Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९

नवनीत

जी व न द र्श न
हॅपी बर्थ डे

 

आपल्या जन्मदिवसाची कुणाला हौस नसते? एका दिवसाला जगभरात लाखो मुले जन्माला येतात. परंतु सर्वाचेच नशीब सारखे नसते. एका तिथीला जन्मणाऱ्या सर्व मुलांचे नशीब सारखे असले असते तर सगळेच मंत्री, चोर किंवा नेता वगैरे झाले असते. जीवनाचा खरा रस ‘आपण कोण झालो’ याच्यात नसून, आपणास परमेश्वराने जी शक्ती दिली आहे, त्याचा परिपूर्ण वापर करण्यात आहे. शिक्षणाची परिभाषा करताना लगेच विचारतात की, किती टक्के गुण मिळाले? पण हे कोणी विचारत नाही की विद्यार्थ्यांने आपल्याला प्रदान करण्यात आलेल्या मानसिक गुणवत्तेचा किती टक्के वापर केला. एक कुशल विमानचालकाइतकाच तो चांभारही आदरणीय आहे, ज्याने वैमानिकाचे बूट शिवताना आपल्या कुशलतेची पराकाष्टा केली, जेणेकरून वैमानिकाचे लक्ष पायाला चावणाऱ्या बुटाकडे गेले नाही आणि त्याने प्रवाशांना सुरक्षितपणे विमानतळावर उतरविले. जन्मदिवस साजरा करत असताना आपण विनाकारण प्रसन्नता बडवत बसतो. ज्या लोकांची जन्म आणि मृत्यूच्या बंदोबस्तावर दृष्टी आहे ते सहजपणे समजू शकतात, की आजच्या दिवशी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या कालावधीतून एक वर्ष वजा करण्यात आले. प्रत्येक माणूस प्रत्येक क्षणी मृत्यूच्या निकट पोहोचत आहे. ते कसे? पुढील गोष्ट वाचा- ‘एका मोहल्ल्यातून बर्फ विकणारा हाका मारत जात होता,‘‘बर्फ ले लो, बर्फ ले लो!’’ हे ऐकताच त्या मोहल्ल्यात वास्तव्य करणारे एक सूफी ढसाढसा रडू लागले. अनुयायांनी कारण विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येकाचे जीवन बर्फाच्या एका लादीप्रमाणे आहे. ते सतत वितळण्याच्या मार्गावर आहे. परंतु मनुष्य आपल्या ऐषारामात असा व्यस्त आहे, की त्याला मृत्यूच्या प्रसंगाची आठवणच होत नाही. माणसाची ही अवस्था पाहून मला रडू आवरले नाही.’
अनीस चिश्ती

