Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९

विशेष

रविवर्माच्या नायिका अन् हुसेनांची गाडी!
परवाच्या ३० जानेवारीला मिशन 'व्हील टू हिल'च्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही काही मित्रमंडळी राष्ट्रपती भवनात दंग असताना, तिकडे डीएलएफ एम्पोरियात एक वेगळाच ‘पेज थ्री’ सोहळा सुरू होता.. हा सोहळा होता एका कॅलेंडरच्या प्रकाशनाचा.. फॅशन, मॉडेलिंग, फोटोग्राफी क्षेत्रातली दिग्गज मंडळी त्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होतीच; पण त्यातही लक्षवेधक ठरत होत्या, त्या 'त्या' १२ जणी.. त्या दिवशीची त्यांची तिथली उपस्थिती पेज थ्री कल्चरची नव्हती, उलट एखाद्या कॉलेजने आपल्या माजी विद्यार्थिनींसाठी ‘साडी डे’ योजला असावा, त्यातही तो ‘ट्रॅडिशनल’ डे असावा, अशा प्रकारचा आभास उत्पन्न करणारी होती.. या ‘ट्रॅडिशनल डे’ची साडी नेसून आलेल्या पेज थ्री मॉडेल्सच्या रंगीत-संगीत सोहळ्याचं आयोजन केलं होतं रोहित चावलानं.. रोहित हा एक नामांकित छायाचित्रकार.. टेलिव्हिजन कमर्शियल हा त्याचा खरा व्यवसाय.. पण या व्यवसायातून वेळ काढून रोहित प्रतिवर्षी काहीतरी वेगळं, काहीतरी हटके आयोजित करतोच..

पाण्यासाठी आतापासूनच पायपीट
यंदाचा उन्हाळा साऱ्या विदर्भाला पाण्यासाठी पायपीट करायला लावणारा असेल, हे आत्ताच दिसू लागले आहे. विदर्भातील जलसाठय़ांमध्ये झालेली मोठी घट, हा सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. मोठय़ा आणि मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीच नाही, छोटे जलस्त्रोतही आटलेले आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागली असताना आतापासूनच विदर्भातील शेकडो गावांमध्ये पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण सुरू आहे. नागपूर, अकोला यासारख्या मोठय़ा शहरांमध्येही जलसंकटाची दाहकता जाणवू लागली आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे प्रकल्पांमध्ये जलसंचय होऊ शकला नाही. विहिरींमधील पाण्याची पातळी झपाटय़ाने कमी झाली पण, त्यासाठी प्रशासनाने गांभीर्य ओळखून उपाययोजना केल्याचे चित्र दिसलेले नाही. पाणीटंचाईचे आराखडे तयार करणे आणि मागचीच री ओढून प्रस्ताव सादर करणे यापलीकडे फारसे काम झालेले नाही. नियोजन व सुसूत्रतेचा अभाव यामुळे पाणीटंचाईचा विषय आगामी काळात उग्र रूप धारण करेल, यात कुठलीही शंका उरलेली नाही.

संकेत भावनांचा..
मानवी संस्कृतीच्या इतिहासात भाषा हा माणसाने लावलेला पहिला सर्जनशील शोध आहे. जेव्हा भाषा नव्हती तेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी आदिमानव चेहऱ्यावरील हावभाव, हातवारे, विविध आवाज काढणे वा चितारणे यांचा वापर करीत होता. आज जगाच्या पाठीवर भाषांचा विकास आणि विस्तार झाला असला तरी भावनिक व वैचारिक देवाणघेवाणीसाठीच्या ‘संकेतमाध्यमा’ची नाळ तुटलेली नाही. आज जगात जितक्या बोली व लेखी भाषा आहेत त्यांच्याच जोडीने ‘साइन लँग्वेजेस’ अर्थात संकेतभाषाही नांदत आहेत!
मूकबधीर व्यक्ति, त्यांचे आप्त व मित्रपरिवार यांच्यासाठी प्रथम अशा प्रकारच्या भाषामाध्यमाची गरज भासत होती. अर्थात जेव्हा ही संकेतभाषा अवतरली नव्हती वा प्रमाणित झाली नव्हती तेव्हाही हातवारे, हावभाव या माध्यमांतून मूकबधीर व्यक्तींशी ‘संवाद’ होतच असला पाहिजे. पण अशा भाषेची निकड प्रथम पुरविली गेली ती स्पेनमध्ये. १६२० साली जुआन पाब्लो बोनेट यांनी मूकबधीरांसाठीच्या संकेतभाषेचे पहिले पुस्तक लिहिले. १८ व्या शतकात या पुस्तकाचा प्रचार झाला आणि आजवर त्या पुस्तकातील संकेतभाषेचेच प्रामुख्याने जगभर या ना त्या प्रकारे अनुसरण होत आहे. १७५५ मध्ये अ‍ॅबे’डे एपी यांनी पॅरिसमध्ये मूकबधीर मुलांसाठी पहिली शाळा काढली. या शाळेत शिकलेला लॉरेन्ट क्लर्क हा तरुण थॉमस हॉपकिन्स गॉलाडेट या समविचारी मित्रासह अमेरिकेला गेला. तिथे कनेक्टिकट येथे त्यांनी ‘अमेरिकन स्कूल फॉर डीफ’ची स्थापना केली. गॉलाडेटचा मुलगा एडवर्ड मायनर गॉलाडेट यांनी १८५७ मध्ये मूकबधीरांसाठी शाळा काढली आणि १८६४ मध्ये तिचे ‘गॉलाडेट विद्यापीठा’त रुपांतर झाले. वॉशिंग्टन येथील हे मुक्त कलाविद्यापीठ मूकबधीरांसाठीचे जगातील एकमात्र विद्यापीठ आहे. संकेतभाषांचा इतिहासही मनोज्ञ आहे. अनेकानेक ग्रंथांमधून तो मांडला गेला आहे. ही भाषा बोलीभाषेवरच प्रामुख्याने अवलंबून असते, हा मात्र गैरसमज आहे. दक्षिण आफ्रिकेत ११ भाषा आहेत पण संकेतभाषा एकच आहे! ब्रिटन आणि अमेरिकेत इंग्रजी ही एकच भाषा आहे पण त्यांच्या संकेतभाषांमध्ये बराच फरक आहे. या भाषांचेही विविध गटांत वर्गीकरण झाले असून जगभर सत्तरहून अधिक संकतेभाषा नांदत आहेत. उलरिक झिशान यांनी भारत-पाक संकेतभाषेवर संशोधन केले असून त्यावर एक ग्रंथही लिहिला आहे. त्यांच्या मते प्रांतिक भेदानुरूप किंचित फरक सोडला तर भारत, पाकिस्तान आणि नेपाळ या देशांमधील संकेतभाषांतही बरेच साम्य आहे. भारतात १० लाख प्रौढ तर ५० लाख मुले ही भाषा वापरतात. पाकिस्तानात अशी अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरी संकेतभाषेचा तेथील वापरही मोठा आहेच. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तानात लाखो लोक संकेतभाषा वापरत असले आणि सरकारी प्रसारमाध्यमांमध्ये साप्ताहिक वार्तापत्रासाठी या भाषेचाही वापर होत असला तरी अधिकृत भाषेचा दर्जा तिला लाभलेला नाही!
उमेश करंदीकर
umeshkaran9@gmail.com