Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९

प्रादेशिक

हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनी आबांच्या अब्रुची लक्तरे
मुंबई, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर अनामी रॉय यांची नेमणूक करण्याचा माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा निर्णय अविचारी होता. हा निर्णयच नव्हे तर तो घेण्यासाठी अवलंबिलेली पद्धतही पूर्णपणे कायद्याला सोडून होती. एवढेच नव्हे तर महासंचालकासारख्या उच्च पदावर नेमणूक करण्याचा स्वेच्छाधिकार वापरण्याच्या नावाखाली या निवडीसाठी सोयीची व सरधोपट पद्धत अवलंबिली गेली आणि त्यासाठी तर्काशी विसंगत व पूर्णपणे निराधार कारणे विचारात घेतली गेली, असे अत्यंत कडक ताशेरे ओढत मुंबई उच्च न्यायालयाने आज व्यक्तिगत आर. आर. आबांच्या व एकूणच सत्ताधारी सरकारच्या अब्रुची लक्तरे काढली.

हुजरेगिरी न करणारा महासंचालक नेमा - मुंडे
मुंबई, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

अनामी रॉय हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागत होते. त्यामुळेच त्यांना हटविण्याची मागणी विधानसभेत केली होती. सरकारने आता तरी हुजरेगिरी न करणारा आणि जनतेची सुरक्षा महत्त्वाची समजणारा महासंचालक नेमावा, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी केली. मुंम्डे म्हणाले की, सरकारकडून न्याय मिळाला मिळाला नाही. परंतु न्यायालयाने आम्हाला न्याय दिला.

कलाकेंद्रांच्या संख्येवरून तमाशा कलाकेंद्रांमध्ये कलगी-तुरा
प्रशांत पवार
मुंबई, ५ फेब्रुवारी

तमाशा, संगीतबारी, खडी गंमत, दशावतार आणि शाहिरी या लोककलांना महाराष्ट्र शासनाने आर्थिक पॅकेज जाहीर केले असून मार्च अखेरीस या लोककलावंतांना किमान भांडवली खर्चासाठी धनादेश निघण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच लावणीचा वारसा टिकविणाऱ्या संगीतबारी कलाकेंद्रांमधील थिएटर मालकांमध्ये कलगी-तुरा सुरू झाला आहे. शासनाचा आदेश धुडकावून लावत केवळ दौलतज्यादासाठी काही थिएटर मालकांनी जो मार्ग अवलंबला आहे त्याने कधी नव्हे ती लावणीला मिळालेली राजमान्यता पुन्हा रद्द होण्याची भीती निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीची मागणी काँग्रेसने धुडकावली
मुंबई, ५ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

जागावाटपात २७ व २१ जागांचेच सूत्र योग्य असून, गेल्या वेळीच राष्ट्रवादीला तीन जागा जास्त सोडण्यात आल्या होत्या. यामुळे राष्ट्रवादीने निम्म्या जागांची मागणी केली असली तरी २००४चे सूत्र योग्य असून, याबाबत तडजोड करण्यास काँग्रेसने आज नकार दिला. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असली तरी राष्ट्रवादीने मात्र या विषयावर सौम्य भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीने अजूनही आशा सोडलेली नाही.

करातांच्या पुष्पगुच्छामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित!
समर खडस
मुंबई, ५ फेब्रुवारी

हृदयावरील शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे जेव्हा त्यांच्या दिल्ली येथील सात रेसकोर्स रोडवरील निवासस्थानी परतले तेव्हा शुभेच्छा देण्यासाठी पहिला पुष्पगुच्छ पाठवून त्यांना दीर्घायुरारोग्य चिंतिणारे होते मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉम्रेड प्रकाश करात ! अणुकरारानंतर मार्क्‍सवाद्यांमध्ये आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यात पडलेली दरी या पुष्पगुच्छामुळे बऱ्याच अंशी मिटली असल्याचे तर्क त्यामुळेच दिल्लीतील राजकीय पंडित लागलीच काढू लागले आहेत.

ठाणे पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यासाठी ‘मोठी ऑफर’ होती
राज ठाकरे यांचा गौप्यस्फोट
नवी मुंबई, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी
ठाणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार उभा करावा यासाठी एका राजकीय पक्षाचे नेते आपणाकडे कोटय़वधी रुपयांची ऑफर घेऊन आले होते. केवळ उमेदवार उभा करा आणि किती हवेत ते बोला, असा प्रस्ताव आपल्या पुढे मांडण्यात आला होता. मात्र मी माझा पक्ष विकायला काढलेला नाही, अशी स्पष्ट भूमिका आपण त्या वेळी घेतली, असा गौप्यस्फोट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वाशी येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना केला.

