Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

विद्यार्थ्यांनी अनुभवली निसर्गचित्रातील सहजता
प्रतिनिधी / नाशिक

कॅनव्हॉसवर फिरणारा ब्रश आणि तयार होणारी कलाकृती, याकडे उपस्थित डोळे विस्फारून बघत होते.

 

अवघ्या काही मिनिटात एखादा ‘मानसीचा चित्रकार’ किती सहजतेने चित्र काढू शकतो, याचे प्रात्यक्षिकच त्यांना बघावयास मिळाले. ज्येष्ठ चित्रकार शिवाजी तुपे यांच्या ब्रशमधील ही जादू अनुभवता आली डोंगरे वसतीगृहाच्या मैदानात आयोजित ‘नवनीत ज्ञानसागर २००९’ या प्रदर्शनामध्ये.
नाशिक डिस्ट्रीक्ट बुकसेलर्स अ‍ॅन्ड स्टेशनर्स असोसिएशन आणि नवनीत यांच्या सहकार्याने हे पुस्तक तसेच शालोपयोगी साहित्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनात शैक्षणिक विषयावर विविध प्रात्यक्षिके व परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले असून गुरूवारी शिवाजी तुपे यांचे जलरंगच्या माध्यमातून निसर्ग चित्र काढण्याचे प्रात्यक्षिक झाले. निसर्गचित्र काढण्यात तुपे यांचा हातखंडा असला तरी या शैलीची नव्या कलाकारांनाही ओळख व्हावी, यासाठी या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. तुपे यांच्यासह अनिल अभंगे, सुहास जोशी आणि प्रफुल्ल सावंत या चित्रकारांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरूवात झाली.
निसर्गचित्रण आवडीचा विषय असल्याने मोठय़ा प्रमाणावर आपण भटकंती केली. त्यामुळे विषयाचा आवाका लक्षात येत गेला, असे तुपे यांनी सांगितले. प्रत्येक प्रसंगातील रंगसंगती, संधीप्रकाश आणि चित्रातील समतोल याचा अभ्यास करतांना नजर तयार झाली. चित्राचे व्याकरण समजत गेले. त्याचा फायदा आज होत आहे, असे अनुभवाचे बोलही त्यांनी ऐकविले. आज फक्त कुठल्याही ठिकाणी जाऊन आपल्या स्केच बुकमध्ये ते चित्र रेखाटायचे आणि स्टुडिओत त्यामध्ये रंग भरायचे हा माझा छंद झाला आहे. या प्रात्यक्षिकाचा कलाप्रेमींना फायदा होईल, यामध्ये शंका नाही. परंतु हे करतांना आयोजकांनी स्क्रीनची व्यवस्था केली असती तर कलाप्रेमींना रंगछटांचा अभ्यास जवळून करता आला असता, अशी त्रुटी दाखविण्यासही ते विसरले नाहीत. कार्यक्रमाची औपचारिकता आटोपल्यावर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक जवळून पाहता यावे यासाठी त्यांनी व्यासपीठावर बसण्यास सांगितले. प्रात्यक्षिकाच्या वेळी तुपे यांनी अवघ्या काही मिनिटांत एका कोऱ्या कॅनव्हॉसवर तयार केलेल्या स्केचमध्ये जलरंगाच्या माध्यमातुन ब्रशच्या साह्य़ाने स्ट्रोक देत रंगाच्या विविध छटांमधून चित्राला आकार दिला.
या उपक्रमात सायंकाळी खगोलशास्त्र अभ्यासक प्रा. गिरीश पिंपळे यांचे ‘वेध खगोलाचा-एक परिचय’ या विषयावर व्याख्यान झाले.
या प्रदर्शनामुळे नाशिककरांना एका छताखाली शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांची माहिती मिळत असून या ठिकाणी शिक्षक, विद्यार्थी व पालकांसाठी शैक्षणिक साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. एकूण २१६ स्टॉल असून या निलेश देशपांडे यांची रांगोळी हे प्रदर्शनाचे आकर्षण ठरले आहे. देशपांडे यांनी रंग आणि रांगोळीच्या माध्यमातून अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र ‘अग्निपंख’, वसंत कानेटकर यांचे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, कुसुमाग्रजांचे ‘समिधा’, साने गुरूजी यांचे ‘श्यामची आई’, दुर्गा भागवत यांचे ‘ॠतुचक्र’, किरण बेदी यांचे ‘आय डेअर’ या पुस्तकांची मुखपृष्ठे रांगोळीच्या माध्यमातुन रेखाटली आहेत. नवनीत ज्ञानसागरला पहिल्याच दिवशी दहा हजार नाशिककरांनी हजेरी लावली असल्याचे संयोजक ॠषीकेश धात्रक यांनी सांगितले.