Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

मराठा समाजाला १५ टक्के आरक्षण द्या - रामदास आठवले
नागपूर, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

मराठा समाजाला १५ टक्के आरक्षण राज्य शासनाने द्यावे, स्वतंत्र विदर्भाबाबत सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भूमिका जाहीर करावी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीने रिपाइंसाठी लोकसभेच्या सहा जागा सोडाव्या आदी मागण्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आज नागपूर येथे पत्रकर परिषदेत केल्या. सत्यमच्या गैरव्यवहाराची सहा वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारीची दखल तत्कालीन अर्थमंत्र्यांनी घेतली असती तर, घोटाळ्याची व्याप्ती वाढली नसती, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
रिपाइंतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विदर्भ परिषदेसाठी खासदार रामदास आठवले नागपुरात आले आहेत. रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एचडीएफसी बॅंकेत सत्यमचे प्रमुख रामलिंगम राजू यांनी सात कोटी रुपये बेनामी ठेवले असल्याची माहिती मिळाली होती, त्या आधारावर १८ ऑगस्ट २००३ मध्ये लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी केली होती. केंद्रात एनडीएचे सरकार असल्याने आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे रामलिंगम राजू यांचे मित्र असल्याने या प्रकरणाची चौकशी झाली नसावी, अशी शंका आहे. त्यानंतर सेबीच्या अध्यक्षांनाही पत्र लिहिण्यात आले मात्र, त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. या पत्राची दखल घेऊन चौकशी केली असती तर, सत्यम मधील घोटाळ्याची व्याप्ती वाढली नसती. संसदेच्या येत्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करणार आहोत, असे आठवले म्हणाले. २८ फेब्रुवारीला दिल्लीतील रामलीला मैदानावर पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून त्यात देशभरातून चार लाख प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, असा दावा आठवले यांनी केला. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, उदित राज यांना सोबत घेऊन देशपातळीवर गैरराजकीय दलित फ्रन्टची स्थापना करण्यात आली आहे. या फ्रन्टच्या माध्यमातून दलितांचे प्रश्न मार्गी लावण्याचे व विखूरलेल्या आंबेडकरी जनतेला एकत्र आणण्याचे प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. शिर्डीहून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिर्डीसह राज्यातील सहा जागांची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्याचे वातावरण काँग्रेससाठी अनुकूल आहे, त्यामुळे भाजप सत्तेवर येण्याची शक्यता नाही, सोनिया गांधी यांनी निवडणुकीपूर्वी जर स्वतंत्र विदर्भाची घोषणा केली तर, काँग्रेसला विदर्भात चांगले यश मिळेल्असेही आठवले म्हणाले,