कु तू ह ल
अपयशी तारे

गुरूचा काही वेळा अपयशी तारा असा उल्लेख का केला जातो? अशा प्रकारचे आणखी कोणते ग्रह आपल्या सूर्यमालेत आढळतात?
हायड्रोजन वायूच्या अवाढव्य ढगांपासून ताऱ्यांची निर्मिती होते. अशा प्रचंड ढगांमध्ये जर काही कारणाने आकुंचन प्रक्रिया सुरू झाली, तर त्या भागातील जास्त घनतेमुळे गुरुत्वीय आकर्षण वाढते आणि जास्त प्रमाणात हायड्रोजन वायू आकर्षिला जातो. या प्रक्रियेत वायूचा ढग आकुंचन पावतो आणि त्याचे तापमान वाढते. एका ठरावीक मर्यादेपलीकडे जर दाब आणि तापमान वाढले तर हायड्रोजन अणूंची संम्मिलन (फ्युजन) प्रक्रिया सुरू होऊन हेलियमची निर्मिती होते आणि मग त्या ढगाचे ताऱ्यात रूपांतर झाले, असे आपण म्हणतो. ताऱ्याच्या निर्मितीसाठी सूर्याच्या किमान दहा टक्के वस्तुमान आवश्यक असते. गुरूचे वस्तुमान मात्र सूर्याच्या एक हजार पटीने कमी आहे. जर गुरूचे वस्तुमान आणखी पाचपटही असते, तर सूर्यमाला बनवतानाच त्याने आणखी बऱ्याच प्रमाणात हायड्रोजन आपल्याकडे खेचून घेतला असता आणि त्याचे वस्तुमान आणखी बरेच वाढले असते. तसेच सूर्य पूर्णपणे तारा बनण्याआधीच जर गुरूचे वस्तुमान वाढले असते तर जास्त प्रमाणात हायड्रोजनही उपलब्ध झाला असता. कारण सूर्याच्या जन्मानंतर त्याच्या प्रखर किरणांमुळे बराचसा हायड्रोजन दूर ढकलला गेला आणि गुरू किंवा इतर ग्रहांना तो आपल्याकडे खेचून घेता आला नाही अन्यथा पृथ्वीला दोन सूर्य लाभले असते. मात्र त्यामुळे पृथ्वीची कक्षा अस्थिर होऊन कदाचित जीवसृष्टीच निर्माण होऊ शकली नसती. आपल्या आकाशगंगेतील अध्र्याहून अधिक तारे जोडीजोडीने आढळतात. सूर्य हा एकटा असल्यामुळे तो तसा अपवादात्मक तारा आहे. म्हणूनच गुरू हा सूर्याचा ‘अपयशी जोडीदार’ समजला जातो. गुरूसारख्या वस्तुमानाचे इतर ग्रह सूर्यमालेत नाहीत. या बाबतीत शनीच गुरूच्या थोडय़ा फार जवळ येऊ शकतो.
महेश शेट्टी
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
रोनाल्ड रेगन

वयाच्या सत्तराव्या वर्षी अमेरिकेचे चाळिसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणाऱ्या रोनाल्ड रिगन यांचा जन्म टाम्पिको येथे ६ फेब्रुवारी १९११ रोजी झाला. युरेका कॉलेजातून शिक्षण पूर्ण केल्यावर काही काळ क्रीडा समीक्षक म्हणून काम केले. पुढे चित्रपटसृष्टीतही काही काळ वावरले. अभिनेत्री नॅन्सी डेव्हिड हिच्याशी त्यांनी विवाह केला. तिच्या भावामुळे त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. १९६६ मध्ये कॅलिफोर्नियाच्या राज्यपालपदी त्यांची नेमणूक झाली. १९६८ व १९७६ मध्ये दोन वेळा अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीने त्यांना हुलकावणी दिली. अखेर १९८० साली अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडलेला सर्वाधिक वृद्ध अशी त्यांची इतिहासात नोंद झाली. सामान्यांमधील अफाट लोकप्रियतेच्या जोरावर दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते निवडून आले. तथापि, त्यांच्या काही आर्थिक धोरणांमुळे ते आणि अमेरिका दोघेही संकटात आले. रिगन यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कारकीर्दीत १९८७च्या सुमारास अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला. त्यांच्या काळात अमेरिका अतिभोगवादाकडे वळल्याने राष्ट्रीय व परराष्ट्रीय कर्जात वाढ झाली. त्यांच्या ‘तारका युद्ध’ या संकल्पनेचीही टर उडवली गेली. विस्मरण हा त्यांचा आणखी एक दोष. एका शाही समारंभात स्वत:च्या मुलालाच स्वत:ची ओळख करून दिल्याने त्यांच्यावर टीका झाली. परंतु त्यांची धोरणे कशी बरोबर आहेत, विशेषत: तारका युद्धाची टर उडविणाऱ्यांना आखाती युद्धात त्याचे महत्त्व कळले. त्यातच पुढे कर्करोगाच्या व्याधीने त्यांना ग्रासल्याने अमेरिकनांना त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली. अलीकडेच त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
हिरव्या डोळ्यांचा अल्लयगल्लय

