Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
विशेष
(सविस्तर वृत्त)

रविवर्माच्या नायिका अन् हुसेनांची गाडी!

 

परवाच्या ३० जानेवारीला मिशन 'व्हील टू हिल'च्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही काही मित्रमंडळी राष्ट्रपती भवनात दंग असताना, तिकडे डीएलएफ एम्पोरियात एक वेगळाच ‘पेज थ्री’ सोहळा सुरू होता.. हा सोहळा होता एका कॅलेंडरच्या प्रकाशनाचा.. फॅशन, मॉडेलिंग, फोटोग्राफी क्षेत्रातली दिग्गज मंडळी त्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होतीच; पण त्यातही लक्षवेधक ठरत होत्या, त्या 'त्या' १२ जणी..
त्या दिवशीची त्यांची तिथली उपस्थिती पेज थ्री कल्चरची नव्हती, उलट एखाद्या कॉलेजने आपल्या माजी विद्यार्थिनींसाठी ‘साडी डे’ योजला असावा, त्यातही तो ‘ट्रॅडिशनल’ डे असावा, अशा प्रकारचा आभास उत्पन्न करणारी होती..
या ‘ट्रॅडिशनल डे’ची साडी नेसून आलेल्या पेज थ्री मॉडेल्सच्या रंगीत-संगीत सोहळ्याचं आयोजन केलं होतं रोहित चावलानं.. रोहित हा एक नामांकित छायाचित्रकार.. टेलिव्हिजन कमर्शियल हा त्याचा खरा व्यवसाय.. पण या व्यवसायातून वेळ काढून रोहित प्रतिवर्षी काहीतरी वेगळं, काहीतरी हटके आयोजित करतोच..
गेल्या वर्षी त्यानं राबडी जमातीच्या स्त्रियांवरचं एक फोटो एक्झिबिशन दिल्लीतच आयोजित केलं होतं.. त्यातली निवडक चित्र त्यानं नंतर एका कॅलेंडरसाठीही वापरली होती.. कॅलेंडर आकर्षक करायचं असेल, गर्भश्रीमंती दिवाणखान्यांमध्ये लावायचं असेल तर त्यासाठी ‘पिन-अप गर्ल्स’ वापरल्या पाहिजेत, असं रोहितला अजिबात वाटत नाही..
आणि त्यामुळेच रोहितनं यंदाच्या कॅलेंडरसाठी त्या १२ जणींची निवड केली होती.. नंदना सेनची भूमिका असलेला केतन मेहतांचा रंगरसिया सध्या पेज-थ्री वर्तुळात जोरदार चर्चेत आहे.. रंगरसियानं अजून पडदा पाहिला नसला तरी त्याचे रशेस, त्याचे प्रोमोज आणि त्यातली नंदनाची छायाचित्रं ज्यांनी पाहिली आहेत, त्यांना रोहितनं ‘रंगरसिया’शी नातं जोडणाऱ्या विषयाची निवड का केली असावी हे सहज कळू शकेल..
‘रंगरसिया’ हा राजा रविवर्माच्या चित्रकन्येला मध्यवर्ती भूमिकेत धरून केला जात असलेला चित्रपट.. राजा रवि वर्माची सारी गाजलेली पोट्रेटस् भारतीय स्त्रीविषयीची.. पारंपरिक वेष, चेहऱ्यावरची थेट भारतीय ठेवण, अंग लपेटून घेतलेली साडी आणि देवत्व असूनही देवीसदृश न वाटणारी भोवतालाची मांडणी हे रविवर्माचं वेगळेपण..
त्यामुळेच देवी सरस्वती, नल-दमयंती, शंतनु-मत्स्यगंधा, राधा-माधव, कंस-माया, श्रीकृष्ण-देवकी, अर्जुन-सुभद्रा अशी अनेक व्यक्तिचित्रं रंगवूनही त्या चित्रांना देव्हाऱ्याचं पावित्र्य येऊ न देण्याची वैशिष्टय़ता रवि वम्र्यानी जोपासली.. १८४८ ते १९०६ हा राजा रवि वम्र्याचा कालावधी.. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांच्या चित्रानं सारं पाश्चात्य आणि पौर्वात्य चित्रजगत घुसळून काढलं.. भारतीय परंपरेतील स्त्री आणि तिच्या भवतालाला खास युरोपियन वास्तववादाचा स्पर्श हे रवि वम्र्याच्या चित्राचं वेगळेपण होतं.. १८७३ चं व्हिएन्ना एक्झिबिशन केवळ रवि वम्र्यानीच गाजवलं होतं..
रोहितनं रविवर्मा यांच्या १२ नाटिका यंदाच्या एका कॅलेंडरसाठी निवडल्या होत्या.. त्यासाठी त्यानं अनुष्का शंकर, कल्याणी चावला, आयेशा थापर, सलोनी पुरी, फिरोझ गुजराल, पुनीत जुनेजा, विनिता रॉले, स्मृती, प्रीती दत्त, रश्मी घोष, अदिती राव आणि शैलजा ताहिलियानी या मॉडेल्सना रवि वम्र्याच्या मॉडेल्सच्याच वेषात, त्याच लुकमध्ये पेश केलं होतं.. तेच वातावरण, तोच आभास, तसंच वस्त्रांकन, तशीच त्यावेळची चित्राची पाश्र्वभूमी स्टुडिओमध्ये खास उभी करण्यात आली होती.. गंमत म्हणजे यातल्या कुणालाच आपल्याला या वेषात मॉडेलिंगसाठी का बोलावलं याची कल्पना नव्हती..
