Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

अडवाणींची चुकलेली पंतप्रधानपदाची गाडी आता मोदी पकडतील!
संदीप प्रधान
मुंबई, ५ फेब्रुवारी

‘अब की बारी अटलबिहारी’ या एकेकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणेतील जोश पंतप्रधानपदाकरिता लालकृष्ण अडवाणी यांची उमेदवारी जाहीर होऊनही दिसत नाही. राम रथयात्रेवर स्वार होऊन अडवाणी यांनी जेव्हा हिंदुत्वाचा झंझावात निर्माण केला तेव्हा १४ वर्षांपूर्वी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव पंतप्रधानपदाकरिता जाहीर करून आपली उंची वाढविण्याचा प्रयत्न केला. परंतु अडवाणी यांची पंतप्रधानपदाची गाडी चुकली असल्याची भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच आता योग्य वेळी पंतप्रधानपदाची गाडी पकडतील आणि भाजपला सत्तेवर आणतील, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘इंडिया शायनिंग’च्या लाटेवर आणि ‘फील गुड’च्या हवेवर भाजपप्रणीत रालोआ सत्तेवर येईल, असे अटलबिहारी वाजपेयी वगळता भाजपच्या अनेक नेत्यांना वाटत होते. त्यावेळी जर पुन्हा सत्ता आली असती तर उपपंतप्रधानपदापर्यंत वाटचाल केलेले अडवाणी आतापर्यंत कदाचित पंतप्रधान झाले असते. पंतप्रधानपदाचे स्वप्न भंगलेले अडवाणी पाकिस्तानमध्ये गेले आणि ‘जिना’वरून घसरले. रा. स्व. संघ, विहिंप यांनी तर त्यांच्या नावावर फुली मारली. सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत संघ परिवार आणि भाजपच्या नेत्यांची संयुक्त बैठक झाल्यावर संघ परिवाराचा अडवाणींवरील रोष मावळू लागला. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर यापुढे कुणा व्यक्तीच्या अथवा भाजपसारख्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करायचे नाही, असा आदेश त्या बैठकीत सरसंघचालक सुदर्शन यांनी अडवाणी यांना दिला. सत्तेचे गणित जमविताना हिंदुत्वाचा अ‍ॅजेंडा दुर्लक्षित होतो व त्यामुळे कार्यकर्ते हतोत्साहित होतात, अशी मांडणी संघाच्या नेत्यांनी त्यावेळी तो निकाल देताना केली. त्यामुळे अडवाणी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर होण्याची औपचारिकता पूर्ण झाली. परंतु हिंदुत्वाची कवचकुंडले त्यांच्याकडून काढून घेण्यात आली, असे भाजपमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे.
अडवाणी हे पंतप्रधानपदाचे स्वाभाविक उमेदवार न वाटता आता अडवाणी यांना पंतप्रधान करण्याकरिता भाजपला सत्ता हवी, असे चित्र कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या मनात त्यामुळे निर्माण झाले. आतापर्यंत छायाचित्रांत अटल, अडवाणी यांच्या काहीसे मागे (वडीलकीच्या भावनेने) उभे राहणाऱ्या भैरोसिंग शेखावत यांनी अडवाणी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला आव्हान देऊन कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा हे तर अडवाणी यांचे पक्षातील कट्टर विरोधक व प्रतिस्पर्धी ओळखले जातात. कंदहार येथे अतिरेक्यांना सोडून नेण्याच्या प्रकरणावरून जसवंत सिंग व लालकृष्ण अडवाणी यांच्यातील मतभेद व मनभेद यापूर्वीच स्पष्ट झाले आहेत. त्यामुळेच अडवाणी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीत ‘अब की बारी..’चा जोश कार्यकर्त्यांना दिसत नाही. भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी उद्यापासून रा. स्व. संघाच्या नागपूरमधील गडात सुरू होत आहे. केंद्रात लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस अथवा भाजपप्रणीत आघाडीचे सरकार सत्तेवर आले नाही तर ते सरकार फार काळ टिकणार नाही. त्यानंतर होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे भाजपचे उमेदवार असतील, असे कार्यकर्ते सांगत आहेत.अडवाणी यांच्याऐवजी मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असते तर भाजपला मित्रपक्ष जमविण्यात अडचण येऊ शकते. मात्र आणखी काही कालावधी गेल्यावर मोदी यांची विकासपुरुष प्रतिमा दृढ झालेली असेल व अडवाणी यांच्या तोंडचा पंतप्रधानपदाचा घास पळवला, असा आरोप भाजपमधील अल्पसंख्याक अडवाणीसमर्थक करू शकणार नाहीत, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे.