Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९

‘एसएनडीटी मेकओव्हर’साठी अखेर दीड कोटींचा निधी
शिक्षक-शिक्षकेतर आणि विद्यार्थिनींच्या ‘कॅम्पस बंद’ आंदोलनाचे यश
पुणे, ५ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी
श्री नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या (एसएनडीटी) पुण्यातील ‘कॅम्पस’मधील गैरसोयी दूर करण्यासाठी अखेर युद्धपातळीवर पावले उचलण्यात आली असून सुमारे दीड कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर आणि विद्यार्थिनींनी एकत्रित येऊन गेल्या महिन्यात केलेल्या ‘कॅम्पस बंद’ आंदोलनाचे हे यश मानले जात आहे. आवारातील गैरसोयींबाबत विद्यापीठाच्या मुंबईतील मुख्यालयाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या होत्या.

देशात रक्तसंकलनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर!
अकरा लाख युनिट रक्त संकलन
मुस्तफा आतार
पुणे, ५ फेब्रुवारी

‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ या उक्तीची प्रचिती देत महाराष्ट्रातील रक्तदात्यांनी तब्बल दहा लाख ८० हजार युनिट एवढे रक्त संकलित करून देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. आता या रक्ताचे घटक विलगीकरणासाठी २२ प्रयोगशाळा नव्याने राज्यात उभारण्यात येणार आहे. देशातील रक्तसंकलनाचा २००८ या वर्षांचा आढावा घेण्यात आला. त्यात महाराष्ट्राने आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगरसेवक गुंडागर्दीच्या सर्व निविदा रद्द
पुणे, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

नगरसेवक व सुमारे दीडशे जणांनी गुंडागर्दी व दहशतीने ताब्यात घेतलेली वादग्रस्त निविदा प्रक्रिया अखेर रद्द करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी आज घेतला. या सर्व १३८ कोटींच्या निविदांसह २५ लाखांपुढील सर्वच निविदा यापुढे कंत्राटदारांकडून ‘ऑन लाईन’ भरून घेण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेने रस्त्यांच्या कामांसाठी १३८ कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या होत्या. या निविदा भरण्याच्या शेवटच्या दिवशी; सोमवारी पाच नगरसेवकांनी दीडशे जणांच्या मदतीने ‘टेंडर सेल’मध्ये गुंडगिरी करून इच्छुक कंत्राटदारांना या निविदा भरू दिल्या नाहीत.

‘सुभिक्षा’चे शहरातील मॉल बंद
पुणे, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

मॉल संस्कृतीच्या जयघोषात उत्साहात सुरू करण्यात आलेले शहरातील सुभिक्षा मॉल आज बंद अवस्थेत आहेत. याबाबत अधिक चौकशी करता, जागेचे भाडे आणि कामगारांचे पगार थकल्यामुळे हे मॉल बंद पडले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.आर्थिक मंदीमुळे हे मॉल बंद पडत असल्याचे वर्तवले जात असले तरी सुभिक्षा रिटेल मार्केट उद्योगाच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमुळे मॉल बंद करण्याची स्थिती निर्माण झाली, असे सांगण्यात आले. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सुभिक्षातील कर्मचाऱ्यांचे पगारही थकले आहेत.

पहिले दुर्ग साहित्य संमेलन १४, १५ फेब्रुवारीस राजमाचीवर!
अध्यक्षपदी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
पुणे, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी
‘गडकोटांचा देश’ असलेल्या या महाराष्ट्रभूमीत ‘दुर्ग’ हा विषय घेऊन पहिल्यावहिल्या दुर्ग साहित्य संमेलनाचे येत्या १४, १५ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. या आगळय़ा वेगळय़ा संमेलनासाठी स्थळ म्हणून लोणावळय़ाजवळील राजमाची किल्ल्याची, तर संमेलनाध्यक्षपदी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची निवड करण्यात आली आहे. ‘गोनीदां’ दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने आयोजित या संमेलनाची माहिती डॉ. विजय देव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

विद्यार्थ्यांनी अनुभवले मंत्रिपदाबरोबरच विरोधी पक्षनेतेपद
अण्णासाहेब मगर महाविद्यालयात साकारली अभिरूप संसद
हडपसर, ५ फेब्रुवारी/वार्ताहर
अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी अभिरूप संसदेच्या माध्यमातून अनुभवले मंत्रिपद, राज्यपाल, सदस्यांबरोबरच विरोधी नेतेपददेखील!
हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक स्व. बा. रा. घोलप आणि माजी अध्यक्ष स्व. मामासाहेब मोहळ यांच्या स्मृतिसप्ताहाप्रीत्यर्थ आयोजित विविध कार्यक्रमांतर्गत राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘अभिरूप संसद’चे चालतेबोलते चित्रच उभे केले होते.

