Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९

अन् इतिहास बोलका झाला..
प्रतिनिधी
लोकसत्ता व मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कान्हेरी लेण्यांधील सिटीवॉकमध्ये पुरातत्व तज्ज्ञ डॉ. सूरज पंडित यांच्या माध्यमातून शतकांपूर्वीचाही इतिहास बोलका होत गेला आणि.. या सिटीवॉकसाठी आलेले लोकसत्ताचे वाचक भारावून गेले. वाचकांच्या प्रतिक्रिया त्यांच्यात शब्दात..

बोरिवली-विरार नवे रेल्वेमार्ग शोभेचेच!
कैलास कोरडे

बोरिवली-विरार मार्गाचे चौपदरीकरण होऊन दीड वर्षांहून अधिक कालावधी उलटला तरी, पश्चिम रेल्वेकडून त्याचा पूर्ण क्षमतेने वापर केला जात नाही. लांब पल्ल्याच्या गाडय़ा आणि काही मालगाडय़ांखेरीज एकही लोकल या रेल्वेमार्गावरून दररोज चालविली जात नसल्याने, बोरिवली-विरार रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण शोभेसाठी केले काय? असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. पश्चिम रेल्वेकडून बोरिवली-विरार पट्टय़ात ४००हून अधिक गाडय़ा धावतात. त्या सर्व जुन्या दोन डीसी विद्युतभारित रेल्वेमार्गावरून चालविल्या जातात. नव्या एसी विद्युतभारित रेल्वेमार्गावरून एकही लोकल चालविली जात नाही. दिवसभरातून आठ-दहा लोकल नव्या रेल्वेमार्गावरून जाताना दिसत असल्या तरी, त्या केवळ चाचणीपर चालविल्या जातात. त्यामुळे नवे दोन्ही रेल्वेमार्ग केवळ मेल-एक्स्प्रेस गाडय़ांसाठीच उभारले आहेत की काय, असा प्रश्न सर्वाना पडला आहे.

ही पळापळ कधी थांबणार?
स्वानंद विष्णु ओक

चर्चगेट स्थानकावर एखादी लोकल अचानक फलाट क्रमांक दोनवरून चारवर लावली गेली तर प्रवाशांना फारफार तर १००-२०० मीटर धावपळ करावी लागते. अन्य कोणत्या स्थानकात असे घडले तर तेथे जिना चढण्या-उतरण्याचा व्यायाम वाढतो. परंतु बोरिवली स्थानकात फलाट एक, दोन अथवा तीनवरील लोकल सात अथवा आठ क्रमांकाच्या फलाटावर लावली गेली तर काय परिस्थिती ओढवते हे वर्णन करून सांगण्याजोगे आणि समजण्याजोगेही नाही. ती प्रत्यक्ष ‘सोसण्याचीच’ बाब आहे. अन्यत्र कुठेही नाही अशी एकापुढे एक तीन फलाटांची रचना फक्त बोरिवलीला आहे. बोरिवलीचा फलाट क्रमांक एक, तो चर्चगेटच्या बाजूने जिथे संपतो तिथेच फलाट क्रमांक सात सुरू होतो आणि तो संपल्यावर आठ क्रमांकाचा फलाट सुरू होतो.

५ फेब्रुवारी
गुलाबी थंडीशिवाय माहोल कसा तयार होणार?, पण आज पहाटे छानच थंडी होती. गेले दोन दिवस ती चांगलीच जाणवते आहे. ग्लोबल वॉर्मिगमुळे ऋतुचक्र वगैरे बदलल्याचे तज्ज्ञमंडळी सांगत असतात. आपल्याला काय, आम खाओ, वृक्षारोपण की चिंता क्यों? वेळ चुकेल म्हणून तात्काळ उठलो. आईला आश्चर्य वाटले. मुलगा एवढा नियमित कसा झाला. आता आईला काय सांगणार, पण ती खूश आहे. आजची सुरुवात खूपच पॉझिटिव्ह झाली. बस स्टॉपवर पोहोचण्याआधीच रस्त्यावरच ती भेटली. दर वर्षी मलाच विषयाला वाचा फोडावी लागते. कधी तरी समोरून प्रश्न येऊ देत की. पण नाही.