आरोग्य संचालकांच्या नियुक्तीची गहाळ फाईल सापडली
मुंबई, ५ फेब्रुवारी/ खास प्रतिनिधी

राज्याचे आरोग्य संचालक डॉ. एस. बी. चव्हाण हे ३१ जानेवारी रोजी निवृत्त झाल्यानंतर त्यांची प्रतिनियुक्ती सहा महिन्यासाठी करण्याबाबतची गहाळ झालेली फाईल सापडली असून उद्या त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येणार आहेत, असे विश्वसनीयरित्या समजते.आरोग्य संचालक एस. बी. चव्हाण यांच्या प्रतिनियुक्तीची फाईल गहाळ झाल्याबाबतची बातमी ‘लोकसत्ता’मधून प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर ही फाईल आरोग्यमंत्र्यांकडे सर्व संबंधितांच्या स्वाक्षऱ्या होऊन पोहोचली आहे.

विर्क यांचा मार्ग मोकळा!
मुंबई, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

तीन ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमधून राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकांची नियुक्ती करावी, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिल्यामुळे आता विद्यमान पोलीस महासंचालक अनामी रॉय यांचा पत्ता तूर्तास कापला गेला आहे. राज्य शासनाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्यास सर्वात ज्येष्ठ अधिकारी सर्वजीत सिंग विर्क यांचा राज्याचे पोलीस महासंचालक बनण्यातील मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या निर्णयाविरुद्ध शासनाने वा रॉय यांनी वैयक्तिकरीत्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यास व न्यायालयाने स्थगिती दिली तरच विर्क यांना महासंचालक बनण्यात अडचणी येऊ शकतील, अशी चर्चा ऐकायला मिळते.१९७० च्या बॅचमधील आयपीएस अधिकारी असलेले विर्क हे सध्या महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंडळाचे महासंचालक आहेत. मूळचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी असलेल्या विर्क यांनी पंजाबचे पोलीस महासंचालकपद भूषविले आहे. पंजाब सरकारशी वाद झाल्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्र कॅडरमध्ये १० एप्रिल २००७ मध्ये दाखल झाले. त्यानंतर २७ एप्रिल २००७ मध्ये ते अधिकृतपणे सेवेत आले. त्यानंतर त्यांची राज्याच्या महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉ. पी. एस. पसरिचा हे सेवानिवृत्त झाल्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची नियुक्ती करण्याची पाळी आली तेव्हा विर्क, सु. चक्रवर्ती व जीवन वीरकर यांच्या नावाचा विचार न करता सेवाज्येष्ठतेनुसार चौथ्या क्रमांकावर असलेल्या रॉय यांची नियुक्ती करण्यात आली. वीरकर यांना राज्याच्या महासंचालक पदात रस नसल्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. आताही वीरकर यांनी तीच भूमिका घेतली आणि तसे त्यांनी लेखी लिहून दिल्यास पुन्हा रॉय यांना महासंचालक बनविण्यातील अडसर दूर होऊ शकतो, असाही मतप्रवाह असल्याचे बोलले जाते.

‘खातरजमा करून राष्ट्रपती पॅगोडाच्या उद्घाटनाला’
मुंबई, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

गोराई येथील ग्लोबल विपश्यना केंद्राला केंद्र व राज्य सरकारच्या विविध खात्यांनी मंजुरी दिली असल्याची वस्तुस्थिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मागवून तपासून घेतल्यानंतरच राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्याच्या उद्घाटनाला येण्यास मान्यता दिली असल्याचे राष्ट्रपती सचिवालयाच्या विशेष कार्याधिकारी अर्चना दत्ता यांनी स्पष्ट केले. ‘राष्ट्रपती करणार बेकायदा पॅगोडाचे उद्घाटन’ या लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबद्दल राष्ट्रपती सचिवालयाने म्हटले आहे की, उत्तर मुंबईतील गोराई, मनोरी, उत्तन या परिसराच्या विकासाकरिता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नियुक्ती डिसेंबर २००७ मध्ये करण्यात आली आहे. त्यांच्याकडून या विपश्यना केंद्राला मिळालेल्या मंजुऱ्यांबाबत माहिती मागवून सर्व खातरजमा केल्यानंतर राष्ट्रपतींनी हा कार्यक्रम स्वीकारला आहे.

