Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९

धुळे महापालिकेतर्फे दहशतवादाविरूध्द लढण्याची प्रेरणा नागरिकांमध्ये निर्माण व्हावी या हेतूने ‘आम्ही धावतो देशासाठी’ याअंतर्गत धुळे रनचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात दोन हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसह नागरिकांनीही मोठय़ा प्रमाणावर सहभाग घेतला.

मालेगावी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात
मालेगाव, ५ फेब्रुवारी / वार्ताहर

शिवसेनेतर्फे आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा बुधवारी रात्री येथे अभूतपूर्व उत्साहात पार पडला. सोहळ्यात प्रचंड जनसागराच्या साक्षीने एकूण १५३ दांम्पत्ये विवाहबद्ध झाली.
गेल्या महिन्यापासून सेनेतर्फे या विवाह सोहळ्याची लगबग सुरू असल्याने शहर व तालुका परिसरात त्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि आपापल्या धर्म, रितीरिवाज व पारंपरिक पद्धतीनुसार १६ मुस्लीम, ११ दलित, ११६ आदिवासी व इतर असे एकूण १५३ जण विवाह बंधनात बांधले गेले. बुधवारी सायंकाळी पाच वाजता शिवाजी पुतळ्यापासून वरातीला प्रारंभ झाला. सजवलेल्या पाच वाहनांमधून निघालेल्या नवरदेवांच्या या मिरवणुकीच्या अग्रभागी उंट, घोडे तैनात करण्यात आले होते. याशिवाय लेझीम पथक, आदिवासी नृत्य, संबळ, डीजे, वाघ्यामुरळी आदी विविध प्रकारातील वाद्यांच्या तालावर नाचणाऱ्या अबालवृद्धांसह महिलांचाही उत्साह ओसंडून वाहत असल्याचे दृष्य वरातीत दिसत होते. हा उत्साह शीगेला पोहचल्यावर सोहळ्याचे आयोजक आ. दादा भुसे यांनाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही. वाद्याच्या तलाव काही काळ मग त्यांनीही फेर धरला. तब्बल तीन तास मोठय़ा उत्साहात ही मिरवणुक सुरू होती. रात्री ८.३० च्या सुमारास विवाहबद्ध होणाऱ्या सर्व जोडप्यांचे विवाहस्थळी आगमन झाले. विरोधी पक्षनेते रामदास कदम, सेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुनिल बागुल, जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, ग्रामीण जिल्हा प्रमुख अल्ताफ खान, आ. संजय पवार आदी नवदांम्पत्यांना शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.

घरपट्टी वसुलीवरून जळगाव पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
वार्ताहर / जळगाव

महापालिका कर्मचाऱ्यांकडे थकित व बाकी असलेल्या घरपट्टी कराच्या वसुलीसाठी महापालिकेने विद्यमान आयुक्तांच्या कार्यकाळात प्रथमच पगाराला उशीर केला आहे. पाच फेब्रुवारीपर्यंत पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असली तरी येथे सक्षम व सशक्त अशी कामगार संघटना नसल्याने त्याबाबत आवाज उठविला जात नसल्याचे सांगण्यात येते. महापालिका आयुक्तपदी रामनाथ सोनवणे रुजू झाल्यापासून गेले वर्षभर कर्मचाऱ्यांच्या हातात बरोबर पहिल्या तारखेलाच वेतन पडत होते. गेली २० वर्षे कर्मचारी वेळेवर वेतन मिळण्यापासून वंचितच होते. साधारण पंधरा दिवस ते महिन्याच्या विलंबानंतर त्यांच्या हातात वेतनाची रक्कम पडत असे.

पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेतर्फे धुळे येथे सत्याग्रह
वार्ताहर / धुळे

पाचव्या वेतन आयोगातील प्रलंबित वेतन त्रुटी दूर कराव्यात, पशुपालन व कुक्कुटपालन व्यवसायाला औद्योगिक दर्जा द्यावा यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेतर्फे गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किरकोळ रजा धारणा सत्याग्रह करण्यात आला. या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की, राज्यातील पदवीधारक पशु चिकीत्सा व्यावसायिकांच्या व्यावसायिक, शिक्षण, प्रशिक्षण आणि सेवा विषयक प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटनेच्या पदाधिकारी शिष्टमंडळाने आजवर मुख्यमंत्री, पशु संवर्धन मंत्री, सचिव आणि आयुक्तस्तरावरील अधिकाऱ्यांशीही अनेक वेळा चर्चा झाली आणि त्यांच्याकडून विधायक प्रतिसादही लाभला, तथापि, आयुक्तालयातील उच्च पदस्थ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संकुचित आणि आकसाच्या धोरणातून संबंधित मागण्यांचे प्रस्ताव हेतू पुरस्सर प्रलंबित आहेत.

जळगाव पालिका : महानगर आघाडीचा करवाढीविरोधात पवित्रा
वार्ताहर / जळगाव

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी गेल्या २५ वर्षांपासून जनतेला नागरी सुविधा देण्याची विश्वासार्हता गमावली असून आता सत्ताधाऱ्यांनी वचननामा जाहीर करावा. नव्या आर्थिक वर्षांत जनतेवर करवाढीचा नांगर फिरविण्याचा प्रयत्न करू नये असे सांगताना महानगर विकास आघाडी करवाढीला शासन स्तरावरून त्याच प्रमाणे न्यायलयात सुद्धा आव्हान देईल असा इशारा आघाडीच्या नेतृत्वाने दिला आहे.
महापालिकेतील महानगर विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी या संदर्भात पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

पालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे
भुसावळ / वार्ताहर

येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर गेल्या नऊ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या भुसावळ नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची सांगता प्रांताधिकारी धनंजय निकम यांच्या मध्यस्थीने झाली. उपदानाची रक्कम, रजा रोखीकरण, अंशराशीकरण व पाचव्या वेतनापोटी ११ हजार रुपये अग्रीम त्वरीत देण्यात यावे यांसह इतर मागण्यांसाठी पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. यु. के. भावे, सुरेश पाटील, भाऊ धावडे, आर. एन. अग्रवाल, पी. जे.पाटील, डॉ. एस. एन. महाजन, सुरेशचंद्र ताथडे आदींनी साखळी उपोषण सुरु केले होते. प्रांताधिकारी निकम यांनी पुढाकार घेत सेवानिवृत्त कर्मचारी व नगरपालिका व्यवस्थापन यांच्यात चर्चा घडवून आणली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपरोक्त मागण्या मान्य झाल्यानंतर तहसीलदारांनी लिंबू सरबत दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

कांग प्रकल्पास वनविभागाची मान्यता
वार्ताहर / जामनेर

तालुक्यातील कांग प्रकल्पास केंद्रीय वन व पर्यावरण विभागाने मान्यता दिली असून येत्या पंधरवडय़ात प्रकल्पाच्या कामास सुरूवात होणार असल्याची माहिती आ. गिरीश महाजन यांनी येथे दिली. तालुक्यातील मुख्य प्रवाही कांग नदीवरील मध्यम प्रकल्पास भाजप-शिवसेना युती शासन काळात तत्कालीन पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांनी मंजुरी दिली होती. सुमारे १५० हेक्टर वन जमीन प्रकल्पाखाली जाणार असल्याने याबाबत वन व पर्यावरण विभागाकडून मान्यता मिळणे आवश्यक होते. वनविभागाचे वरिष्ठ निरीक्षक बी. के. सिंह यांनी ३० जानेवारी २००९ च्या पत्रान्वये या प्रकल्पास वन विभागाची मान्यता देण्यात येत असल्याचे पत्र दिले.