हिमालय पाटकर याचे चित्र प्रदर्शन
प्रतिनिधी

हिमालय या आठवीत शिकणाऱ्या बालचित्रकाराच्या चित्रांचे प्रदर्शन नरिमन पॉईंट येथील ओबेरॉय आर्ट वॉक या ठिकाणी भरविण्यात येणार आहे. ८ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हिमालयने आजपर्यंत स्वत:ची शंभर प्रदर्शने भरविली आहेत. लिमका बुक ऑफ रेकॉर्ड २००५ मध्येही या छोटय़ा कलाकाराच्या कलेची नोंद झाली आहे. मुलांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण व्हावी यासाठी देखील तो प्रयत्न करत आहे.

‘म्हाडा’ वसाहतींचे नव्याने लेआऊट तयार करण्यात पारदर्शकतेचा अभाव
प्रतिनिधी

म्हाडा वसाहतींना विकास नियंत्रण नियमावलीनुसार २.५ एफएसआय जाहीर झाल्यानंतर नव्याने लेआऊट तयार करण्याची पाळी आली असून हे लेआऊट तयार करण्यासाठी नेमावयाच्या वास्तुतज्ज्ञांच्या नियुक्तीत पारदर्शकेचा अभाव असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. याबाबत वास्तुरचनाकार विभागाकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. म्हाडा वसाहतींचे लेआऊटस् पूर्वीच्या १.२ एफएसआयनुसार मंजूर करण्यात आले तर काही मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. मात्र आता नव्या दुरुस्तीमुळे हे लेआऊटस् नव्याने सादर करावे लागणार आहेत.

नतमस्तक व्हा! काळजी घ्या
डोंगर दऱ्यांमध्ये फिरणाऱ्यांमध्ये ट्रेकर्सबरोबरच पिकनिकर्सची संख्याही अलीकडच्या काळात वाढली आहे. गेल्या सहा-सात वर्षांत प्रसिद्ध गड-किल्ल्यांवर प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहे. दारूच्या बाटल्यांचा खच पडू लागला. गड-किल्ल्यांवर घडणाऱ्या या प्रकारांना अनेक घटक जबाबदार आहेत. कोण चूकत आहे हा मुद्दा जरा बाजूला ठेवला तर लोहगड आणि तिकोना या अतिशय सोप्या असणाऱ्या किल्ल्यांवर अपघाताच्या धोकादायक जागेला फारसा वाव नाही. लोहगडाच्या विंचूकाटय़ाकडे उतरणारा टप्पाच तेवढा अवघड. पण मग तरीही तेथे दुर्घटना का घडल्या? मध्यंतरी सिंहगडावर एक वाग्दत वधू-वर गेले होते. युवकाचा तोल जाऊन तो कडय़ावरून पडला होता.

टाटा पॉवर कंपनीविरुद्ध आज निदर्शने चेंबूरमधील झोपु योजनेला अडथळा आणण्याचे निमित्त
प्रतिनिधी

चेंबूर येथील टाटा वसाहतीजवळ गेल्या ५० वर्षांंपासून वसलेल्या प्रबुद्धनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला टाटा पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून अडथळा आणला जात असल्याचा निषेध करण्यासाठी या कंपनीच्या बॉम्बे हाऊस कार्यालयाबाहेर तसेच आजाद मैदान येथे रहिवासी उद्य शुक्रवारी निदर्शने करणार आहेत. त्यानंतरही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अडथळा आणणे सुरूच ठेवले तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आज वार्ताहर परिषदेत देण्यात आला.

महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे आंदोलन
प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रातील कायम विनाअनुदान हे धोरण राज्य सरकारने बदलावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे आझाद मैदान येथे आंदेलन सुरू आहे. या संदर्भात कायम विना अनुदान कृती समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री पतंगराव कदम यांची मलबार येथील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु कदम यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला पोलिसांनी अटक केली.

