Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

चीअरगर्ल्सचा तडका आणि ढोलताशाचा दणका; टी-१० गल्ली क्रिकेटचा ऑर्केस्ट्रा
अविनाश पाटील / नाशिक

आयपीएल आणि आयसीएलमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटचे संपूर्ण चित्रच बदलले असून त्यांना

 

मिळणारा प्रतिसाद पाहून या स्पर्धाच्या मीनी आवृत्या आता गल्लीबोळातून निघू लागल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याने आपल्या पध्दतीने नियम तयार करून मनोरंजनाच्या चकचकीत वेष्टनात क्रिकेटचे सँडविच प्रेक्षकांपुढे पेश करण्यात येत आहे. मनोरंजनाची ही डिश केवळ कसोटी केंद्रांपुरती मर्यादित राहू नये, याची दक्षता ही मंडळी घेत असल्याने रणजी सामन्यांच्या आयोजनापुढे मजल जाऊ न शकलेल्या नाशिककरांना गुरुवारी ‘टी-१०’ स्पर्धेनिमित्त एकाच वेळी चिअरगर्ल्सचा तडका व नाशिक ढोलताशांवरील गल्ली डान्सचा अनुभव घेता आला.
गुणवत्तावान प्रत्येक क्रिकेटपटूला सचिन तेंडुलकर बनता येत नाही. परंतु त्यांना आपल्यातील गुणवत्तेचे दर्शन राष्ट्रीय स्तरावर दाखविण्याची संधी मिळावी, या हेतूने रिझनेबल कम्युनिकेशन्स लिमिटेडतर्फे ‘टी-१०’ ही गल्ली क्रिकेट स्पर्धा संपूर्ण देशात खेळविण्यात येत आहे. स्पर्धेचा तिसरा टप्पा गुरूवारी येथील अनंत कान्हेरे मैदानात पूर्ण झाला.
ट्वेन्टी-२० क्रिकेटने रोमांचकता वाढविण्यासह मनोरंजनाचे नवे दालनच क्रीडाप्रेमींसाठी खुले केले. रोमहर्षकता, चिअरगर्ल्सचे नृत्य, डीजेचा दणदणाट हे सर्व काही अवघ्या तीन तासात! आणखी काय हवे ? हेच सर्व काही आणखी कमी वेळेत मिळाले तर.. ‘टी-१०’ ही संकल्पना यातूनच पुढे आली. आतापर्यंत रणजी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करणाऱ्या नाशिकची या स्पर्धेसाठी देशभरातील आठपैकी एक केंद्र म्हणून निवड करण्यात आली. नियामक मंडळाशी कोणताही संबंध नसल्याने रंजकता वाढविण्यासाठी जे जे सुचेल ते ते या स्पर्धेतील सामन्यादरम्यान समाविष्ट करण्यात आले. क्रिकेटचा हा नवीन मीनी फंडा प्रेक्षकांनाही पसंत पडल्याचे नाशिक केंद्रातील सामन्यांना मिळालेल्या प्रतिसादावरून दिसून आले. या स्पर्धेमुळे नाशिकच्या क्रिकेटने तळपत्या उन्हात का होईना प्रथमच चीअरगर्ल्सचा जलवा अनुभवला. डीजेच्या दणदणाटात अवतरलेल्या या विदेशी पध्दतीला स्वदेशीची साथ असावी म्हणून ढोल, ताशा आणि त्यावर लोकनृत्य, अशी कल्पकताही आयोजकांनी दाखवली. त्यामुळे षटकार, चौकार अथवा गडी बाद झाल्यावर प्रेक्षकांना ‘विदेशी विरुध्द स्वदेशी’ अशा आगळ्या जुगलबंदीचाही आनंद घेता आला.
एवढे सर्व करूनही क्रिकेटच्या या डिशमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी सुनील पाल विनोदाची फोडणी देण्यास तयारच होता. डीजे, डान्स, मिमिक्री यांचा संगम झाल्याने अनंत कान्हेरे मैदानात क्रिकेट सुरू आहे की ऑर्केस्ट्रा, असा प्रश्न अनेकांना पडत होता. पण, दुसऱ्या बाजूला डीजेचा आनंद प्रेक्षकांसह खेळाडूही घेताना दिसत होते. खेळाडूंचे रंगबेरंगी पोषाख आणि दूरदर्शनच्या राष्ट्रीय तसेच डीडी स्पोर्टस वाहिनीवरून थेट प्रक्षेपण हे या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्टय. स्पर्धेपूर्वी अतिशय अल्प प्रसिध्दी करण्यात आली असतानाही मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याने पुढील वर्षीही या स्पर्धेचे आयोजन झाल्यास नाशिक केंद्र हे त्यासाठी राहील हे नक्की.
या केंद्रावरील सामने यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्पर्धेचे संचालक अनूप व अशोक वाधवा यांच्यासह स्थानिक संयोजक ‘गुरू’ माजी रणजीपटू शेखर गवळी यांनी घेतलेली मेहनतही महत्वाची. स्पर्धेच्या स्वरूपावर काही ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी आरोप केले असले तरी आशिष टिबरीवाला, मोहित कपूर, मनोज परदेशी यासारख्या अनेक नवोदित क्रिकेटपटूंना आपल्यातील गुणवत्ता दूरदर्शनवरील थेट प्रक्षेपणामुळे देशभर दाखविता आली हे अधिक महत्वाचे..