Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९

आघाडीत प्रारंभीच बिघाडी
नवी मुंबई/प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ‘हम साथ साथ है’चा नारा देत आठवडाभरापूर्वी ठाण्यात गळ्यात गळे घालणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइंच्या नेते मंडळींनी बुधवारी रात्री नवी मुंबईत एकमेकांचे तोंड पाहण्याचेही टाळल्याने या होऊ घातलेल्या आघाडीत प्रारंभीच बिघाडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पुढाकार घेऊन बोलाविलेल्या या मित्रपक्षांच्या बैठकीस काँग्रेसचा एकही नेता फिरकला नाही. विशेष म्हणजे, या बैठकीस काँग्रेस पक्षाकडून उपस्थित राहण्यासाठी खास रायगडातून नवी मुंबईच्या मोहिमेवर आलेले संपर्कमंत्री रवि पाटील यांनाही कार्यकर्त्यांच्या दबावामुळे गणेशदादांना हुलकावणी देत माघारी परतावे लागले.

भारती विद्यापीठात गोव्याचे थीम डिनर
नवी मुंबई/ प्रतिनिधी

भारती विद्यापीठ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या वतीने अलिकडेच गोव्यातील खाद्यपदार्थाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी कॉलेजच्या वतीने अशा निरनिराळ्या प्रांतांतील खाद्यपदार्थाचा समावेश असलेल्या थीम डिनरचे आयोजन करण्यात येते. यंदा कॉलेज कॅम्पसमध्ये चक्क गोवा अवतरला होता. गोव्यातील खाद्यपदार्थासोबत तेथील लोककलांचे सादरीकरणही या महोत्सवात झाले. संध्याकाळी आठ वाजता सुरू झालेला हा महोत्सव उत्तरोत्तर रंगत गेला. प्राचार्या लता पाटील आणि इतरांनी हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. संचालक डॉ. व्ही. जे. कदम आणि डॉ. डी. वाय.पाटील यांनी महोत्सवासाठी सहकार्य केले. फ्रुट केक आणि रेड वाईनने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्टार्टस् सव्‍‌र्ह करण्यात आले. शेवटी लज्जतदार गोवन डिश सव्‍‌र्ह करण्यात आल्या.

गणेशदादांचा मंदाताईंना पुन्हा ठेंगा!
नवी मुंबई/प्रतिनिधी

जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी बोलाविलेल्या मित्रपक्षांच्या बैठकीकडे काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरविल्यामुळे आधीच आघाडीत बिघाडी निर्माण झाली असताना या बैठकीस राष्ट्रवादीच्या विधान परिषदेच्या आमदार मंदा म्हात्रे यांनाही डावलले गेल्याने राष्ट्रवादीतच यामुळे दोन गट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पालकमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते तसे सर्वश्रुतच आहे.असे असले तरी ठाणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये या दोघांमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी समेट घडवून आणला. कधी नव्हे तर मंदाताई या संजीव नाईक यांच्या प्रचारासाठी निवडणूक मैदानात उतरल्या. मतभेद दूर सारून एकत्र नांदण्याच्या आणाभाकाही घेण्यात आल्या. मात्र निवडणूक संपताच गणेशदादा आणि मंदाताईंमध्ये पुन्हा एकदा शीतयुद्ध सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.

रिक्षाभाडे कमी न केल्यास भाजपचा आंदोलनाचा इशारा
बेलापूर/वार्ताहर : पेट्रोल व डिझेलचे दर दोन वेळा कमी होऊनही नवी मुंबईतील रिक्षाचालकांनी भाडे कमी केले नाही. नवी मुंबई आरटीओदेखील याची गांभीर्याने दखल घेत नाही. या कारणास्तव आता नवी मुंबई भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे एक निवेदन भाजप सरचिटणीस सी. व्ही. रेड्डी यांनी आरटीओला दिले असून, दोन दिवसांत रिक्षाचे भाडे कमी न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे रेड्डी म्हणाले.

नवी मुंबईकर दरदिवशी वाचवितात १७ लाख लिटर पाणी!
जयेश सामंत

नवी मुंबई परिसरात पाण्याच्या वापरावर मीटर पद्धत बंधनकारक करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा फॉम्र्युला भलताच यशस्वी ठरू लागला असून, प्रत्येक दिवशी नवी मुंबई महापालिकेचे सुमारे १७ लाख लिटर पाण्याची बचत होऊ लागली आहे. ‘पाण्याचा जेवढा वापर, तेवढे बिल’ हा महापालिकेचा फंडा हिट ठरू लागला असून, शहरातील प्रत्येक व्यक्तीमागे दिवसाला सरासरी ७० लिटर पाण्याची बचत होऊ लागली आहे. ‘मोरबे’ धरणाची खरेदी करून नवी मुंबई महापालिका स्वत:च्या मालकीचे धरण असणारी राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची महापालिका ठरली आहे. या धरणाच्या जोरावर येत्या वर्षभरात शहरातील सर्व उपनगरांमध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्याचा संकल्प महापालिकेने सोडला आहे.

श्री केदार-जननी वार्षिक उत्सव
मुंबई : श्री केदार-जननी देवीचा सुवर्णमहोत्सवी वार्षिक उत्सव रायगड जिल्ह्यातील कोलाडजवळच्या तिसे गावातील पर्वतावर माघी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच ९ आणि १० फेब्रुवारी २००९ रोजी साजरा करण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजता श्री जननी आणि श्री पद्मावती देवींचे मुखवटे आणि श्री केदारनाथांचा नागफणा यांचे पालखीतून गडावर प्रस्थान होणार आहे. तिसे गाव ते जननी पर्वत पायथा या कच्च्या रस्त्याची दुरुस्ती मंडळाने केल्याने वाहने पर्वताच्या पायथ्यापर्यंत जाऊ शकतील. अधिक माहितीसाठी संपर्क - शेखर दिघे ९२२०६०८७६३.