ज्येष्ठ शिल्पकार भाऊ साठे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी

बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे ज्येष्ठ शिल्पकार भाऊ साठे यांना बुधवारी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ललित कला अकादमीचे उपाध्यक्ष के. आर. सुबण्णा यांच्या हस्ते ५० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरातील अश्वारुढ शिवाजी महाराजांचा पुतळा घडविणाऱ्या भाऊ साठे यांनी शिल्पकलेत दिलेल्या योगदानाबद्दल ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’तर्फे जहांगीर कलादालनात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कलाप्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या समारंभप्रसंगी त्यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर भाऊ साठे म्हणाले की, १९४६ साली या प्रदर्शनासाठी तयार केलेल्या शिल्पाची ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’तर्फे निवड करण्यात आली नव्हती. सुमारे ६० वर्षांनी त्याच संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद होत आहे. या प्रसंगी सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे म्हणाले की, महाराष्ट्र शासनातर्फे पद्म पुरस्कारांसाठी केवळ चित्रपट कलाकारांच्याच शिफारसी पाठविण्यात येतात. चित्रकला, शिल्पकला आदी ललितकलांमध्ये योगदान दिलेल्या कलाकारांना मात्र उपेक्षित ठेवण्यात येते. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, राज्यशासनातर्फे सर्व कलांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कलाकारांची पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात येते. जहांगीर कलादालनात येत्या १० फेब्रुवारीपर्यंत ११ ते ७ या वेळेत हे राष्ट्रीय कलाप्रदर्शन पाहता येणार आहे.

डॉ. संजय ओक यांना एफआरसीएस पदवी बहाल
प्रतिनिधी

बृहन्मुंबई महानगरपालिकेची वैद्यकीय महाविद्यालये व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. संजय ओक यांना इंग्लंडच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ एडीनबरोने एफआरसीएस ही पदवी देऊन गौरविण्यात येणार आहे. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून कार्य केल्यानंतर आता डॉ. संजय ओक केईएम रुग्णालयात संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) म्हणून कार्यरत आहेत. ओक हे प्रसिद्ध बालरोगशल्यचिकित्सा विशारद आहेत. यापूर्वी त्यांना अमेरिकन कॉलेज ऑफ सर्जन्स, इंटरनॅशनल कॉलेज ऑफ सर्जरी व नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थांची फेलोशिप मिळाली आहे. तसेच डॉ. बी. सी. रॉय राष्ट्रीय पुरस्काराचेही ते मानकरी आहेत. संपूर्ण जुळलेल्या जुळ्या नवजात अर्भकांना शल्यचिकित्सेद्वारे वेगळे करणारी यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. संजय ओक यांनी केली होती. एडीनबरो येथे होणाऱ्या शानदार सोहळ्यात डॉ. संजय ओक यांना पदवी प्रदान केली जाणार आहे.
आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय डॉ. संजय ओक यांनी मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर आणि सायन रुग्णालयांना दिले. गेली २३ वर्षे शल्यचिकित्सेतील कौशल्य मिळविण्याची व ते सिद्ध करण्याची संधी या रुग्णालयांमुळे मिळाली, असेही ते म्हणाले.

यंत्रमाग धारकांना महसूलमंत्र्यांचा दिलासा
प्रतिनिधी

भिवंडी येथील यंत्रमाग धारकांच्या विविध समस्यांवर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन महसूलमंत्री पंतगराव कदम यांनी दिले आहे. माजी आमदार रशीद ताहीर आणि आमदार हाफीज धत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच यंत्रमाग धारकांची एक बैठक पार पडली. त्यावेळी महसूलमंत्री पंतगराव कदम यांनी यंत्रमाग धारकांना दिलासा दिला. यंत्रमाग धारकांकडून मोठय़ा प्रमाणावर दंड आकारण्यात येतो. कृषी जागेत हे यंत्रमाग सुरू आहेत. त्यांना बिगरशेतीच्या दहापट धारा आकारून यंत्रमाग अधिकृत करणे ही प्रमुख मागणी होती. या वेळी यंत्रमाग व्यावसायिकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.