Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

नाशिकरोड येथे दरोडेखोरांकडून लूट
वार्ताहर / नाशिकरोड

देवळाली गाव परिसरात बुधवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत अनेकांना मारहाण केली

 

आणि हजारो रूपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी केली जात आहे. देवळाली गाव शिवारातील सुभाष सहाणे यांच्या द्राक्षाच्या मळ्यात रात्री चार दरोडेखोरांनी प्रवेश केला. येथील रखवालदार काशिनाथ पांडुरंग मगर याला मारहाण केली. त्याच्या पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करून दरोडेखोरांनी पळ काढला. पळून जाताना दरोडेखोरांनी आसपासच्या इतर नागरिकांना मारहाण केली. सुमारे दोन तास त्यांच्या धूमाकुळ सुरू होता. या घटनेची माहिती समजल्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण, त्यांच्या हाती कुणीही लागू शकले नाही. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या काशिनाथला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा प्रकार सुरू असताना देवळाली कॅम्प परिसरातील काही जागरूक नागरिकांनी बॅटरी चोरून नेणाऱ्या चोरटय़ाला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दिलीप बडगुजर असे त्याचे नाव आहे. नाशिकरोड व देवळाली परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीचे सत्र वाढले आहे. आंबेडकर नगर भागातून चोरटय़ांनी रणजीत जाधव यांची तवेरा गाडी चोरून नेली तर नाशिकरोडला महिलेची बॅग चोरून पावणे दोन लाख रूपयांचा ऐवज लंपास केला. बिटको चौकात औषधे घेण्यासाठी आलेल्या संजय पगारे यांच्या गाडीचा दरवाजा उघडून ५० हजाराची रोकड व महत्वाची कागदपत्रे चोरटय़ांनी पळवून नेली. चोरीच्या या वेगवेगळ्या घटनांबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.