Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

भारतीय जनता पक्षाचे आजपासून नागपुरात राष्ट्रीय अधिवेशन
नितीन तोटेवार
नागपूर, ५ फेब्रुवारी

 

शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी येत्या लोकसभा निवडणुकीसाठीचे धोरण ठरवचानाच शेतकऱ्यांचे प्रश्न, दहशतवाद यासह काही राजकीय आणि आर्थिक ठरावांवरून केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे.
लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा केंद्रात सत्तेत येण्याचा संकल्प असून समृद्ध आणि सुरक्षित भारत हे आमचे लक्ष्य आहे. या तीन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कार्यकारिणीत राजकीय, आर्थिक आणि कृषी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तीन ठरावांद्वारे सखोल चर्चा करण्यात येणार आहे, असे पक्षाचे उपाध्यक्ष खासदार मुख्तार अब्बास नकवी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे नेतृत्व कमकुवत असून केंद्रातील या सरकारला एकाही आघाडीवर यश आलेले नाही. अंतर्गत सुरक्षा, आर्थिक बाजू, गैरव्यवहारांचे वाढते प्रमाण अशा सर्व क्षेत्रात सत्तेचा गैरवापर करण्यात आला, अशी टीका करून नकवी म्हणाले, यावर या अधिवेशनात आक्रमक चर्चा करण्यात येईल. राजकीय आणि आर्थिक, शिवाय सुरक्षा, दहशतवाद, शेतकरी, महिला आणि तरुणांच्या प्रश्नांवरही सरकारला धारेवर धरण्यात येईल. येत्या निवडणुकीच्या घोषणापत्रावर यावेळी चर्चा होणार आहे काय, याकडे लक्ष वेधले असता नकवी यांनी इन्कार केला. ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली समिती असून लवकरच ती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. गुजरातमधील एक महिला मंत्री शस्त्र घेऊन आढळल्याकडे लक्ष वेधले असता, ‘नो कॉमेंट’असे सांगून त्यांनी त्यावर अधिक बोलण्याचे टाळले.
हिंदुत्व, संघ आणि स्वतंत्र विदर्भ!
भाजप हिंदुत्वाच्या मुद्दय़ापासून दूर गेले काय, असे विचारले असता, समृद्ध आणि सुरक्षित भारताची घोषणा करतानाच देशाची प्रगती व्हावी आणि समाजाच्या सर्व वर्गातील घटकांना सोबत नेण्याचे आमचे धोरण आहे. राष्ट्रवाद हा आमचा मूलमंत्र आहे. यामुळे दहशतवाद आणि जातीयवादाच्या गोष्टी करणाऱ्या स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष पक्षाच्या चष्म्यातून याकडे बघू नका, असे आवाहन नकवी यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व राष्ट्रवादी विचारसरणीच्या संघटनांना नेहमीच पाठबळ असते आणि आम्ही देखील राष्ट्रभक्त आहोत. यामुळे आम्हाला देखील निश्चितच ‘आशीर्वाद’ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लहान राज्यांबाबत आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण केली. मात्र, काँग्रेसने तेलंगणाला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर आताच काही स्पष्ट करता येत नाही, येत्या तीन दिवसात कोणकोणते विषय येतात ते दिसेलच. तसेच, निवडणूक घोषणापत्राच्यावेळीही पक्षाची भूमिका स्पष्ट होईल, असेही खासदार नकवी यांनी सांगितले.