Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या दर्जावाढ कार्यक्रमाचा आढावा
नाशिक / प्रतिनिधी

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा दर्जा उंचावण्यासाठी उद्योजकांच्या सहकार्याने प्रत्येक संस्थेत

 

व्यवस्थापन समिती स्थापन करून त्यात उद्योजकांना स्थान दिले जाणार आहे. या अनुषंगाने नाशिक विभागातील २३ संस्थांच्या प्रगतीचा आढावा उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे सचिव सीमा ढमढेरे यांनी घेतला. या समितीस संस्थेचा विकास आराखडा तयार करणे, स्थानिक रोजगाराची मागणी लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, प्रवेश क्षमतेत वाढ, अल्प मुदतीचे अभ्यासक्रम व त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढविणे व प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात व स्वयंरोजगारात सहकार्य करणे ही प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे. याकरिता प्रत्येक संस्थेने एका व्यवसाय गटाची परिसरातील उद्योग समुहानुसार निवड करून त्या व्यवसाय गटाला सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रूपांतरित करावयाचे आहे. ज्या ठिकाणी उद्योग समूह अस्तीत्वात नसतील त्या ठिकाणी अधिकची मागणी असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी अत्याधुनिक प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करावयाची आहे. देशात एकूण १८९६ शासकीय औद्योगिक संस्था असून त्यापैकी १०० संस्थांना डोमेस्टिक फंडातून प्रत्येकी १.६० कोटीप्रमाणे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. ४०० संस्थांना जागतिक बँकेच्या सहाय्याने सेंटर ऑफ एक्सलन्सकरिता साडे तीन कोटी, दर्जा वाढीसाठी दोन कोटी तर उर्वरित १३९६ संस्थांना प्रत्येकी अडीच कोटी डोमेस्टिक व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून दिले आहे. राज्यातील ४०७ शासकीय संस्थांपैकी १२ संस्था डोमेस्टिक निधी, ७५ संस्था जागतिक बँक प्रकल्प आणि २६० संस्था डोमेस्टिक व्याजमुक्त कर्जातून विकसित करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.