Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९

चीअरगर्ल्सचा तडका आणि ढोलताशाचा दणका; टी-१० गल्ली क्रिकेटचा ऑर्केस्ट्रा
अविनाश पाटील / नाशिक

आयपीएल आणि आयसीएलमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटचे संपूर्ण चित्रच बदलले असून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून या स्पर्धाच्या मीनी आवृत्या आता गल्लीबोळातून निघू लागल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याने आपल्या पध्दतीने नियम तयार करून मनोरंजनाच्या चकचकीत वेष्टनात क्रिकेटचे सँडविच प्रेक्षकांपुढे पेश करण्यात येत आहे. मनोरंजनाची ही डिश केवळ कसोटी केंद्रांपुरती मर्यादित राहू नये, याची दक्षता ही मंडळी घेत असल्याने रणजी सामन्यांच्या आयोजनापुढे मजल जाऊ न शकलेल्या नाशिककरांना गुरुवारी ‘टी-१०’ स्पर्धेनिमित्त एकाच वेळी चिअरगर्ल्सचा तडका व नाशिक ढोलताशांवरील गल्ली डान्सचा अनुभव घेता आला.गुणवत्तावान प्रत्येक क्रिकेटपटूला सचिन तेंडुलकर बनता येत नाही. परंतु त्यांना आपल्यातील गुणवत्तेचे दर्शन राष्ट्रीय स्तरावर दाखविण्याची संधी मिळावी, या हेतूने रिझनेबल कम्युनिकेशन्स लिमिटेडतर्फे ‘टी-१०’ ही गल्ली क्रिकेट स्पर्धा संपूर्ण देशात खेळविण्यात येत आहे. स्पर्धेचा तिसरा टप्पा गुरूवारी येथील अनंत कान्हेरे मैदानात पूर्ण झाला.ट्वेन्टी-२० क्रिकेटने रोमांचकता वाढविण्यासह मनोरंजनाचे नवे दालनच क्रीडाप्रेमींसाठी खुले केले.

विद्यार्थ्यांनी अनुभवली निसर्गचित्रातील सहजता
प्रतिनिधी / नाशिक

कॅनव्हॉसवर फिरणारा ब्रश आणि तयार होणारी कलाकृती, याकडे उपस्थित डोळे विस्फारून बघत होते. अवघ्या काही मिनिटात एखादा ‘मानसीचा चित्रकार’ किती सहजतेने चित्र काढू शकतो, याचे प्रात्यक्षिकच त्यांना बघावयास मिळाले. ज्येष्ठ चित्रकार शिवाजी तुपे यांच्या ब्रशमधील ही जादू अनुभवता आली डोंगरे वसतीगृहाच्या मैदानात आयोजित ‘नवनीत ज्ञानसागर २००९’ या प्रदर्शनामध्ये. नाशिक डिस्ट्रीक्ट बुकसेलर्स अ‍ॅन्ड स्टेशनर्स असोसिएशन आणि नवनीत यांच्या सहकार्याने हे पुस्तक तसेच शालोपयोगी साहित्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनात शैक्षणिक विषयावर विविध प्रात्यक्षिके व परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले असून गुरूवारी शिवाजी तुपे यांचे जलरंगच्या माध्यमातून निसर्ग चित्र काढण्याचे प्रात्यक्षिक झाले. निसर्गचित्र काढण्यात तुपे यांचा हातखंडा असला तरी या शैलीची नव्या कलाकारांनाही ओळख व्हावी, यासाठी या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.

‘टी-१०’ गल्ली क्रिकेटमध्ये नाशिक केंद्रात ‘गल्ली फोर’ विजेता
नाशिक, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

युवा क्रिकेटपटूंच्या गुणवत्तेचे दर्शन सर्वाना व्हावे म्हणून रिझनेबल कम्युनिकेशन्सतर्फे आयोजित नाशिक केंद्रावरील ‘टी-१०’ राष्ट्रीय गल्ली क्रिकेट स्पर्धेत ‘नाशिक गल्ली नंबर फोर’ संघ विजेता ठरला. संपूर्ण दिवसातील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल मनोज परदेशीला २५ हजार रूपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. येथील अनंत कान्हेरे मैदानात आज या स्पर्धेतील सामने झाले. उद्घाटन सोहळ्यास समालोचक चारू शर्मा, मॉडेल सुशील झिग्रा हे उपस्थित होते. नाशिक गल्ली वन संघाचे नेतृत्व आशिष टिबरीवाला, गल्ली टू चे सूरज पाटील, गल्ली थ्रीचे मोहित कपूर तर गल्ली फोरचे नेतृत्व मनोज परदेशी यांनी केले.

‘मविप्र’मध्ये ‘डॉक्टर व रूग्ण सुसंवाद’ परिसंवादाचे आयोजन
नाशिक, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) संचलीत वैद्यकिय महाविद्यालयातर्फे डॉक्टर रूग्ण यांच्यामधील ‘सुसंवाद’ या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी आडगांव येथील मविप्र रूग्णालय सभागृहात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भालचंद्र गाडगीळ यांच्या हस्ते परिसंवादाचे उद्घाटन होईल, असे सरचिटणीस डॉ. वसंत पवार यांनी कळविले आहे.