थंडीचा कडाका आणखी वाढला
पुणे ९.४ अंश सेल्सिअस
पुणे, ५ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

थंडी संपली की काय, असे गेल्या आठवडय़ापर्यंत वाटत असतानाच आता मात्र अचानक थंडीची तीव्रता वाढली. पुण्याचे किमान तापमान सरासरीच्या खाली ९.४ अंशांपर्यंत उतरले. याच वेळी दुपारच्या उन्हाचा चटका कायम आहे. आकाश निरभ्र असल्याने काहीसे असेच वातावरण येत्या दोन दिवसांत कायम राहणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.पुण्याप्रमाणेच राज्याच्या इतर भागातही काल रात्री व आज सकाळी गारठा वाढल्याचे जाणवले. नाशिक (९.५ अंश), जळगाव (११ अंश), सांगली (१३.२ अंश) मुंबई (१८.४), रत्नागिरी (१७.१) या ठिकाणीसुद्धा किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले गेले. विदर्भ व मराठवाडय़ाच्या काही भागात मात्र विशेष थंडी नव्हती. पुण्यात आज आकाश मुख्यत: निरभ्र होते. त्यामुळे दुपारी उन्हाचा चटका जाणवला, तसाच रात्री व पहाटेच्या वेळी गारठा अनुभवायला मिळाला. त्यामुळेच आज पुणे वेधशाळेत गेल्या महिन्याभरातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. सकाळी वारे सुटल्याने थंडी अधिकच बोचरी बनली होती. सकाळच्या वेळी हा गारठा अनुभवल्यानंतर दुपारी मात्र वातावरण पालटले आणि उन्हाच्या चटक्याने पुणेकरांना हैराण केले. या दिवसांत सामान्यत: ३१ अंशाच्या आसपास असणारे कमाल तापमान आज त्यापैकी दोन अंशांनी जास्त होते. त्यामुळे सकाळचा गारठा व दुपारचा उकाडा ही शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून कायम असलेली स्थिती आजही अनुभवायला मिळाली. या विषम वातावरणापासून येत्या दोन दिवसांत तरी शहराची सुटका होणार नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. या काळात किमान तापमान ९ अंशांच्या आसपास, तर कमाल तापमान ३२ अंशांच्या जवळपास राहील, असे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.

दुचाकी खांबावर आदळून दोन मद्यधुंद तरुण ठार
पिंपरी, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील महाविद्यालयाचे दोन मद्यधुंद विद्यार्थी आज पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून जाताना पिंपरी खराळवाडी येथील रस्त्यालगतच्या खांबावर आदळून जागीच ठार झाले.
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद सुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजित अशोकराव पवार (वय-२५, रा.सी/१,महेशनगर, पिंपरी) व मिलन जितेंद्र कटीया (वय-२६, रा.ईबी ३०२, रोहन हाईट्स, पिंपरी, मूळ रा. उत्तर प्रदेश)असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.हे दोघेही संत तुकारामनगर येथील डॉ.पाटील दंतचिकित्सा महाविद्यालयात शिकत होते. रात्री त्यांनी पार्टी केल्यानंतर मोटारसायकलवरून भरधाव ते पिंपरीकडे निघाले होते. खराळवाडी येथे त्यांचा तोल गेल्याने गाडी एका लोखंडी खांबावर जोरात धडकली. त्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले.रुग्णालयात नेण्यापूर्वीच दोघेही ठार झाले.अपघात झाला त्या वेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, परंतु मदतीला कोणीही पुढे आले नाही, असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. खबर मिळताच पिंपरी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दोघांचे शव चव्हाण रुग्णालयातील शवागरात हलविले. निरीक्षक सुर्वे, गुन्हे विभागाचे निरीक्षक नंदकुमार पिंजण यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अधिक तपास सहायक निरीक्षक राजेंद्र शेळके करीत आहेत.

डेबिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांना अटक
पुणे, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

व्यापाऱ्याच्या डेबीट कार्डाचा गैरवापर करून ७५ हजारांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून कॉलसेंटरमधील कर्मचाऱ्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली. सूर्यप्रकाश विष्णूप्रकाश तिवारी (वय २२) आणि प्रवीण कांतिलाल सारडा (वय २४, रा. कोथरूड, मूळ रा. अकोला) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मनोज मुथा (रा. पाषाण) यांनी याबाबत चतु:शृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवारी व सारडा या दोघांनी मुथा यांना संपर्क साधला व डेबीट कार्ड वापरत नसल्यास बंद करावयाचे आहे का, अशी विचारणा केली. त्यावर, दुसरे कार्ड देण्याच्या बहाण्याने पहिले डेबीट कार्ड मुथा यांच्याकडून तिवारी याने घेतले. त्यानंतर, दोन लॅपटॉपसाठी ७५ हजार ७५० रुपयांची खरेदी कार्डवरून झाल्याचा एसएमएस बँकेकडून मुथा यांना आला. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे मुथा यांच्या लक्षात आले. कॉलसेंटरमधून आलेले दूरध्वनी व बँकेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तिवारी व सारडा यांना पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक शौकतअली सैय्यद याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

‘मराठा आरक्षण परिषद’ शनिवारी
पुणे, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेडच्या वतीने येत्या ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘मराठा आरक्षण परिषदेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन छत्रपती उदयनराजे भोसले व युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, प्रवीण गायकवाड, विकास पासलकर,जयश्री शेळके, नगरसेवक दीपक मानकर, सभागृहनेते अनिल भोसले, उपमहापौर चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित राहणार आहेत. या वेळी मराठा समाजाचा इतर मागासवर्गात समावेश करावा, इतरमागासांच्या हक्काचे १९ टक्के आरक्षण सोडून मराठा समाजाला ३० टक्के आरक्षण द्यावे, या मागण्या मांडण्यात येणार आहे.

दरोडय़ाच्या तयारीतील तिघांना अटक; कोठडी
पुणे, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

कोरेगाव पार्कमधील कोरेक्स या परकीय चलनाच्या कार्यालयाजवळ दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सहा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ज्योती पूरकर यांनी दिले. सोनूकांत ढढण पांडे (वय १८, रा. इंदिरानगर), राहुल सुरेश कांबळे आणि अजय सुनील चव्हाण (वय २०, रा. ताडीवाला रोड) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. कोरेगाव पार्कमधील बर्निग घाट रस्त्यावर हे तिघेही शस्त्रास्त्र घेऊन तयारीत असताना पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडून कोयता, चॉपर, चाकू, मिरची पूड असे साहित्य जप्त करण्यात आले. परकीय चलनाच्या कार्यालयात दरोडा टाकण्याचा त्यांचा डाव उधळून लावण्यात आला. अन्य साथीदार फरारी आहेत. त्यांच्या गुन्हय़ांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. सहायक सरकारी वकील अ‍ॅड. राजश्री कदम यांनी काम पाहिले.

रांका रुग्णालयात ‘सारस डायलिसिस सेंटर’ सुरू
पुणे, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

पुण्यातील ‘लायन्स क्लब ऑफ पूना, सारसबाग’च्या वतीने मुकुंदनगरमधील रांका रुग्णालयात आर्थिक दुर्बल घटकांसाठी केवळ दोनशे रुपयांत मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त रुग्णांना डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.ही सुविधा एक फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली. रुग्णालयातील सेंटरचे उद्योगपती रसिक धारिवाल यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या केंद्रात तीन डायलिसिस मशिन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रत्येकी किंमत सहा लाख १५ हजार रुपये आहे. यावेळी रांका ज्वेलर्सचे शैलेश रांका, तसेच विमलकुमार जैन, भरत शहा, नितीन शहा, पुखराज रांका, डॉ. रमेश रांका यांची उपस्थिती होती. आर्थिकदृष्या कमकुवत रुग्णांसाठी डायलिसिस सेंटरमध्ये दोनशे रुपयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