शाळा सुटल्यावर वर्धन नेहमीसारखा पुष्पबागेत खेळायला आला होता. घसरगुंडीवर खेळल्यानंतर कंटाळा आला, तसा तो झोपाळय़ावर बसला. झोका फार उंच जाईना, तसा बाजूच्या दोन्ही साखळय़ांना धरून तो उभा राहिला. गुडघे वाकवून पायाच्या रेटय़ाने झोका उंच उंच नेऊलागला. वेगाने झोका पुढे-मागे होत राहिला. वेगाची झिंग त्याच्या डोक्यात शिरली. कुणीतरी खालून ओरडले, ‘‘अरे बाळा, पडशील. हळू.’’ तसे उंच जाणे थांबवून तो फळीवर बसला. थोडय़ा वेळाने झोका थांबला. वर्धन झोक्यावरून उतरून बाबांची वाट पाहात बसला. ऑफिसातून परत जाताना बाबा त्याला स्कूटरवरून घेऊन जायचे. बागेतून भटकताना उंच उंच झाडांच्या मोठमोठय़ा फांद्या तोडलेल्या त्याला दिसल्या. कोपरातून हात नसलेला माणूस नसतो तशी ती झाडे त्याला केविलवाणी वाटली. बागेत खूप मोठमोठाली झाडे होती. त्यावर चढलेले वेल होते. वाफ्यांमध्ये फुलझाडे होती. एका रांगेत मोठय़ा पोटरीच्या पायासारख्या खोडाची झिपरी झाडे होती. अंधार पडायला लागला. बाबांची वाट पाहात वर्धन एका खोडाला टेकून उभा राहिला. कुणाचे लक्ष नाही पाहून तो खोडावर चढला आणि तोडलेल्या फांदीचा चार फूट भाग आणि खोडाच्या दुबेळक्यात बसला. कसला तरी आवाज आला. त्याच्या लक्षात आले की, तुटक्या फांदीला लांबोडके भोक आहे. तिथून आवाज येत आहे. त्याने आत डोकावून पाहिले तर छोटे-छोटे आकार खूप कामात गर्क होते. डोळे ताणून ताणून तो पाहू लागला, तसा त्याच्या अगदी कानाशी आवाज आला. ‘काय रे मुला, काय येतं तुला?’ वर्धन दचकला. अरेच्चा! हा तर अगदी छोटासा माणूसच आहे. पण याला गणपतीबाप्पासारखे चार हात आहेत. त्याला तो चार हातांचा प्रेमळ चेहऱ्याचा माणूस फारच आवडला. त्याचे डोळे अंधाराला सरावले आणि आत वारुळातल्या मुंग्यांसारखी खूप माणसे दिसू लागली. तो प्रेमळ चेहऱ्याचा माणूस म्हणाला,‘‘मी अल्लयगल्लय. तू?’ ‘मी वर्धन. इथं काय करता तुम्ही सगळे?’ अल्लयगल्लय आपले सगळे हात आणि हिरवे डोळे फिरवत म्हणाला, ‘‘आम्ही शहरातल्या झाडांची काळजी घेतो. तुटक्या झाडांना मलमपट्टी करतो. वाळल्या झाडांना पुन्हा पालवी येणारे रसायन देतो. फुले, फळे उमलावीत, पाने टवटवीत व्हावीत म्हणून जादूचे फवारे मारतो.’’ ‘अरे! पण हे सगळे कधी आणि कसे करता?’ ‘रात्री, तुम्ही सगळे मानव झोपलात की आमचे काम सुरू होते.’ त्या दिवसापासून वर्धनला नवा मित्र मिळाला- अल्लयगल्लय. संध्याकाळी गप्पा मारायला आणि सगळय़ात गंमत म्हणजे अल्लयगल्लय कधी कधी रात्री येऊन, झोपलेल्या वर्धनला छोटुकला करून, झाडाझुडपांची काळजी घेण्याच्या मोहिमेतसुद्धा सामील करून घ्यायचा.
मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा तोल ढासळला आहे. हे असेच चालत राहिले तर मानवाचे भवितव्य संकटात येईल.
आजचा संकल्प- मी आज माझ्या घरापाशी एक झाड लावेन आणि जगवेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com