बोरिवली : आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचे रेल्वे प्रशासनाचे आश्वासन
मुंबई, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

बोरिवलीत रेल्वे प्रवाशांनी केलेल्या उत्स्फूर्त आंदोलनात ज्या १३ पुरुष व १९ महिला आंदोलकांवर रेल्वेने गुन्हे दाखल केले होते ते मागे घेण्याचे आश्वासन आज रेल्वे प्रशासनाने शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. प. रे.चे महाव्यवस्थापक रवींद्र वर्मा यांची आज शिवसेना खा. मोहन रावले, विभागप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन शिवसेनेच्या ९ फेब्रुवारी रोजीच्या बोरिवली रेल्वे प्रवासी परिषदेची माहिती तसेच प्रवाशांच्या तक्रारींचे निवेदन दिले. तसेच रेल रोको आंदोलकांवरील खटले तातडीने मागे घेण्याचा आग्रह धरला. फलाट क्र. १, २ व ३ वरून सकाळी सुटणाऱ्या गाडय़ांत आणखी सहा गाडय़ांची भर घालण्यात येईल, फलाट क्र. ८ वरून बाहेर पडण्यासाठी आणखी एका प्रवेशद्वाराची सोय करण्यात येईल, सिग्नल यंत्रणा त्वरित सुधारण्यात येईल तसेच पर्याय म्हणून एक गाडी कायमची आरक्षित ठेवण्यात येईल, असे रवींद्र वर्मा यांनी शिष्टमंडळाकडे स्पष्ट केले.

नारायण राणे यांना उच्च न्यायालयाची ‘कन्टेम्प्ट’ नोटीस
मुंबई, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

अर्धन्यायिक प्राधिकारी (क्वासी ज्युडिशियल अ‍ॅथॉरिटी) म्हणून काम करताना मंत्र्यांनी कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा याविषयी न्यायालयाने दोन वर्षांपूर्वीच्या एका निकालात ठरवून दिलेल्या निकषांचे पालन न करून माजी महसूलमंत्री नारायण राणे यांनी सरकारकडे आलेल्या एका अपिलात स्वत:च दिलेली स्थगिती एकतर्फी उठवून न्यायालयीन निर्देशांचे जाणूनबुजून उल्लंघन केले असे सकृद्दर्शनी मत नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाने आज राणे यांना न्यायालयीन अवमानाच्या कारवाईसंदर्भात (कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट) नोटीस काढली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कणबस गावातील निर्मला शेटे व काशिनाथ चित्ते यांनी केलेल्या रिट याचिकेत न्या. विजय दागा यांनी राणे यांना अशी नोटीस काढण्याचा आदेश दिला. राणे आता महसूलमंत्री नाहीत, असे सरकारी वकिलाने सांगितल्यावर ही नोटीस मुख्य सचिवांकडे पाठविली जावी आणि त्यांनी ती राणे यांच्यावर बजावावी, असे न्यायालयाने सांगितले. राणे यांनीदोन आठवडय़ांत उत्तर द्यायचे आहे.

बारमध्ये हैदोस घालणाऱ्या गुंडाला अटक
मुंबई, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मालाड पूर्व येथील दिव्या बारमध्ये रात्रीच्या वेळेस हैदोस घालून बार व्यवस्थापकासह कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कुख्यात गुंड छोटा राजनच्या हस्तकाला मालवणी पोलिसांनी अटक केली. नेवडा रॉबिन सतमान (४०) असे या गुंडाचे नाव असून त्याच्याकडून एक जर्मन बनावटीचे रिव्हॉल्वर आणि १२ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास नेवडा दिव्या बारमध्ये गेला होता. मात्र बार बंद झाल्याचे एका वेटरकडून सांगण्यात आल्यानंतर संतापलेल्या नेवडाने वेटर आणि बारच्या व्यवस्थापकाशी वाद घालण्यास सुरूवात केली. तसेच दोघांनाही जीवे मारण्याची धमकी देऊन गेला. दरम्यान, बारच्या व्यवस्थापकाने पोलिसांना कळविले होते. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत नेवडा निघून गेला होता. काही वेळाने तो पुन्हा बारमध्ये आला आणि रिव्हॉल्वर दाखवून वेटरला धमकावू लागला. त्या वेळी पोलिसांनी त्याला अटक केली. नेवडा हा टाटा एजन्सीमध्ये नोकरीला आहे. मात्र १९८९पासून त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, खंडणीसाठी धमकावणे असे एकूण १८ गुन्हे दाखल आहेत. तो छोटा राजन टोळीसाठी काम करतो.

आमदार-नगरसेवकांच्या भांडणात आयुक्तांचे सॅण्डवीच!
मुंबई, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

