Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

निर्दय सरकारला धडा शिकवा - उद्धव ठाकरे
अमरावती, ५ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

 

एकीकडे शेतकऱ्यांच्या हजारोंनी आत्महत्या होत असताना सरकारच्या हृदयाला पाझर फुटत नाही. मात्र दहशतवादी अफजलला फाशी देताना त्यांचा जीव कासावीस होतो, अशा या निर्दय सरकारला लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. कसाब, अफजल काँग्रेसचे जावई असतील तर त्यांना घेऊन काँग्रेसवाल्यांनी पाकिस्तानमध्येच जायला हवे, अशा शब्दात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर टीका केली.
येथील नेहरू मैदानावर गुरुवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत, दहशतवाद, हिंदुत्ववाद या विषयांवर भावनिक सादही घातली. यावेळी शिवसेनेचे खासदार व संपर्कप्रमुख आनंदराव अडसूळ, शिवसेनेचे सचिव विनायक राऊत, उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे, खासदार अनंत गुढे, आमदार संजय बंड, विजयराज शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.
ही निवडणूक प्रचाराची सभा नाही, सरकारची लक्तरे वेशीवर टांगण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये आलो आहे. विदर्भातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. एकेकाळी याच भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे इंग्रजांकडे कर्ज होते. काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याची वेळ आली. मुंबई हल्ल्यातील आरोपी कसाब ठणठणीत असल्याची बातमी वृत्तपत्रात उमटते, त्याचवेळी एका कर्जबाजारी शेतकऱ्याच्या आत्महत्येचीही बातमी दिसते, शेतकरी मरतो आहे याची कुणालाही लाज वाटत नाही, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे शेतकऱ्यांना २ कोटी कृषीपंप वाटण्याची घोषणा करतात पण, वीजच नाही तर पंप काय मेणबत्त्यांवर चालणार, असा सवाल त्यांनी केला.
येथील काळ्या मातीत सोन्यासारखा कापूस पिकायचा. काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळे कापूस उत्पादक देशोधडीला लागला. सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणे-घेणे नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांना दहशतवादी अफजल गुरूची काळजी आहे. एका माणसाला मारण्यात काय शौर्य आहे, असे ते म्हणतात पण, ही माणसे नाहीत, तर राक्षसे आहेत. जर ते तुमचे जावई असतील, तर त्यांना घेऊन पाकिस्तानात जा, इथे तुमचे काळे तोंड दाखवू नका, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिवराज पाटील यांच्यावर टीका केली.
केवळ दहा अतिरेकी संपूर्ण देश तीन दिवस टांगणीवर ठेवतात. भारताला आव्हान देतात. तिकडे गडचिरोली जिल्ह्य़ात पंधरा पोलिसांना नक्षलवादी ठार मारतात. नक्षलवाद्यांकडे मुबलक शस्त्रसाठा असतो. पोलिसांजवळ पुरेशा गोळ्याही नसतात, असे किती बलिदान आम्ही द्यायचे. याचा विचार करावा लागणार आहे. अतिरेक्यांच्या गोळ्यांनी मरण्यासाठी जन्माला आलेलो नाही. लढाईसाठी अजूनही मर्द लोक शिल्लक आहेत. भारत मातेची कूस वांझोटी नाही पण, संताप एकाच गोष्टीचा येतो. या देशावर गोऱ्यांनी दीडशे वष्रे राज्य केले. त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल यांनी हा देश स्वातंत्र्य देण्याच्या लायकीचा नाही, असे उद्गार काढले होते. आज एक परदेशी बाई देशावर राज्य करत आहे. स्वत:ला जर मर्द म्हणवत असाल तर या गोष्टीचाही विचार केला पाहिजे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली.
काँग्रेसने चालविलेले सर्वधर्मसमभावाचे राजकारण थोतांड आहे. निवडणुकीच्यावेळी जातींची संख्या डोळ्यासमोर ठेवून उमेदवार द्यायचे, मतदारांनी कुठलाही विचार न करता ठप्पे मारायचे आणि नंतर कपाळावर हात मारून घ्यायचा हे किती दिवस चालणार आहे. याचा विचार प्रत्येकाने करायला हवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकरी मेळाव्यात खासदार आनंदराव अडसूळ, खासदार अनंत गुढे आदींची भाषणे झाली.