Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

शेवगेडांग गायरान जमीन परस्पर विक्री केल्याचा आरोप
नाशिक / प्रतिनिधी

इगतपुरीच्या शेवगेडांग येथील २३.७५ हेक्टर गायरानाची जमीन एका सामाजिक संस्थेला देण्याच्या

 

प्रक्रियेत फसवणूक झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून त्यामुळे या जागेसाठी संबंधित संस्थेला कोणतीही परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शेवगेडांग हद्दीमध्ये गट क्रमांक ११५ मधील २३.७५ हेक्टर ही गायरान म्हणून असलेली जमीन ग्रामस्थांनी अतुल बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला गावाच्या विकासासाठी भाडेपट्टा तत्वावर देण्याचे ठरविले होते. परंतु, ही संस्था नोंदणीकृत नव्हती व पुढे नोंदणी करण्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी गेला. दरम्यानच्या काळात ग्रामसेवकांनी सरपंच व काही ग्रामस्थांच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेऊन ही गायरान जमीन कल्याणी चॅरीटेबल ट्रस्ट या मुंबईच्या संस्थेला परस्पर विक्री केली, अशी तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. या जमिनीचा परवाना काढण्यासाठी कल्याणी चॅरीटेबल ट्रस्ट या संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला आहे. या संस्थेने गावासमोर कुठलाही प्रकारचा विषय न घेता ग्रामसेवक व एक ग्रामपंचायत सदस्य व आदिवासी सहकारी संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याने गावाची फसवणूक केली आहे. त्यामुळे या संस्थेला गायरान जमीन न देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून जिल्हाधिकाऱ्यांनी या संस्थेला कुठल्याही प्रकारची परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.