थॅलेसेमियाग्रस्तांसाठी संक्रमण केंद्राचे उद्घाटन
पुणे, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या पुणे जिल्हा शाखेच्या वतीने रास्ता पेठेतील डॉ. एन. जे. बांदोरवाला आरोग्य केंद्रात थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी रक्त संक्रमण केंद्राचे उद्घाटन रेडक्रॉसच्या मानद सचिव श्रीमती होमाई मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रात दररोज बारा बालकांना रक्त संक्रमण करण्याची सोय आहे.संस्थेचे मानद सचिव आर. व्ही. कुलकर्णी, एन. ए. पी. नानावटी, व्ही. डी. फाटक, डॉ. विजय रामानन, डॉ. प्रमोद धायगुडे, डॉ. दिलीप वाणी आदींची या वेळी उपस्थिती होती. डॉ. रामनन यांनी केंद्राची सविस्तर माहिती दिली. सुरेंद्र मुदलियार यांनी आभार मानले.

सुदृढ बालक स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पुणे, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया व रोटरी क्लब ऑफ पुणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुदृढ बालक स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ. जाई केळकर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत एकूण १५२ बालकांनी भाग घेतला. डॉ. केळकर, डॉ. मुकुंद महाजन यांनी बालकांच्या आरोग्याची निगा राखण्याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी पुष्पा वागळे, चंदर खोसला, विजयालक्ष्मी तुळपुळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक घोलप यांनी केले.

‘ज्ञानेश्वरीची ज्ञानकिरणे’चे प्रकाशन
पुणे, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा ५२ वा, स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा ३२ वा व श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाचा १३ वा वर्धापन दिन नुकताच मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी स्वामी माधवनाथ यांनी ज्ञानेश्वरीतील निवडक अशा २०५ ओव्यांवर केलेल्या प्रवचनांवर आधारित ‘ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे’ या ग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन स्वामी मकरंदनाथ यांच्या हस्ते करण्यात आले.या ग्रंथातील एक प्रवचन एक ते दीड पानाचे असल्याने रोज एक प्रवचन वाचता येईल व दिवसागणिक आपले जीवन उंचावण्याचा उपक्रम अंगिकारता येईल. शांती व बोध टिकविण्यासाठी कोणतेही पान उघडून एखादे प्रवचन वाचता येणेही त्यामुळे शक्य होईल, असे स्वामी मकरंदनाथ यावेळी बोलताना म्हणाले. भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायातील बासष्ठाव्या श्लोकावर त्यांचे प्रवचनही यावेळी झाले. यावेळी स्वामी माधवनाथांच्या जीवनचरित्रावर आधारित असा परिसंवाद झाला. तसेच मंडळाचे एक विश्वस्त व मार्गदर्शक मिलिंद लिमये यांचेही भाषण झाले. अनिरुद्ध देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

रामदासांचे मनाचे श्लोक आता विश्व मराठी साहित्य संमेलनात
पुणे, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

अमेरिकेतील सॅन होजे येथे येत्या १४ फेब्रुवारीपासून होणाऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये रामदास स्वामी लिखित मनाचे श्लोकांवरील ‘डायलॉग विथ माईंड’ हा कार्यक्रम सादर करण्यासाठी विनिता महाजनी यांची निवड करण्यात आली आहे.विनिता महाजनी यांनी जर्मन भाषेतील पीएच.डी. मिळवली असून मराठी, जर्मन व इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके लिहिली आहेत. रामदासांच्या २०५ मनाच्या श्लोकांचा जर्मन भाषेत अनुवादही केला आहे.निवडीबद्दल समाधान व्यक्त करताना विनिता महाजनी म्हणाल्या की, जागतिक स्तरावरील पहिल्या मराठी संमेलनात कार्यक्रम सादर करण्यासाठी दिलेली संधी हा मोठा सन्मान आहे.

उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांविरुध्द तक्रार
पुणे, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानात दोन कासवांना बेकायदेशीरपणे ठेवल्याचा आरोप करीत ‘पीपल फॉर अ‍ॅनिमल्स’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध वनखात्याकडे तक्रार दिली.दुर्मीळ होत चाललेल्या जातींची ही दोन कासवे असून वाघ व हत्तींप्रमाणेच त्यांच्या जतनाचे महत्त्व आहे. वन्यप्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही कासवे संभाजी उद्यानात ठेवली होती, अशी तक्रार संस्थेचे मनोज ओसवाल यांनी वनखात्याकडे केली आहे. वन अधिकारी दिलीप बुरखे यांच्याकडे ही तक्रार दाखल करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिकेचे उद्यान अधीक्षक यशवंत खैरे यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले,‘‘काही व्यक्तींकडून ही कासवे आम्हाला मिळाली आहेत. प्राणिसंग्राहलयात त्यांची योग्य व्यवस्था लावणारा अधिकारी कामात व्यस्त असल्याने थोडय़ावेळासाठी कासवांना बंदिस्त अवस्थेत ठेवण्यात आले होते.’’ महापालिकेने नेहमीच वन्यप्राणी कायद्याचे पालन केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकाराला व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्यांचा निषेध
पुणे, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील शेटफळ गढे येथील ‘लोकमत’चे वार्ताहर बाळासाहेब तांबे व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करणाऱ्यांचा पुणे जिल्हा पत्रकार संघातर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने संबंधितांवर कारवाई करणाऱ्या उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकांत परोपकारी यांचे अभिनंदनही करण्यात आले आहे. शासनाने पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले असून त्यांचे पोलिसांनी पालन करावे, यासाठी जिल्हा पत्रकार संघाचे शिष्टमंडळ पुण्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक रवींद्र कदम यांना निवेदन देण्यात येणार आहे. ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

पौर्णिमा चिकरमाने यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान
पुणे, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतीच्या माध्यमातून कचरा वेचणाऱ्या हजारो गोरगरिबांसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पौर्णिमा चिकरमाने यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्काराला उत्तर देताना चिकरमाने म्हणाल्या की, काच, कागद, पत्रा गोळा करून उपजीविका करणाऱ्यांच्या वाटय़ाला अनेक अडचणी येतात. जन्मभर कष्टाची भाकरी खाल्ली असली तरी वृद्धापकाळात त्यांच्याकडे भीक मागण्याशिवाय पर्याय नसतो. याप्रसंगी चिकरमाने यांनी पुरस्कारासाठी देण्यात आलेली दहा हजार रुपयांची रक्कम कृतज्ञता निधीला अर्पण केली.

स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा वर्धापनदिन साजरा
पुणे, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा ५२ वा, स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा ३२ वा व श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाचा १३ वा वर्धापन दिन नुकताच मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी स्वामी माधवनाथ यांनी ज्ञानेश्वरीतील निवडक अशा २०५ ओव्यांवर केलेल्या प्रवचनांवर आधारित ‘ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे’ या ग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन स्वामी मकरंदनाथ यांच्या हस्ते करण्यात आले.या ग्रंथातील एक प्रवचन एक ते दीड पानाचे असल्याने रोज एक प्रवचन वाचता येईल व दिवसागणिक आपले जीवन उंचावण्याचा उपक्रम अंगिकारता येईल. शांती व बोध टिकविण्यासाठी कोणतेही पान उघडून एखादे प्रवचन वाचता येणेही त्यामुळे शक्य होईल, असे स्वामी मकरंदनाथ यावेळी बोलताना म्हणाले. भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायातील बासष्ठाव्या श्लोकावर त्यांचे प्रवचनही यावेळी झाले. यावेळी स्वामी माधवनाथांच्या जीवनचरित्रावर आधारित असा परिसंवाद झाला. तसेच मंडळाचे एक विश्वस्त व मार्गदर्शक मिलिंद लिमये यांचेही भाषण झाले. अनिरुद्ध देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

सिमेंटच्या चारशे पोत्यांचा अपहार
पुणे, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सिमेंटची चारशे पोती असा एकूण ९२ हजाराच्या मालाचा अपहार केल्याच्या आरोपावरून बंडगार्डन पोलिसांनी एका तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल केला. मालधक्का चौक ते निगडी या मार्गावर मंगळवारी दुपारी दीड ते बुधवारी सायंकाळी साडेचार या वेळेत ही घटना घडली.बाबासाहेब शाहुराव शिंदे (वय २८, रा. निरा, ता. पुरंदर) याच्याविरूद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक छगनलाल किराड (वय ३३, रा. नाना पेठ) यांनी याबाबत बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालधक्का येथील गोदामात ट्रकमध्ये सिमेंटची चारशे पोती भरल्यानंतर शिंदे हा निगडी येथील निश्चित ठिकाणी न पोहोचता, ९२ हजाराच्या मालाचा अपहार करून पसार झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक रणदिवे पुढील तपास करीत आहेत.