठेवली जाणार नाही. किंबहुना बोर्डाची परीक्षा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सर्व बाबी स्पष्ट होतील, असे आश्वासन राज्य शासनातर्फे देण्यात आले होते. बारावीची तोंडी परीक्षा उद्यापासून सुरू होत असून २६ तारखेपासून लेखी परीक्षेला प्रारंभ होत आहे. दहावीची तोंडी परीक्षा १२ फेब्रुवारीपासून, तर लेखी परीक्षा पाच मार्चपासून सुरू होत आहे. या परीक्षांच्या तोंडावर पर्सेटाईलबाबत अजून गोंधळाची स्थिती कायमच आहे. किंबहुना, त्यामध्ये आता कोकणसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या नवव्या विभागीय मंडळाची भर पडली आहे. पर्सेटाईलबाबत सर्वसहमतीने तोडगा काढण्यासाठी एसएससी, सीबीएसई आणि आयसीएसई अशा तीनही मंडळांची संयुक्त बैठक सर्वप्रथम १५ डिसेंबरच्या सुमारास बोलावण्यात आली होती. राष्ट्रीय स्तरावरील मंडळांचे अधिकारी कार्यमग्न असल्याने ती बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर गेल्या महिन्यात पुन्हा अशाच प्रकारची बैठक घेण्याचा प्रयत्न राज्य मंडळाने केला. परंतु, त्यालाही यश येऊ शकले नाही. दरम्यान, पर्सेटाईलच्या मुद्दय़ावर मुंबई उच्च न्यायालयाच्या मध्यस्थीने तात्पुरता तोडगा निघाला होता. आता त्याबाबतचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयातूनच मिळवू, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली. त्यानुसार मंडळाकडून शपथपत्रे वगैरे दस्तावेजांची जमवाजमवी अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच राज्य शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात येईल, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
कोकण विभागासाठीच्या नवव्या विभागीय मंडळाचा निर्णय नागपूर अधिवेशनामध्ये जाहीर करण्यात आला. बोर्डाच्या परीक्षेपूर्वी हे मंडळ अस्तित्वात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. त्याचे मुख्यालय रत्नागिरीमध्ये ठेवण्यात येणार असून मुंबई व कोल्हापूर विभागीय मंडळामधील भाग या नवव्या मंडळात सहभागी करून घेण्यात येणार आहे. दरम्यान, नवी मुंबई, रायगडमधून नवव्या मंडळाला तीव्र विरोध आहे. गेल्या आठवडय़ामध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत तो व्यक्तही करण्यात आला होता. या मंडळाचा आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात आला असला, तरी मंत्रिमंडळाची त्याला मान्यता मिळालेली नाही.
अशा परिस्थितीत बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्यानंतर पर्सेटाईल व नवव्या मंडळाबाबत गैरसोयीचे ठरतील, विद्यार्थ्यांची एकाग्रता ढळण्याचा धोका निर्माण होईल, असे निर्णय राज्य शासन वा मंडळाने घेऊ नयेत, अशीच अपेक्षा विद्यार्थी-पालक व्यक्त करीत आहेत.