Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘टी-१०’ गल्ली क्रिकेटमध्ये नाशिक केंद्रात ‘गल्ली फोर’ विजेता
नाशिक, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

युवा क्रिकेटपटूंच्या गुणवत्तेचे दर्शन सर्वाना व्हावे म्हणून रिझनेबल कम्युनिकेशन्सतर्फे आयोजित नाशिक

 

केंद्रावरील ‘टी-१०’ राष्ट्रीय गल्ली क्रिकेट स्पर्धेत ‘नाशिक गल्ली नंबर फोर’ संघ विजेता ठरला. संपूर्ण दिवसातील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल मनोज परदेशीला २५ हजार रूपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
येथील अनंत कान्हेरे मैदानात आज या स्पर्धेतील सामने झाले. उद्घाटन सोहळ्यास समालोचक चारू शर्मा, मॉडेल सुशील झिग्रा हे उपस्थित होते. नाशिक गल्ली वन संघाचे नेतृत्व आशिष टिबरीवाला, गल्ली टू चे सूरज पाटील, गल्ली थ्रीचे मोहित कपूर तर गल्ली फोरचे नेतृत्व मनोज परदेशी यांनी केले. या चारही संघांची निवड स्पर्धेतील केंद्राचे ‘गुरू’ माजी रणजीपटू शेखर गवळी यांनी केली. आतापर्यंत कानपूर, लखनौ, जालंधर, लुधियाना, सूरत या केंद्रांवर सामने झाले असून ठाणे येथे सात फेब्रुवारी तर १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पुणे तसेच अंतिम सामना मुंबई किंवा सूरत येथे होणार आहे. परदेशीच्या नेतृत्वाखालील गल्ली फोर संघाने पहिल्या सामन्यात पराभूत होऊनही केंद्रावरील विजेता होण्याची किमया केली. पहिल्या दोन सामन्यांमधील पराभूत संघांमधील सामन्यात ‘बॅट आउट’ या नियमाचा फायदा उठवित परदेशीने आपल्या संघाला विजयी करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात मोहित कपूरच्या नेतृत्वाखालील गल्ली थ्री संघाने १० षटकात सात बाद ७४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल गल्ली फोरने पाच गडय़ांच्या मोबदल्यात ही धावसंख्या पार केली. स्पर्धेतील उत्कृष्ठ खेळाडू म्हणून महापौर विनायक पांडे यांच्या हस्ते परदेशीला पारितोषिक देण्यात आले. यावेळी रिझनेबल कम्युनिकेशनचे संचालक अनुप व अशोक वाधवा, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, विनोदवीर सुनील पाल आदी उपस्थित होते. सामन्यांदरम्यान गायिका नेहा कक्करचे गाणे, चिअरगर्ल्स, नाशिकचा ढोल ताशा, सुनील पालचे चुटकुले, डिजेचा दणदणाट असा सर्वच मालमसाला पाहावयास मिळाला.