Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

राज्य सरकारने कर्जाचा हिशेब द्यावा - कदम
मनमाड, ५ फेब्रुवारी / वार्ताहर

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने राज्याला कर्जबाजारी केले. या सरकारने घेतलेल्या कर्जाचा

 

हिशेब द्यावा, हिंमत असेल तर कर्जाची श्वेतपत्रिका काढावी, असे आवाहन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी निमगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले. काँग्रेस प्रणित सरकारने हे कर्ज वाटून खाल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला.
जनता दलाचे प्राबल्य असलेल्या निमगाव येथे शिवसेना मध्यवर्ती शाखेचे उद्घाटन, तालुक्यातील अनेक काँग्रेस-राष्ट्रवादी, मनसे कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश सोहळा व ज्वार्डी येथे आ. संजय पवार यांच्या विकास निधीतून सुकी नदीवर बांधण्यात येणाऱ्या ६० लाख रुपये खर्चाच्या पुलाचे भूमिपूजन आदी कार्यक्रम कदम यांच्या हस्ते झाले. त्यांच्या दौऱ्याचा समारोप निमगाव येथील शेतकरी मेळाव्याने झाला. आ. पवार यांनी प्रास्तविकात सर्व मान्यवरांचे स्वागत करून मतदार संघातील विकास कामांचा आढावा घेतला. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर हा मतदार संघ काँग्रेस आमदारांनी ‘कोमात’ टाकला होता. मात्र जनतेचा कौल घेऊन आपण या मतदार संघाचा कायापालट केल्याचा दावाही पवार यांनी केला. त्यानंर आपल्या भाषणात कदम यांनी मुंबई बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ले, राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, जातीय दंगली, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी मुद्यांना स्पर्श केला. नारायण राणेंची सध्याची अवस्था ‘ना घाटका..’ अशी असल्याची टीका त्यांनी केली. निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्यामुळे अनेक पक्षांचे तुमच्या गावात येतील पण तुमच्यासाठी लढणारा, आवाज उठविणारा, विकास कामे करणारा प्रतिनिधी म्हणून संजय पवार यांच्या मागे उभे रहावे असे आवाहनही कदम यांनी केले.
यावेळी धुळे लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख अल्ताफ खान, सह संपर्कप्रमुख सुनील बागूल, जयंत दिंडे, जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, कारभारी आहेर, संतोष गुप्ता, अनिल कदम, राजेंद्र देशमुख, राजाभाऊ छाजेड, राजेंद्र पवार, व्यंकटराव आहेर, साईनाथ गिडगे, नाना शिंदे, माधव शेलार आदी उपस्थित होते.