Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

नाशिक जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालक नियुक्तीला स्थगिती
नाशिक / प्रतिनिधी

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आयत्या वेळच्या विषयामध्ये दोन स्वीकृत संचालक

 

घेण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. माजी खासदार आणि संचालक अ‍ॅड. उत्तम ढिकले, अ‍ॅड. अनिल आहेर व अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी ही याचिका दाखल केली होती.
दोन स्वीकृत संचालक म्हणून प्रसाद हिरे व गंगाधर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, महाराष्ट्र सहकारी संस्था अधीनियम १९६० चे कलम १८ व २० मधील दुरूस्तीप्रमाणे या दोन स्वीकृत संचालकांची नियुक्ती जिल्हा बँकेने भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे निकष डावलून केल्याची तक्रार याचिकाकर्त्यांनी केली. या प्रकाराची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत बँकेच्या वकिलांना या कामात एवढी घाई करण्याची गरज काय, असा सवाल केल्याची माहिती अ‍ॅड. ढिकले यांनी दिली आहे. तसेच प्रसाद हिरे तज्ज्ञ संचालक म्हणून कोणत्या गटात मोडतात अशीही विचारणा केली. याचिकेतील सर्व मुद्यांवर उहापोह होणे आवश्यक असल्याने संबंधितांना उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
स्वीकृत संचालक नेमण्याच्या बँकेच्या बेकायदेशीर पद्धतीस याचिकेचा अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतीही कार्यवाही बँकेने अथवा विभागीय सहनिबंधकांनी करू नये असे निर्देश देण्यात आले आहे.
बँकेचे विद्यमान अध्यक्ष व काही संचालकांचा उभयतांना नेमण्याच्या प्रक्रियेला धक्का बसला आहे. या स्वीकृत संचालकांच्या नियुक्तीस यापूर्वी अर्जदारांसमवेत बँकेचे संचालक प्रशांत हिरे, राजेंद्र डोखळे, वैशाली कदम, नानासाहेब सोनवणे, वसंत गिते, अद्वय हिरे आदींनी हरकत घेतंली होती.
अ‍ॅड. ढिकले यांच्यावतीने अ‍ॅड. वि. ए. थोरात व अ‍ॅड. अनिलकुमार पाटील यांनी युक्तीवाद केला. या याचिकेच्या सुनावणीस प्रसाद हिरे हे देखील वकिलासह उपस्थित होते.