Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

आरोग्य विद्यापीठ अधिकारी-कर्मचारी पतसंस्थेचे उद्घाटन
नाशिक / प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या

 

अधिकारी-कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृदुला फडके, कुलसचिव डॉ. सुनिल फुगारे, सहकारी संस्थेचे उपनिबंधक राजेंद्रकुमार दराडे, पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष संदीप राठोड, सचिव राजेंद्र शहाणे व संचालक मंडळ, पतसंस्थेचे सल्लागार, सभासद आणि अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सहकार क्षेत्राच्या उद्धाराकरीता ठेवीदार व पतसंस्था या दोघांची भूमिका महत्वाची आहे. पतसंस्था यशस्वी करण्यासाठी, पारदर्शी कारभार, प्रामाणिकपणा, आर्थिक चातुर्य व सभासदांचा विश्वास या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकरिता सुरू केलेली ही संस्था कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पुढे नेण्याकरिता प्रयत्न केले गेले पाहिजेत. आज सहकार क्षेत्रात नैराश्य आले असले तरी आपल्यासारख्या छोटय़ा संस्था सहकार क्षेत्रात नवीन संचार करून आपल्या नावाचा ठसा उमटवू शकतील असे डॉ. बच्छाव यांनी सांगितले.
नाशिकचे सहकारी उपनिबंधक व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दराडे म्हणाले की, सहकार क्षेत्र आज कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. प्रत्येक क्षेत्र हे सहकाराशिवाय उद्धार करू शकत नाही. सहकार क्षेत्रामुळे समाजातील सर्वच घटकांचा उद्धार होण्यास मदत होते. आज सहकारातून समृद्धीकडे जाण्याकरीता सर्वाचा सम सहभाग असणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. प्रास्तविकात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी संस्था स्थापन करण्याचा उद्देश, संस्था सुरू करण्याचा प्रवास व संस्थेसमोरील उद्दीष्टय़े आदी माहिती स्पष्ट केली. याप्रसंगी संस्थेचे सचिव राजेंद्र शहाणे यांनी पतसंस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. प्रथम ठेवीदार व प्रथम खातेदार तसेच पतसंस्थेच्या स्थापनेकरीता अथक प्रयत्न केलेले गुणवंत सदस्यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचलन पतसंस्थेचे उपाध्यक्ष संदीप राठोड यांनी केले. आभार सहसचिव युवराज भारंबे यांनी मानले.