Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

वडाळीभोईजवळ भुयारी पादचारी मार्ग करण्याची जनता दरबारात मागणी
चांदवड / वार्ताहर

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या काही टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामामुळे वडाळीभोई व

 

परिसरातील नागरीक व शालेय विद्यार्थ्यांना दररोज विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने धोंडबा रस्त्यावर भुयारी पादचारी मार्ग काढण्याची एकमुखी मागणी ग्रामस्थांनी खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्यातर्फे येथे आयोजित जनता दरबारात केली. या प्रश्नी सर्वतोपरी प्रयत्न करून तोडगा काढू असे आश्वासन खा. चव्हाण यांनी दिले.
महामार्ग विस्तारामुळे वाहतुकीची समस्या मार्गी लागणार असली तरी त्यामुळे वडाळीभोई गावाचे प्रचंड नुकसान झाले असल्याची तक्रार यावेळी ग्रामस्थांची केली. ओव्हरब्रीज व सव्‍‌र्हीस रस्त्यामुळे तरूणांवर बेरोजगारीची कु ऱ्हाड कोसळली आहे. सव्‍‌र्हीस रोड अनेक ठिकाणी एकसमान नसल्याने दुचाकी व चारचाकीचे किरकोळ अपघात नित्याचे झाले आहे. या रस्त्याच्या बाजूने गटार नसल्याने सांडपाणी साचून राहते व त्याच्या दुष्परिणाम स्थानिकांच्या आरोग्यावर होत आहे. ८०० मीटरच्या सव्‍‌र्हीस रस्त्यावर पथदीव्यांची सुविधा नाही. बसथांब्याची व्यवस्था नाही. वडाळीभोई ते आडगाव टप्प्या दरम्यान महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना तात्काळ मदतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रही जवळ आहे, पण महामार्गावर येणाऱ्या बाहेरच्या जखमींना किंवा मदत करणाऱ्या नागरिकांना आरोग्य केंद्रात जाण्यास जवळचा मार्ग उपलब्ध नाही. सर्वाना वडनेर फाटय़ावर जाऊन परत मागे यावे लागते. त्यासाठी भुत्याणे फाटय़ावर ‘यु टर्न’ची सुविधा करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. शेकडो विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी हा महामार्ग पार करताना तारेवरची कसरत करावी लागते. ग्रामस्थांचीही तशीच अवस्था होते. या बाबी लक्षात घेऊन किमान पादचारी मार्ग बनवावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. प्रकल्प व्यवस्थापक व संबंधित कंपनीशी चर्चा करून यातून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन चव्हाण यांनी दिले.