महानगरपालिका आयुक्त जयराज फाटक मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या दबावाखाली काँग्रेसच्या आमदारांना झुकते माप देत आहेत, असा आरोप सुधार समिती अध्यक्ष शैलेश फणसे व विधी समितीचे अध्यक्ष राजनाथ चौगुले यांनी केला आहे. नागरी कामांचे श्रेय घेण्याच्या आमदार- नगरसेवकांच्या भांडणात आयुक्तांचे सॅण्डवीच झाले आहे. आपण दबावाखाली नाही तर मुंबईकरांसाठी काम करीत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. अंधेरी, लोखंडवाला येथील एका जलवाहिनीचे काम पालिकेच्या निधीतून सुरू आहे, मात्र याच कामासाठी स्थानिक आमदार बलदेव खोसा यांनी राज्य सरकारकडून एक कोटीचा निधी आणला आहे त्यामुळे हे काम आमदारांना करू द्या, असा ‘एसएमएस’ आयुक्तांनी फणसे यांना पाठविला होता. हा ‘एसएमएस’ फणसे यांनी पत्रकारांना वाचून दाखविला. आयुक्त दवावाखाली काम करीत असतील तर शिवसेना त्यांना धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी दिला. याच विभागातील एका उद्यानाला दिवंगत प्रमोद नवलकर यांचे नाव देण्याचा ठराव पालिका सभागृहाने पास केला आहे. मात्र मुख्यमंत्री चव्हाण यांनी याला स्थगिती दिली असून, आमदार बलदेव खोसा यांनीच स्थगितीची मागणी केली होती, असे राजू पेडणेकर यांनी सांगितले. शहरात कशालाही नाव देण्याचा पालिकेचा अधिकार आहे, असा दावा त्यांनी केला. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

मुलुंडच्या निर्मल लाईफस्टाईल पबवर पोलिसांची धाड
मुंबई, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुलुंड येथील निर्मल लाईफस्टाईल पबवर मुंबई पोलिसांच्या समजासेवा शाखेने आज रात्री धाड टाकून मद्यपान करणाऱ्या २१ वर्षांखालील नऊ तरुणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, निर्मल लाईफस्टाईल पबमध्ये २१ वर्षांखालील तरूण-तरूणी सर्रास मद्यपान करीत असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे आज रात्री आठच्या सुमारास समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी निर्मल लाईफस्टाईल पबवर धाड टाकून मद्यपान करीत असलेल्या २१ वर्षांखालील तरुणांना ताब्यात घेतले. तसेच नऊ तरूणांना रात्री उशिरा वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. दरम्यान, पबच्या मालकावर पबमध्ये २१ वर्षांखालील तरुणांना मद्यपान करू दिल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिववडापाव अडचणीत!
शिवसेना व आयुक्तांची माघार
मुंबई, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

शिवसेनेची बहुचर्चित ‘शिववडापाव’ योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कायद्यानुसार या योजनेच्या स्टॉलवाटपात आरक्षण ठेवले नसल्याचे स्पष्ट झाले असून, विरोधी पक्षनेते राजहंस सिंग याप्रकरणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या ‘शिववडापाव’ योजनेसाठी पालिकेला वेठीस धरण्यात आले आहे. या योजनेत २१५ केंद्रांचे वाटप करण्यात येणार आहे. या वाटपात अपंग आणि ज्येष्ठांना आरक्षण ठेवण्यात आले आहे. मात्र नियमाप्रमाणे मागासवर्गीयांना ३१ टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले नाही. आयुक्त वरच्या जातीचे आहेत आणि शिवसेनेचा आरक्षणाला विरोध आहे, असा गंभीर आरोप राजहंससिंग यांनी केला. आधीच्या ‘झुणका भाकर’ केंद्राच्या योजनेत आरक्षण नव्हते. ही योजनाही पर्यायी रोजगार देण्याची योजना आहे. त्यामुळे याला आरक्षण ठेवण्यात आले नाही, मात्र आता विधी समिती आणि सभागृहाने मान्यता दिल्यास या योजनेत आरक्षण ठेवण्यात येईल, अशी सारवासारव आयुक्त जयराज फाटक यांनी केली. स्थायी समितीचे अध्यक्ष रवींद्र वायकर यांनीही या योजनेत आरक्षण ठेवण्यास शिवसेनेचा विरोध नसल्याचे स्पष्ट केले. नेहमीच आक्रमक असणाऱ्या शिवसेनेला आणि आयुक्तांना आज मात्र आरक्षणाच्या प्रश्नावर नमते घेणे भाग पडल्याचे चित्र पालिकेत दिसून आले.

ठाण्यात आरटीओ कार्यालयास आग
ठाणे, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयातील भांडारगृहास काल मध्यरात्री लागलेल्या आगीत मोठय़ा प्रमाणात रेकॉर्ड जळून खाक झाले. मध्यवर्ती कारागृहासमोरील आरटीओ कार्यालयात २००२ पासूनचे रेकॉर्ड तीन रुममध्ये ठेवण्यात आले होते. त्यामध्ये वाहनांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तसेच लायसन्ससाठी आलेले अर्ज होते. काल रात्री एकच्या सुमारास या कार्यालयास आग लागली. काही वेळातच ही आग इतकी पसरली की ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाला दीड तास लागले. या आगीत तीन खोल्यांतील सर्व रेकॉर्ड नष्ट झाले आहे, पण सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जे रेकॉर्ड आगीत नष्ट झाले आहे, ते अगोदरच संगणकात नोंदलेले असल्याने सुदैवाने मोठी हानी टळली, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत पाटील यांनी सांगितले.