नेतेमंडळींकडून होर्डिंगच्या जंजाळाचे खापर पालिकेवरच
प्रतिनिधी / नाशिक

अनधिकृत जागेवर होडिर्ंग न लावण्याच्या निर्णयाला संमती देणाऱ्या जवळपास सर्वच राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भूमिकेला छेद देऊन शहराला पुन्हा एकदा होर्डिग्जच्या जंजाळाद्वारे विद्रुपीकरणाच्या मार्गावर ढकलण्यास सुरूवात केल्याची टीका होत असताना संबंधितांनी मात्र त्याचे खापर पालिकेच्याच माथी फोडले आहे. फलकबाजीस उधाण आले असताना महापालिका मात्र एकतर कारवाई करीत नाही आणि केलीच तर पक्षभेद करीत असल्याने त्यातून काही फलनिष्पत्ती होणार नसल्याचे खुद्द राजकीय पक्षांचे मत आहे.

नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी रामदास सदाफुले
नाशिकरोड, ५ फेब्रुवारी / वार्ताहर

येथील दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक रामदास (बाबा) सदाफुले तर उपाध्यक्षपदी अशोक सातभाई यांची सर्वानुमते अविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. एल. प्राय यांनी काम पाहिले. बँकेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे व सुनील आडके यांच्या पॅनलची सत्ता आहे. मावळते अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे व उपाध्यक्षा रंजना बोराडे यांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले. निवडणूक प्रक्रियेप्रसंगी बँकेतील सर्व २२ संचालक उपस्थित होते.

बाळासाहेब वाघ यांना पुणे विद्यापीठाचा‘जीवन साधना गौरव’ पुरस्कार
नाशिक, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

येथील कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांना शैक्षणिक, संघटनात्मक, कृषी, सहकार, जलसंधारण, सामाजिक व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुणे विद्यापीठाचा ‘जीवन साधना गौरव पुरस्कार’ जाहीर झाल्याची माहिती संस्थेचे सचिव डी. एस. शिंदे यांनी पत्रकान्वये दिली. पुरस्कार प्रदान सोहळा १० फेब्रुवारी रोजी पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात होणार असून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. वाघ यांनी महाराष्ट्र शासनाने डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या महाराष्ट्र दुसऱ्या जलसिंचन आयोगात ज्येष्ठ सदस्य म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या जलव्यवस्थापनाला आगामी भविष्यात नवी दिशा देण्यात या आयोगाच्या माध्यमातून भरीव योगदान वाघ यांनी दिले आहे. राज्यस्तरावरील खासगी विनाअनुदानित अभिायंत्रिकी संघटना, राज्यस्तरावरील विनाअनुदानित कृषी व कृषी संलग्न संघटना, राज्यस्तरावरील खासगी तंत्रनिकेतन संघटना या तीनही संघटनांचे अध्यक्ष तसेच फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ प्रायव्हेट कॉलेजेस या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून सध्या ते कार्यरत आहेत.

इतिहास शिक्षकांचा उद्बोधन वर्ग
नाशिक / प्रतिनिधी

नाशिकरोड महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे इयत्ता सातवीच्या इतिहास शिक्षकांसाठी नुकताच उद्बोधन वर्ग घेण्यात आला. उद्बोधन वर्गाचे उद्घाटन नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या प्रमुख शिक्षणाधिकारी ललिता वीर यांनी केले. इतिहासाच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्ये रूजविण्याचे आवाहन यावेळी वीर यांनी केले. या कार्यक्रमास सकाळचे संपादक विश्वास देवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इतिहासाचे अध्यापन करताना शिक्षकांनी समाजात सामाजिक सौहार्द व देशप्रेम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. इतिहास विभाग प्रमुख व या पाठय़पुस्तकाचे लेखक प्रा. डी. एम. पठाण यांनी उद्बोधन वर्गाचा हेतू स्पष्ट केला. इतिहास शिक्षक महामंडळाचे पदाधिकारी बापुसाहेब शिंदे व विजयचंद्र थत्ते यांनी इतिहास शिक्षक महामंडळाची भूमिका स्पष्ट केली. बालभारतीच्या इतिहास विभाग मुख्य अधिकाऱ्यांनी ‘बालभारती’ भूमिका विशद केली. या पाठय़पुस्तकाचे लेखक प्रा. लहु गायकवाड यांनी व डॉ. जयश्री पाटणकर पाठय़पुस्तकावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. गिरीश टकले यांनी ‘नाशिक जिल्ह्य़ातील दुर्गसंपदा व मध्ययुगीन इतिहास’ या विषयावर दृकश्राव्य माध्यमाव्दारे व्याख्यान दिले.