परवाच्या सोहळ्यात कॅलेंडरचं अनावरण झालं, तेव्हा हे रहस्य उघड झालं.. रोहित आता या आठवडय़ात आणखी एक कॅलेंडर थीम घेऊन सामोरा येतो आहे.. ही थीम आहे ‘सिगार लेडी’ची.. क्युबातल्या हेबॅनॉस या सिगार ब्रँडसाठी रोहित हे कॅलेंडर करतो आहे..
* * *
‘रोहितची ही ‘रविवर्माच्या’ चित्रांवर आधारलेल्या कॅलेंडरची माहिती दिल्लीतील पत्रकार मित्रांकडून घेत असतानाच, दुसरी एक बातमी कानावर आली ती आजच्या काळातल्या एका विश्वविख्यात भारतीय चित्रकाराविषयीची, एम. एफ. हुसेन यांच्याविषयीची.. ९३ वर्षांचे हुसेन सध्या दुबईत असतात, एकटेच राहतात.. पण एकटे असले तरी ते एकाकी नाहीत.. 'मॅन व्हर्सेस मशीन' नावाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी सध्या हाती घेतला आहे..
हुसेन यांना मोटारींचा विलक्षण शौक आहे.. अर्थातच तो त्यांच्या लहानपणापासूनचाच आहे.. त्यावेळेस त्यांना आवड होती ती जग्वारची.. पण आता त्यांच्या व्यक्तिगत संग्रहात फॅंटम आहे, रोल्स रॉईस आहे, फेरारी आहे, बेंटले आहे, जग्वार आहे आणि नव्याने दाखल झालेली ब्युगाटी व्हेरॉन २००८ देखील आहे.. ब्युगाटी ही इटालीची स्पोर्टस कार.. तिची अमेरिकेतील एक्स शोरुम किंमतच मुळी आहे, १५ लक्ष डॉलर्स.. भारतीय रुपयात बोलायचं तर ७ कोटी ३५ लाख.. साडेसात कोटी ही रक्कम हुसेन यांना तशी फार नव्हे.. त्यांचं बॅटल ऑफ गंगा अ‍ॅण्ड जमुना : महाभारत १२ हे अलीकडचं चित्रच मुळी विकलं गेलं होतं ते ७ कोटी ८४ लाखांना.. म्हणजे ब्युगाटी पडली होती ती केवळ त्याच्याहीपेक्षा कमी रकमेला..
ब्युगाटी सर्वप्रथम बनवली ती एटोर ब्युगाटी नामक इटालियन कारनिर्मात्यानं.. ते वर्ष होतं १९०९.. म्हणजे २००९ हे ब्युगाटीचं शताब्दी वर्ष मानायला हवं.. या शताब्दी वर्षांतच ब्युगाटीच्या निमित्तानं हुसेन एक स्थायी कारशिल्प दुबईत उभं करताहेत, हा एक विलक्षण योगायोग आहे.. ब्युगाटी पॉप्युलर आहे ती तरूण पिढीमध्ये.. १००१ अश्वशक्तीची ही गाडी ४०५ किलोमीटर वेगाने सहजी पळते..
ब्युगाटी पदरी असणारे केवळ तीनच महाभाग दुबईत आहेत.. हुसेन आता त्यातले एक झाले आहेत.. हुसेन यांना ही मोटार भरधाव पळविण्याची
हौस अजिबात नाही.. त्यांना ती हवी आहे, केवळ 'मॅन व्हर्सेस मशीन' प्रदर्शनात मांडून ठेवण्यासाठी.. ब्युगाटीकडे हुसेन पाहतात ते एक उत्कृष्ट कारशिल्प म्हणून.. या प्रदर्शनात केवळ मोटारीच नसतील, त्यात त्यांची घोडय़ांविषयीची ४० पेंटिंग्ज असतील, आणि लिओनार्दो दा विंचीच्या फ्लाईंग मशीनला अर्पण केलेली एक शिल्पस्वरुप स्मृतीही असेल.. या प्रकल्पाला चांगला पुरस्कर्ता मिळावा असा हुसेन यांचा प्रयत्न आहे..
महिन्या दीड महिन्यापूर्वी हुसेन यांनी ही मोटार खरेदी केली.. ती नुसतीच प्रदर्शनात मांडून ठेवण्याचा त्यांचा विचार नाही.. यंत्रांना जसा आवाज असला पाहिजे, तसेच त्या मोटारींनाही पाश्र्वसंगीत असले पाहिजे असे वाटत असल्याने ती जबाबदारी ए. आर. रहमान यांचेवर सोपविण्याची त्यांची कल्पना आहे.. हुसेन यांच्या 'गजगामिनी'ला आणि 'मीनाक्षी : ए टेल ऑफ थ्री सिटीज'ला रहमान यांनीच संगीत दिलं होतं..
हुसेन यांनी ब्युगाटीचा नंबर तर आपल्या पसंतीचा 'एफ ट्वेंटीट्वेंटी' निवडलेला आहेच, पण ब्युगाटीचा रंगही त्यांनी तसाच काळापांढरा निवडलेला आहे.. तसे पाहिल्यास ही कार विशीतल्या पिढीची, पण हुसेन यांनी ही वयाची बंधनं विचारानं, कलाकृतींच्या सादरीकरणानं केव्हाच झुगारून दिलेली होती, आता ती त्यांच्या शौकानंही झुगारली आहेत..
sumajo51@gmail.com